ठाणे जिल्‍ह्यात १८ सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद यांनिमित्त निघणार मिरवणुका

प्रतिकात्मक चित्र

ठाणे, २७ सप्‍टेंबर (वार्ता.) – यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्‍ही सण एकाच दिवशी आले आहेत. असे असले, तरी अनंत चतुर्दशीच्‍या दुसर्‍या दिवशी ईदच्‍या मिरवणुका निघणार आहेत. दोन्‍ही मिरवणुकांच्‍या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे ग्रामीण या सर्व भागांत १८ सहस्र पोलीस अधिकारी अन् कर्मचारी यांचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे पोलीस ४८ घंटे बंदोबस्‍ताच्‍या कामात व्‍यस्‍त असतील, अशी माहिती ठाणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. बंदोबस्‍ताच्‍या पार्श्‍वभूमीवर ठाणे पोलीस मुख्‍यालयात झालेल्‍या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला ठाणे जिल्‍हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्‍त जयजीत सिंग, नवी मुंबई पोलीस आयुक्‍त मिलींद भारंबे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्‍त अभिजित बांगर, ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्‍यासह पोलीस अधिकारी उपस्‍थित होते. या बैठकीनंतर देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला.