सिक्कीममध्ये ढगफुटी : तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे हाहा:कार !

  • २३ सैनिक बेपत्ता, ३ लोकांचे मृतदेह मिळाले !

  • भारतीय सैन्याच्या छावण्या उद्ध्वस्त, सैन्याची ४१ वाहने बुडाली !

गंगटोक (सिक्कीम) – सिक्कीममध्ये ४ ऑक्टोबरच्या रात्री दीड वाजता अचानक आलेल्या पुरामुळे हाहा:कार माजला. उत्तर सिक्किममधील ल्होनाक तलावाच्या वर ढगफुटी झाल्याने लाचेन खोर्‍यातील तिस्ता नदीची पाणी पातळी तब्बल १५-२० फुटांनी वाढली. या पुरामुळे भारतीय सैन्याचे २३ सैनिक बेपत्ता झाले.

संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार नदीला लागून असलेल्या परिसरात सैन्याची छावणी असल्याने ती पुराच्या तडाख्यात वाहून गेली. अचानक पाणी वाढल्याने चुंगथांग धरणातून पाणी सोडावे लागले. यानंतर सखल भागही बुडू लागला. येथे सिंगतामजवळ असलेल्या बारडांग येथे उभी असलेली सैन्याची तब्बल ४१ वाहनेही बुडाली. नदीचे पाणी अनेक घरात शिरले. लोक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी गेले असल्याचे सांगितले जात आहे.

अचानक आलेल्या ढगफुटीमुळे नदीवर बांधलेले काही पूल आणि रस्तेही खराब झाले आहेत. या घटनेनंतर बेपत्ता सैनिकांच्या शोधासाठी बचाव मोहीम चालू करण्यात आली आहे. आतापर्यंत ३ लोकांचे मृतदेह मिळाल्याचे सांगितले जात आहे. ‘सीमा रस्ते संघटने’चे (‘बी.आर्.ओ.’चे) कर्मचारी, तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे सैनिकही बचावकार्य करत आहेत. सिक्किमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी सिंगताममध्ये अचानक आलेल्या पुराचा आणि साहाय्यकार्याचा आढावा घेतला.