संतप्त नागरिकांचा नगरपालिका प्रशासनाला घेराव
सावंतवाडी – सावंतवाडी येथून आंजिवडे (तालुका कुडाळ) येथे दुचाकीने जात असतांना शहरातील ‘राजवाडा’ परिसरात ‘साधले मेस’जवळ मोठे झाड (भेडला माड) थेट अंगावर पडल्यामुळे गवळीवाडी, आंजिवडे येथील राहुल प्रकाश पंदारे (वय २४ वर्षे) आणि संभाजी दत्ताराम पंदारे (वय २१ वर्षे) या २ युवकांचा जागीच मृत्यू झाला.
२६ सप्टेंबर या दिवशी शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. राहुल आणि संभाजी हे दोघे शहरातील गोठण येथे भजनासाठी आले होते. रात्री ११ वाजता भजन करून गावी परतत असतांना ही दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या मृत्यूची घटना समजताच तात्काळ नगरपालिकेचा बंब आणि रुग्णवाहिका, तसेच पोलीस घटनास्थळी आले. कटरच्या साहाय्याने झाड कापून त्या दोघांना बाहेर काढण्यात आले; मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी संस्थानचे युवराज लखनराजे भोसले, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घटनास्थळी येऊन साहाय्य केले.
(सौजन्य : ABP MAJHA)
आश्वासनानंतर नातेवाइकांनी मृतदेह घेतला कह्यात !
या घटनेनंतर संतप्त झालेल्या आंजिवडे आणि कारिवडे ग्रामस्थांसह स्थानिक नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, टेंपो मालक-चालक संघटना, गवळी समाज यांनी २७ सप्टेंबर या दिवशी सकाळी नगरपालिकेत मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना घेराव घातला. दोन्ही युवकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? याचे उत्तर मिळत नाही आणि संबंधितांच्या कुटुंबियांना हानीभरपाई मिळत नाही, तोपर्यंत दोघांचे मृतदेह कह्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्याचप्रमाणे शहरातील धोकादायक झाडे तोडावीत, अशी मागणी केली.
या वेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार वैभव नाईक यांनी, ‘शासनाच्या माध्यमातून साहाय्य मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील’, असे आश्वासन दिले. त्यानंतर दोन्ही युवकांच्या नातेवाइकांनी मृतदेह कह्यात घेतला.
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्घटना घडली ! – रवि जाधव, सामाजिक बांधिलकी संस्था
या घटनेविषयी ‘सामाजिक बांधिलकी’ या संस्थेचे रवि जाधव म्हणाले, ‘‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. गेल्या वर्षीच्या पावसात त्याच परिसरातील न्यायालयाच्या बाजूचे भले मोठे झाड रस्त्यावर पडले होते; मात्र तेव्हा सुदैवाने चौघांचे प्राण वाचले होते.’’
शहरात अनेक धोकादायक झाडे आहेत. पर्यावरणविषयक उद्दिष्ट साध्य करत असतांना मनुष्यहानी होणार नाही, याची दक्षता घेऊन अशी झाडे तात्काळ तोडण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती परिमल नाईक यांनी केली आहे.