सकल हिंदु समाज, लांजाच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
लांजा – मिरा रोड येथील दत्तक घेतलेल्या ३ मुलांचे धर्मांतरण आणि मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी आरोपींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असे निवेदन येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने येथील मा. तहसीलदार आणि मा. गृहमंत्री यांना देण्यात आले. येथील तहसीलदार प्रमोद कदम यांनी हे निवेदन स्वीकारले.
या निवेदनात म्हटले आहे की,
पीडित मुलगी, तिची लहान बहीण आणि भाऊ हे तिच्या आई-वडिलांसह कांदिवली येथील डहाणूकर वाडी येथे भाड्याने रहात होते. त्यांच्या वडिलांचे आणि आईचे निधन झाल्यानंतर आर्.ए. फाऊंडेशनच्या साहाय्याने अंधेरी येथील ‘सेंट कॅथरीन’ या अनाथाश्रमात त्या मुलांना भरती करण्यात आले. त्यानंतर पूर्वी पीडितेच्या शेजारी रहाणारी शाहीन खान हिने या मुलांना दत्तक घेतले. तिने त्या मुलांना मिरा रोड, श्रीराम टॉवरमधील खोली नंबर ६०७ आणि ६०८ या ‘फ्लॅट’मध्ये रहायला नेले.
त्यानंतर बळजोरीने सर्व मुलांचे मौलवींकडून धर्मांतर करण्यात आले. बुरखा आणि हिरवे कपडे देऊन अल्लाच्या नावाने प्रार्थना करायला लावली. धर्मांतर केल्यानंतर पीडितेच्या भावाला आणि बहिणीला गोमांस खायला दिले. शाहीन खान हिचा नातेवाईक असलेला अबूझईद खान याने पीडित मुलगी एकटी असतांना तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहीन खान, अबुझईद खान, निखत मर्चंट यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
या विषयाची दखल घेऊन दत्तक घेणार्यांची पूर्ण चौकशी करणे, हे अनाथाश्रमाचे कर्तव्य होते. सेंट कॅथरीन या अनाथाश्रमाचे हे दायित्व असल्याने, त्यांचीही या प्रकरणी कठोर चौकशी व्हावी आणि संबंधित सर्व आरोपींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी विनंती आहे.