पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍या विरोधात पुण्‍यातील शिवाजीनगर न्‍यायालयात फौजदारी खटला नोंद !

पू. संभाजीराव भिडे गुरुजी व तुषार गांधी

पुणे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी राष्‍ट्रपुरुष आणि विचारवंत यांच्‍याबद्दल अपकीर्ती करणारे वक्‍तव्‍य करून समाजात तेढ निर्माण केल्‍याचा आरोप करत गांधीजींचे पणतू तुषार गांधी आणि इतर सामाजिक कार्यकर्ते यांनी येथील शिवाजीनगर न्‍यायालयात फौजदारी खटला प्रविष्‍ट केला आहे. पोलिसांवर राजकीय दबाव असल्‍यामुळे भिडे यांच्‍या विरोधात केलेल्‍या तक्रारींची ते नोंद घेत नाहीत. त्‍यामुळेच पू. संभाजीराव भिडेगुरुजी हे अनियंत्रित आणि बेताल वक्‍तव्‍य करतात, असे तक्रारदार तुषार गांधी यांनी म्‍हटले आहे.

पंतप्रधान मोदी हे जागतिक स्‍तरावरील नेत्‍यांना राजघाटावर महात्‍मा गांधी यांच्‍या समाधीवर नतमस्‍तक होण्‍यासाठी घेऊन जातात; तर दुसरीकडे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्‍यासारखे लोक ताळतंत्र न बाळगता समाजात तेढ निर्माण करणारे वक्‍तव्‍य करतात. त्‍यामुळे पोलिसांनी अशी विधाने करणार्‍या प्रवृत्तींच्‍या विरोधात कारवाई करावी, असे तक्रारदारांचे वकील अधिवक्‍ता असिम सरोदे यांनी म्‍हटले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्‍टेंबर या दिवशी होणार आहे.