बहुविविधतेतून संपन्नता प्रदान करणार्या फणसाला जागतिक दर्जाच्या फळाची मान्यता मिळण्यासाठी प्रयत्नरत रहा !
लांजा (रत्नागिरी) येथील ‘फणस किंग’ म्हणून ओळखले जाणारे, तसेच ‘कृषी गौरव’ पुरस्कार प्राप्त श्री. मिथिलेश देसाई यांच्यामुळे कोकणचा फणस आता सातासमुद्रापार पोचणार आहे. त्यांच्या ‘जॅकफ्रूट ऑफ इंडिया’ या आस्थापनाने लंडनमधील ‘सर्क्युलरिटी इनोव्हेशन हब’ (‘CIH’) या आस्थापनासमवेत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. अर्थातच या करारामुळे आता फणसाला सुगीचे दिवस येतील आणि शेतकर्यांच्या समृद्धतेतही भर पडेल, हे निश्चित ! रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील १ सहस्राहून अधिक शेतकर्यांना याचा लाभ होईल. मराठी माणसाने, त्यातही कोकणवासियाने त्यांच्या उत्पादनासाठी सातासमुद्रापार जाण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. यामुळे सर्वच स्तरांवरून देसाई यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जाऊन प्रगतीशील भविष्यासाठी त्यांना शुभेच्छाही देण्यात येत आहेत.
अडचणींतून भरभराटाकडे !
मिथिलेश यांचा फणस लागवडीपर्यंत पोचण्याचा प्रवासही प्रतिकूल होता. त्यांनी ‘बी.टेक. अॅग्रीकल्चरल इंजिनीयरिंग’चे शिक्षण घेतले. त्यानंतर ‘केंद्रीय लोकसेवा आयोगा’ची परीक्षा दिली; पण त्यात अपयश आल्याने वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी दोघांनी मिळून फणसांच्या ४०० झाडांची लागवड केली. तेव्हा इतर शेतकर्यांनी मिथिलेश आणि त्यांचे वडील यांची चेष्टा केली; पण दोघांनीही खचून न जाता चिकाटी आणि जिद्द कायम राखत या लागवडीवर लक्ष केंद्रित केले. व्हिएतनाम, मलेशिया, सिंगापूर, ब्राझिल, युके, अमेरिका येथील फणसाच्या प्रजातींची लागवड केली. त्यातूनच पुढील भरभराट साधता आली. जगात फणसांच्या १२८ प्रजाती सापडतात. त्यांपैकी मिथिलेश देसाई यांच्या फणस रोपवाटिकेमध्ये ७६ प्रजातींची रोपे मिळतात. कृषी क्रांती घडवण्यासाठी १०० प्रजातींपर्यंत पोचण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करतच रहावी लागणार आहे. मिथिलेश म्हणतात, ‘‘मातीमध्ये हात घालण्याची आपली सिद्धता असेल, तर आपल्याला १०० टक्के यश मिळतेच.’’ मिथिलेश यांचे वडील हरिश्चंद्र देसाई सांगतात, ‘‘वर्ष १९७२ च्या दुष्काळाच्या कालावधीत साधारणतः ४ मास फणसाची भाजीच खावी लागली होती. त्यामुळे फणस हे फळ नसून अन्न आहे, हे मनात पक्के झाले.’’ त्यानंतर तेही फणस लागवडीच्या दृष्टीने प्रयत्नरत झाले. वडील आणि मुलगा यांच्या उदाहरणातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. ध्येयपूर्तीसाठी असलेली जिद्दच त्यांना भरभराटीकडे घेऊन गेली. प्रतिकूलतेतही एखादी व्यक्ती जेव्हा खंबीरपणे उभी रहाते, तेव्हा ती निश्चितच यशस्वी होते. ‘उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः ।’, असे संस्कृतमधील सुभाषित आहे. याचा अर्थ ‘काम केल्यामुळेच कार्य पूर्ण होते, केवळ स्वप्न बघून नाही’, असा आहे. याचीच प्रचीती ३० वर्षीय मिथिलेश यांच्या उदाहरणातून आपल्याला येते. तरुण वयात अशा प्रकारे कार्यतत्पर रहाण्यासाठी आणि यशाचा मार्ग चोखाळण्यासाठी मिथिलेश यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवायला हवे.
जागतिक दर्जाचे फळ !
सर्वसाधारणतः राज्यस्तरावर विचार केल्यास फणस हे तसे दुर्लक्षित फळ म्हणूनच गणले जाते. कोकणात फणसाला जरी मोठा मान असला, तरी राज्यात अन्य ठिकाणी फणसाला तितकेसे महत्त्व लाभलेले नाही. त्यामुळे फणसाची अवीट गोडी चाखण्यासाठी कुणालाही कोकणाचीच वाट धरावी लागते. देवगड किंवा रत्नागिरी येथील हापूस आंबा जितका लोकप्रिय आहे, तितक्या प्रमाणात फणसाला नावलौकिक मिळत नाही. केरळमध्ये फणस हे ‘राज्य फळ’ म्हणून ओळखले जाते; पण कोकणचा मेवा असणार्या फणसाला तितकी ओळख महाराष्ट्रात मिळालेली नाही. फणसातील गर्यांमध्ये जसा गोडवा आहे, तशीच विविधताही आहे. त्यामुळेच तर फणसाच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ, उदा. चॉकलेट, पेढे, डोसे, फणस पोळी इत्यादी बनवले जातात. असे हे बहुविविधतेतून संपन्नता प्रदान करणारे फळ आहे.
देसाई यांच्याप्रमाणे प्रयत्न केल्यास फणसालाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी बाजारपेठ मिळून तो लोकप्रिय होऊ शकतो. देसाई यांची दूरदृष्टी वाखाणण्यासारखी आहे. यामुळेच त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळाली आहे. प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. फणस उत्पादनात यापूर्वी बांगलादेश भारतापेक्षा पुढे होता. आता भारतही त्या दिशेने पावले टाकत फणसाच्या माध्यमातून प्रगतीपथावर आहे. केरळ आणि तमिळनाडू ही राज्ये फणस विक्रीत अग्रेसर आहेत. दोन्ही राज्ये प्रतिदिन १०० टन फणस विकतात. त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे २० लाख डॉलरपर्यंत जाते. मग यात महाराष्ट्राने तरी का मागे रहावे ? देसाई यांच्याप्रमाणे फणस उत्पादन करणार्यांनीही आपापला खारीचा वाटा उचलावा. फणस आणि त्याचे मधाळ गरे या माध्यमातून महाराष्ट्राची भरभराट घडवून आणायला हवी. कोकणच्या मेव्याच्या माध्यमातून राज्याला एक दैवी देणगीच लाभली आहे. तिचा आपण लाभ करून घ्यायला हवा. कोकणचा मेवा सर्वदूर पोचवून जागतिक स्तरावर महाराष्ट्राचेही नाव उज्ज्वल करायला हवे.
अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रात शिक्षण घेऊनही मिथिलेश देसाई यांनी कृषी क्षेत्राकडे वळून तेथे क्रांती घडवली. फणसाच्या विक्रीच्या संदर्भात परिवर्तन घडवून आणून सर्वांनाच वेगळी चालना दिली. फणस उत्पादन करणार्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्नही केला. मिथिलेश आणि त्यांचे वडील यांच्या प्रयत्नांचा आदर्श घेऊन शेतकरी अन् इच्छुक तरुण यांनी पावले उचलावीत. मिथिलेश म्हणतात, ‘‘येत्या १० ते २५ वर्षांत संपूर्ण जगाची भूक १० टक्के भागवू शकेल’, असे एकमेव अन्न किंवा फळ म्हणजे फणस आहे.’’ शेतकर्यांची आर्थिक गणिते पालटण्याची क्षमता असणार्या आणि देशाची अर्थव्यवस्था पालटणार्या फणसाला लवकरच जागतिक दर्जाचे फळ म्हणून ओळख मिळेल, यात शंका नाही.