दोन्ही ठिकाणी संबंधितांची झाली बैठक !
मडगाव, २७ सप्टेंबर (वार्ता.) : अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जनाची मिरवणूक आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुसलमान समाजाकडून काढण्यात येणारा जुलूस या दोन्ही मिरवणुका २८ सप्टेंबर या दिवशी येत आहेत. यामुळे मडगाव आणि फोंडा पोलिसांनी दक्षतेचे उपाय योजले आहेत.
सासष्टीचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी जामा मशिदीच्या पदाधिकार्यांसमवेत बैठक घेऊन त्यांना जुलूस सायंकाळी ६ वाजेपर्यंत आटोपता घेण्याची सूचना केली आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकार्यांसमवेत बैठक घेऊन जुलूसचा मार्गही निश्चित केला जाणार आहे. प्रतिवर्ष जुलूस मालभाट येथील जामा मशिदीकडून चालू होतो आणि तो हॉस्पिसियो मार्गे रवींद्र भवन येथे जाऊन तेथे विसर्जित होतो. जुलूस सायंकाळी ६ वाजेपर्यंत आटोपता घेतल्याने त्यानंतर चालू होणार्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीवर परिणाम होणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
फोंडा येथे मिरवणूक शांततेने काढण्याचे पोलीस उपअधीक्षकांचे आवाहन
फोंडा : अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक आणि ईदचा जुलूस शांततेने पार पडावा, यासाठी फोंड्याचे पोलीस उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांनी फोंडा पोलीस ठाण्यात मुसलमान समाजातील पदाधिकारी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी यांची नुकतीच एक बैठक घेतली. बैठकीत पोलीस उपअधीक्षक शिरोडकर यांनी आवश्यक मार्गदर्शन केले.