‘हिंदु आणि हिंदुत्व, म्हणजे ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि !’

हिंदु, हिंदुत्व आणि राहुल गांधी – भाग ९

‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि !’- उत्तरराचमरितम्, अध्याय २, श्‍लोक ७
अर्थ : चांगल्या लोकांचे हृदय वज्रापेक्षाही कठोर आणि फुलापेक्षाही कोमल असते.

भारत हे हिंदूबहुल राष्ट्र असल्यामुळे ते जगातील सर्व देशांमध्ये परस्पर समन्वय प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) हा आमच्या सनातन, म्हणजे हिंदु धर्माचा मूलभूत संस्कार आहे. असे असले, तरी हिंदुत्व हे सहिष्णु आणि हिंसा-अहिंसा यांचा सांभाळ करणारे आहे. याविषयीचा ऊहापोह या लेखात केला आहे.

१. हिंदुत्व हे सहिष्णु, क्षमाशील आणि सहनशील !

हिंदुत्व हे सहिष्णु, उदार आणि शरण आलेल्यांना मरण न देता क्षमा करणारे आहे; म्हणूनच या देशाने पारशी अन् ज्यू (यहुदी) या धर्मांच्या त्यांच्या देशातून परागंदा होऊन निर्वासित झालेल्या अनुयायांना उदारपणे आश्रय दिला. त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे आचरण करण्याची मोकळीक दिली.

स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘सहिष्णुता आणि सहानुभूती ही मूल्ये आचरणाचा भाग असल्याचे केवळ इथे आणि इथेच पहायला मिळते. अन्य देशांमध्ये हे केवळ बोलण्यापुरतेच असते. भारत हाच एकमेव असा देश आहे, जिथे हिंदु हे मुसलमानांना मशीद अन् ख्रिस्त्यांना चर्च बांधून देतात’; पण या सहिष्णुता आणि उदारपणाचा अर्थ असा नाही की, हिंदुत्व, हे दुबळे अन् बावळट आहे. आपल्यावर कितीही अत्याचार झाले, तरी ते निमूटपणे सहन करणारे सहनशील आहे !

२. हिंसा-अहिंसा, कठोरता-मृदूता यांचा समतोल सांभाळणारे हिंदुत्व !

अ. ‘अहिंसा परमो धर्मः ।’, असे म्हणत आणि मानत असले, तरी पुढे ‘हिंसा धर्म तंदेवच ।’ असे हिंदुत्वाने म्हटले आहे. अहिंसा हा मानवांचा खरा धर्म असला, तरी जेव्हा धर्म संकटात येतो, तेव्हा त्याचे रक्षण करण्यासाठी हातात शस्त्र घेऊन हिंसा करणेही हिंदुत्वाने न्याय आणि उचित मानले आहे.

आ. ‘कृते प्रतिकृतं कुर्यात्, हिंसिते प्रतिहिंसनम् । न तत्र दोषं पश्यमि, शठे शाठ्यं समाचरेत ॥’ म्हणजेच ‘क्रियेला प्रतिक्रियेने, हिंसेला प्रतिहिंसेने उत्तर देणे, असे आचरण करणे मुळीच दोषास्पद नाही. ‘शेराला सव्वाशेर झालेच पाहिजे, असे ‘जशास तसे आचरण करणे’, म्हणजे हिंदुत्व.

इ. ‘‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि !’- उत्तरराचमरितम्, अध्याय २, श्‍लोक ७

अर्थ : चांगल्या लोकांचे हृदय वज्रापेक्षाही कठोर आणि फुलापेक्षाही कोमल असते. यालाच ‘हिंदुत्व’ म्हणतात.

श्री. शंकर गो. पांडे

३. दुष्टांचा संहार करण्याची शिकवण देणार्‍या हिंदूंच्या देवता !

हिंदूंच्या सर्व देवीदेवतांनी आपल्या हातात विविध प्रकारची शस्त्रे आणि अस्त्रे धारण केली आहेत. आपल्या भक्तांना नेहमी आशीर्वचन देणार्‍या हातांनी दुष्टांच्या निर्दालनासाठी प्रसंगी हातात शस्त्रही उचलले पाहिजे, ही देवीदेवतांनी दिलेली शिकवण, म्हणजे हिंदुत्व.

हिंदूंचे सर्व अवतार युगानुयुगे दुष्टांचा संहार आणि सुष्टांचे रक्षण करणे यांसाठीच अवतीर्ण झाले आहेत. ‘समुद्रमंथनातून निघालेल्या हलाहल नावाच्या अतीजहाल विषामुळे जगाचा विनाश होऊ नये; म्हणून ते विष स्वतः प्राशन करणार्‍या शिवाने दुष्टांच्या संहारासाठी; मात्र महाविनाशकारी तांडव नृत्य करणे’, म्हणजे हिंदुत्व.

४. सामोपचाराने न ऐकल्यास दंडित करणारे रामायणातील प्रसंग !

अ. प्रभु श्रीरामांनी लंकेत बंदिस्त असणारी आपली पत्नी सीता हिला सोडवून आणण्यासाठी सागरावर सेतू बांधणे आवश्यक होते. या सेतूनिर्माणासाठी पाण्यातून योग्य मार्ग दाखवावा; म्हणून प्रथम प्रभु श्रीरामाने सागराला नम्रतेने हात जोडून विनंती केली; पण सतत ३ दिवस आर्ततेने प्रार्थना करूनही सागर श्रीरामाला मार्ग दाखवत नव्हता. अखेर चौथ्या दिवशी श्रीरामाने आपल्या धनुष्यावर बाण चढवला. तो ‘रामबाण’ पहाताच सागर हात जोडून श्रीरामासमोर उभा राहिला आणि श्रीरामांची क्षमा मागून त्याने सेतूसाठी योग्य मार्ग दाखवला. आरंभी आपले काम करण्याविषयी समोरच्यांना विनंती करणे; पण ‘आपल्या विनंतीचा अर्थ आपला दुबळेपणा, असा समोरचा लावत असेल, तर त्याच्या निर्दालनाकरता हातात शस्त्र उचलणे’, म्हणजे हिंदुत्व !

आ. रावणाशी युद्ध करण्यापूर्वी श्रीरामाने वालीचा पुत्र अंगद याला रावणाकडे शिष्टाईसाठी पाठवले होते. उद्देश हाच की, रावणाने सीतेची विनाअट मुक्तता करावी. युद्ध होऊ नये आणि युद्धात होणारी अपरिमित जीवित अन् वित्त हानी टळावी; पण अंगदाची शिष्टाई अयशस्वी झाली आणि रावणाने सीतेची मुक्तता करण्यास नकार दिला. परिणामत: श्रीरामांनी महाबलाढ्य रावणाचा, त्याचा बंधू, पुत्रासहित त्याच्या लाखो सैनिकांचाही सर्वनाश केला. प्रथम सामोपचाराने शत्रू शरण येत असेल, तर ठीकच; पण ‘सामोपचाराने शत्रू ऐकत नसेल, तर बलप्रयोगाने त्याचा सर्वनाश करणे’, म्हणजे हिंदुत्व.

इ. महाबलाढ्य वानरराज वालीने आपला बंधू सुग्रीवाला राज्यातून बाहेर काढून त्याची पत्नी रूमा हिच्याशी विवाह केला होता. लहान भावाची पत्नी ही मुलीसारखी असूनही वालीने तिला आपली पत्नी बनवले आणि आपल्या पतिव्रता असणार्‍या ताराराणीचा एक प्रकारे अपमान करून घोर पाप केले होते. अशा घोर अनाचारी आणि पापी वालीचा रामाने वध केला. ‘आपल्या खर्‍या मित्राला संकटातून सोडवण्यासाठी कोणतेही दिव्य करण्यास सज्ज होणे’, म्हणजे हिंदुत्व.

५. दुष्टाने सामोपचाराने न ऐकल्यास दंडित करणारे महाभारतातील प्रसंग !

अ. कौरव-पांडवांमधील युद्ध टळावे; म्हणून भगवान श्रीकृष्णाने स्वतः शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला होता. श्रीकृष्णाने अंतत: पांडवांसाठी केवळ ५ गावांची मागणी करूनही पाहिले; पण उन्मत झालेल्या दुर्योधनाने पांडवांना ‘५ गावेच काय; पण सुईच्या अग्रावर (टोकावर) मावेल एवढीही भूमी’ देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर राजदूत शत्रू पक्षाचा असला, तरी त्याला सन्मानाने वागवायचे असते. हा नीतीनियम धाब्यावर बसवून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला बंदी करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णाला त्याचेे विराट रूप दाखवावे लागले. ‘शत्रू सामोपचाराने योग्य मार्गावर येत नसेल, तर त्याला आपल्या सामर्थ्याचे विराट रूप दाखवून भयभीत करणे’, म्हणजे हिंदुत्व.

आ. भगवान श्रीकृष्णाने केलेली शिष्टाई अयशस्वी झाल्यानंतर कौरव पांडवांमध्ये ‘न भूतो न भविष्यती ।’ असे भीषण युद्ध झाले. १०० ही कौरवांचा आणि त्यांना साथ देणार्‍यांसह सर्वांचा सर्वनाश झाला. अधर्माची साथ देणारे मग पितामह भीष्म असोत कि गुरुवर्य द्रोणाचार्य कि कृपाचार्य असोत, त्या सर्वांचा अर्जुनाच्या हातून वध झाला. अधर्माच्या बाजूने आपले बंधू असोत, काका, मामा असोत, पितामह असोत कि गुरुवर्य असोत, त्या सर्वांचा धर्माच्या रक्षणासाठी नाश करणे, म्हणजे हिंदुत्व.

इ. श्रीकृष्णाने त्याचा आतेभाऊ शिशुपालाचे १०० अपराध सहन केले; पण अपराधांनी शंभरी पार केल्यानंतर क्षणात आपल्या सुदर्शनचक्राने त्याचे शीर शरिरापासून वेगळे केले. ‘एका विशिष्ट मर्यादेपर्यंत शत्रूचे अपराध आणि त्याचा उद्दामपणा सहन करणे; पण नंतर मर्यादेचा भंग होताच शत्रूला जन्मभर स्मरणात राहील, अशी अद्दल घडवणे’, म्हणजे हिंदुत्व. ‘एरव्ही बासरीवादनाने संपूर्ण चराचराला मंत्रमुग्ध करणार्‍या श्रीकृष्णाने दुष्टांच्या संहारासाठी मात्र हातात बासरीऐवजी सुदर्शनचक्र धारण करणे’, म्हणजे हिंदुत्व.

‘पाकिस्तानशी शेकडो वेळा सामोपचाराचा प्रयत्न करून, त्याला सहस्रो वेळा कडक चेतावण्या देऊनही तो ऐकत नसेल, तर मग त्याच्यावर ‘सर्जिकल ’ आणि ‘एअर’ स्ट्राईक’ करणे’, म्हणजे हिंदुत्व. ‘श्रीरामजन्मभूमीच्या रक्षणासाठी नागा साधूंनी एका हातात माला, तर दुसर्‍या हातात भाला घेणे’, म्हणजे हिंदुत्व.

६. हिंदु साम्राज्याची स्थापना करणार्‍या हरिहर (हक्क) आणि बुक्कराय (बुक्क) या बंधूंची कथा

दक्षिण भारतातील कर्नाटक राज्यात विजयनगर नावाचे (आताचे हंपी) एक शक्तीशाली आणि संपन्न असे हिंदु साम्राज्य होते. या साम्राज्याची स्थापना विद्यारण्यस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहर (हक्क) आणि बुक्कराय (बुक्क) या बंधूंनी केली होती. हे बंधू संगमदेवाचे पुत्र होते, तर संगमदेव हे कुम्मटदुर्ग या राज्याचा राजा कम्पिलराय यांचे जावई आणि राज्याचे कोषाधिकारी होते. वर्ष १३२५ ते १३५१ या कालावधीत दिल्लीचा बादशाह असणार्‍या महंमद तुघलक याने कुम्मटदुर्ग राज्यावर आक्रमण केले. यात कम्पिलरायचा पराभव झाला. महंमदाने दिल्लीला परत जातांना राजघराण्यातील ११ जणांना आपल्या समवेत नेले. त्यात हक्क आणि बुक्क या बंधूंचाही समावेश होता. महंमदाने त्यांचे धर्मपरिवर्तन करून मुसलमान बनवले होते. पुढे काही काळानंतर दक्षिणेकडील राज्यात अंदाधुंदी माजल्यामुळे महंमद तुघलकाने ही अंदाधुंदी दडपून टाकण्यासाठी आपले काही सैन्य दक्षिणेकडे पाठवले. सैन्याला दक्षिणेचा रस्ता दाखवण्यासाठी आपल्या कैदेतील दक्षिणेकडील काही कैद्यांना मुक्त करून त्यांनाही सैन्यासमवेत पाठवून दिले. या संधीचा आणि गोंधळाचा लाभ उचलून हक्क अन् बुक्क हे दोघेही दक्षिणेकडे पळून जाण्यात यशस्वी झाले. दक्षिणेत येताच ते दोघेही प्रथम विद्यारण्यस्वामींच्या मठात गेले.

विद्यारण्यस्वामी अत्यंत विद्वान आणि संन्यस्त वृत्तीचे होते. दक्षिणेत हिंदूंचे एक बलशाली आणि संपन्न राज्य स्थापन करण्याचे स्वप्न उराशी बाळगून या दृष्टीने विद्यारण्यस्वामी कधीपासूनच प्रयत्नरत होते. हक्क आणि बुक्क यांनी विद्यारण्यस्वामींची भेट घेतल्यानंतर त्यांना महंमद तुघलकाने केलेले आक्रमण आणि विध्वंस यांचा संपूर्ण इतिहास सांगितला अन् इस्लाम त्यागून परत हिंदु धर्म स्वीकारण्याची त्यांची इच्छा बोलून दाखवली. विद्यारण्यस्वामींनी हक्क आणि बुक्क या बंधूंच्या हृदयात धगधगणार्‍या हिंदुत्वाच्या ज्वालेला ओळखले. त्यांनी दोघांनाही हिंदु धर्माची दीक्षा दिली आणि त्यांच्या हातूनच विजयनगरच्या एका हिंदु साम्राज्याचा भक्कम पाया घातला.

वर्ष १३३६ मध्ये स्थापन झालेले हे हिंदु साम्राज्य पुढे ३१० वर्ष अस्तित्वात होते. हे साम्राज्य जेवढे बलशाली आणि संपन्न होते, तेवढेच या राज्याने साहित्य, संगीत, कला, स्थापत्य आणि शिल्प या शास्त्रांत उत्कर्षाचा कळस गाठला होता. तात्पर्य, ‘कुणाही विधर्मीयांना बळजोरीने अथवा आमीष दाखवून त्यांचे धर्मांतर करणे, म्हणजे जसे हिंदुत्व आहे, तद्वतच परधर्मात गेलेल्यांना परत स्वधर्माची दीक्षा देणे’, म्हणजेही हिंदुत्वच आहे.

भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये मी अवतार केव्हा आणि कशासाठी घेतो हे ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ – भगवद्गीता, अध्याय ४, श्‍लोक ७ आणि ८’ या श्‍लोकाद्वारे सांगतांना ‘जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते (म्हणजे लोक धर्माचरण करीत नाहीत) आणि अधर्म बळावू लागतो, तेव्हा मी स्वतः प्रकट होतो. सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी आणि धर्मस्थापनेसाठी मी प्रत्येक युगात पुनःपुन्हा अवतार घेतो’, असे म्हटले आहे. तात्पर्य, ‘धर्मस्थापनेसाठी केवळ सज्जनांचे रक्षण करूनच भागत नाही, तर त्यांसाठी दुष्प्रवृत्तींचाही नाश करावाच लागतो, अशी शिकवण देणे, म्हणजेच हिंदुत्व.’ हिंदुत्व एकांगी नसून ते असे बहुआयामी आणि परिपूर्ण असे तत्त्वज्ञान आहे.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.