नागपूर – एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करून सर्वांना समान पातळीवर आणा. या संदर्भात आपण राज्यातील मराठा संघटनांशी चर्चा करून त्यांची समजूत काढू. सर्वांना समान व्यासपिठावर आणण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन येथील संस्थानिक आणि भोसले घराण्याचे विद्यमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी ७ सप्टेंबर या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना केले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
मुधोजीराजे भोसले पुढे म्हणाले की, अंतरवाली सराटी गावात जो प्रकार घडला, तो दुर्दैवी होता. आरक्षणासाठी मराठा समाज पूर्वीपासून एकजुटीने काम करत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी आणखी किती वर्ष संघर्ष करायचा ? मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीमार करणे हे निंदनीय आहे. मराठ्यांची आरक्षणाची मागणी प्रामुख्याने पुढच्या पिढीसाठी आहे. राजघराणे आणि उद्योजक यांना आरक्षण नको; पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षण यांसाठी आरक्षण हवे आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नकोच. एकदा समान नागरी कायदा लागू झाला, तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी.