मालेगाव न्‍यायालयात खासदार संजय राऊत यांच्‍यावर अब्रूहानीचा खटला प्रविष्‍ट !

मंत्री दादा भुसे यांची अपर्कीती केल्‍याचेे प्रकरण

दादा भुसे आणि संजय राऊत

नाशिक – ‘नाशिक गिरणा सहकारी साखर कारखान्‍या’त जिल्‍ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी १७८ कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केला आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’मधून केला होता. ‘वृत्तपत्रातून चुकीची आणि अपर्कीतीकारक माहिती प्रसिद्ध करण्‍यात आली आहे’, असा आरोप करत मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्‍यावर मालेगाव येथील अतिरिक्‍त मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी यांच्‍या न्‍यायालयात अब्रूहानीचा खटला प्रविष्‍ट केला आहे. या खटल्‍यासंदर्भात राऊत यांना २३ ऑक्‍टोबर या दिवशी मालेगाव येथील न्‍यायालयात उपस्‍थित रहाण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे.

शिवसेना फुटीनंतर मालेगाव येथे मे २०२३ मध्‍ये उद्धव ठाकरे यांच्‍या उपस्‍थितीत जाहीर सभा घेण्‍यात आली. या वेळी संजय राऊत यांनी गिरणा साखर कारखान्‍यात मोठा घोटाळा झाला आहे, अशी अप्रत्‍यक्ष टीका मंत्री भुसे यांच्‍यावर केली होती. त्‍याचसमवेत दैनिक ‘सामना’तूनही गिरणा सहकारी साखर कारखान्‍यात भ्रष्‍टाचार झाल्‍याचा आरोप त्‍यांनी भुसे यांच्‍यावर केला होता. त्‍यानंतर मंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांचा अवधी देत संजय राऊत यांना हे आरोप सिद्ध करण्‍याचे आव्‍हानही दिले होते; मात्र हे आरोप सिद्ध न केल्‍यामुळे त्‍यांनी वरील कृती केली.