आतंकवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’कडून (‘टीटीपी’कडून) पाकवर टीका, तर भारताचे कौतुक !

इस्लामाबाद (पाकिस्तन) – पाकिस्तानमधील जिहादी आतंकवादी संघटना  ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) १४ ऑगस्टला झालेल्या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पाकवर टीका करत भारताचे कौतुक केले. ‘आज भारत जगातील ५ वी मोठी अर्थव्यवस्था आहे’, असे टीटीपीने म्हटले आहे. टीटीपीने दावा केला आहे की, लवकरच त्यांची संघटना पाकिस्तानमध्ये शरीयत कायदा लागू करून पाकला खरे स्वातंत्र्य मिळवून देईल.

टीटीपीने म्हटले की, १४ ऑगस्ट १९४७ या दिवशी पाकिस्तानला जे स्वातंत्र्य मिळाले, त्याचा तो लाभ उठवू शकला नाही. आर्थिक संकट, गरीबी, हिंसा, भ्रष्टाचार, इस्लामी व्यवस्थेचा अभाव यांमुळे देशाची शांती आणि समृद्धता यांना दूर केले आहे. स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांत पाक एक आत्मनिर्भर देश म्हणून विकसित होऊ शकला नाही.  सध्याच्या पाकवरील संकटाला पाकचे सैन्यच उत्तरदायी आहे, असा आरोपही करण्यात आला आहे.