हसतमुख असलेली आणि प्रेमभावामुळे संत अन् साधक यांना आपलेसे करणारी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. प्रियांका माकणीकर !

भाद्रपद कृष्‍ण दशमी (९.१०.२०२३) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील कु. प्रियांका माकणीकर हिचा ३४ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त रामनाथी आश्रमातील कु. पूनम मुळे हिला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

कु. प्रियांका माकणीकर

कु. प्रियांका माकणीकर हिला ३४ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने हार्दिक शुभेच्‍छा !

१. हसतमुख

‘प्रियांका नेहमी हसतमुख असते. कधी काही प्रसंग घडला किंवा कुणाकडून चूक झाली, तर ती संबंधित साधकाला ताण येणार नाही, याची काळजी घेऊन त्‍याची चूक सहजतेने सांगते. त्‍यामुळे समोरच्‍याला ताण येत नाही आणि तिच्‍याविषयी जवळीक वाटते.

कु. पूनम मुळे

२. प्रेमभाव

अ. कु. प्रियांकाच्‍या खोलीत तिच्‍या समवेत एक काकू रहात असत. ती त्‍या काकूंची प्रेमाने आणि आदराने चौकशी करायची. ती त्‍यांच्‍याशी मैत्रिणीप्रमाणे सहजतेने संवाद साधायची. त्‍यामुळे त्‍यांच्‍या खोलीत वातावरण आनंदी असायचे.

आ. तिला कुणी वयस्‍कर साधक किंवा समवयीन साधिका जड साहित्‍य उचलून नेत असल्‍याचे दिसले, तर ती त्‍यांना ते साहित्‍य उचलण्‍यास साहाय्‍य करते आणि त्‍यांना ‘जड साहित्‍य एकट्याने उचलू नका’, असे सांगते.

इ. तिला मी किंवा आश्रमातील एखादी साधिका तणावाखाली असल्‍याचे लक्षात आले, तर ती स्‍वतःहून विचारपूस करते, तसेच कधीकधी गंमत करून आम्‍हाला हसवते. तेव्‍हा आमच्‍या चेहर्‍यावरील हास्‍य पाहून तिलाही आनंद होतो.

३. प्रसंगात न अडकणे

उत्तरदायी साधिकेने तिची एखादी चूक सांगितल्‍यावर तिला त्‍याचा ताण येतो, तसेच माझ्‍या समवेत काही दुमत झालेे किंवा माझ्‍याकडून काही चूक झाली, तर तिला वाईट वाटते; पण काही वेळाने ती संबंधित साधकाशी स्‍वतःहून आणि सहजतेने बोलू लागते.

४. पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे ज्‍येष्‍ठ बंधू), सनातन संस्‍थेचे १०१ वे व्‍यष्‍टी संत, वय ८७ वर्षे) यांची सेवा भावपूर्ण करून त्‍यांचे मन जिंकणे

४ अ. संतसेवा भावपूर्ण करणे : काही दिवस कु. प्रियांका पू. भाऊकाका यांची सेवा करत असेे. ती त्‍यांची सेवा साक्षात् ‘गुरुदेवांच्‍याच सगुण रूपाची सेवा आहे’, या भावाने आणि अत्‍यंत प्रेमाने करायची. ‘सेवेत काही त्रुटी न रहाता, ती अधिकाधिक चांगली व्‍हावी’, अशी तिची तळमळ असे.

४ आ. परिस्‍थितीशी जुळवून घेणे : आरंभी तिला पू. भाऊकाका आणि त्‍यांचे कुटुंबीय यांची सेवा करतांना ताण येत असे; पण नंतर तिने ‘त्‍यांच्‍या कुटुंबियांचा स्‍वभाव कसा आहे ? त्‍यांना काय अपेक्षित आहे ?’, याचे निरीक्षण करून त्‍यांना अपेक्षित असे वागायला आरंभ केला. त्‍यानंतर तिला सेवा चांगली जमू लागली.

४ इ. पू. भाऊकाका यांना घरातील आगाशीत लावलेल्‍या झाडांची मशागत करण्‍यास साहाय्‍य करणे : पू. भाऊकाकांनी त्‍यांच्‍या घराच्‍या आगाशीमध्‍ये काही फुलझाडे लावली आहेत. प्रियांका त्‍या फुलझाडांची मशागत करण्‍यास त्‍यांना मनापासून साहाय्‍य करते. त्‍या झाडांसंदर्भात काही साहाय्‍य हवे असल्‍यास पू. भाऊकाका कु. प्रियांकाला भ्रमणभाष करून सांगतात, तसेच ते तिला ती झाडे आणि फुले यांविषयी माहितीही देतात.

४ ई. पू. भाऊकाका आणि त्‍यांच्‍या पत्नी यांनी आठवण काढणे : पू. भाऊकाका यांच्‍याकडे सेवेसाठी अन्‍य साधिकांचेही नियोजन केले जाते. प्रियांका पुष्‍कळ दिवस त्‍यांच्‍याकडे सेवेला गेली नाही, तर ते आणि त्‍यांच्‍या पत्नी इतर साधिकांकडे तिची आठवण काढतात आणि ‘ती सेवेला पुन्‍हा कधी येणार आहे ?’, असे विचारतात.

४ उ. सणाच्‍या वेळी आवर्जून सेवेला बोलवणे : एखाद्या महत्त्वाच्‍या सणाला, तसेच पू. भाऊकाका यांच्‍या घरी कुणाचा वाढदिवस असल्‍यास ते आवर्जून ‘प्रियांकाला सेवेला पाठवा’, असा निरोप उत्तरदायी साधिकेकडे देतात.’

– कु. पूनम मुळे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.४.२०२३)