पाकला चंद्रावर यान पाठवण्यासाठी आणखी २-३ दशके लागतील ! – अभिनेत्री सेहर शिनवारी

पाकिस्तानी अभिनेत्रीचा पाकला घरचा अहेर !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या यशानंतर जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी यांनी भारताचे कौतुक करून पाकच्या दुर्दशेविषयी दु:ख व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.

शिनवारी म्हणाल्या की, माझे भारताशी शत्रुत्व असले, तरी ‘चंद्रयान-३’च्या माध्यमातून भारताने अंतराळ संशोधनात इतिहास घडवल्यासाठी मी ‘इस्रो’चे अभिनंदन करते. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील दरी सर्व विषयांमध्ये इतकी वाढली आहे की, आता पाकिस्तानला चंद्रावर पोचण्यासाठी २ ते ३ दशके लागतील. दुर्दैवाने आजच्या आपल्या दुर्दशेला इतर कुणी नव्हे, तर आपण स्वतःच उत्तरदायी आहोत.

शिनवारी यांनी या ट्वीटआधी उर्दू भाषेत आणखी एक ट्वीट केले आहे. त्यात त्या म्हणाल्या की, आज भारत कुठे पोचला आहे, तर आपला देश (पाकिस्तान) मौलवी तमिजुद्दीनची विधानसभा अनधिकृतपणे विसर्जित केल्यामुळे कायदा आणि राज्यघटना यांच्या वर्चस्वासाठी झटत आहे. हे पाहून खरोखरच आपली मान लज्जेने झुकली आहे. आज भारताने हे सिद्ध केले आहे की, आपल्यातील दरी इतकी वाढली आहे की, ती अल्प करणे आता पाकच्या हातात राहिलेले नाही.