६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये सर्वच जण हिंदु होते; धर्मांतरामुळे ते मुसलमान झाले !  

माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद यांची स्पष्टोक्ती !

डोडा (जम्मू-काश्मीर) – आमच्याकडे काश्मीरचे उदाहरण आहे. ६०० वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये एकही मुसलमान नव्हता, काश्मिरी हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आले होते. केवळ भारतातच नाही, तर जगभर इस्लाम धर्म स्वीकारला गेला. इस्लाम १ सहस्र ४०० वर्षे जुना आहे; पण हिंदु धर्म त्याहून जुना आहे, अशी स्पष्टोक्ती ‘डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’चे प्रमुख गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. ते ९ ऑगस्ट या दिवशी येथे झालेल्या एका मेळाव्याला संबोधित करतांना बोलत होते. त्याचा व्हिडिओ आता सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. ‘धर्माला राजकारणाशी जोडले जाऊ नये. लोकांनी धर्माच्या आधारे मतदान करू नये’, असे आवाहनही गुलाब नबी आझाद यांनी या वेळी केले.

गुलाम नबी आझाद पुढे म्हणाले की, आम्ही हे राज्य हिंदु, मुसलमान, दलित आणि काश्मिरी यांच्यासाठी बनवले आहे. ही आमची भूमी आहे. येथे बाहेरून कुणी आलेले नाही. मी संसदेत अशा अनेक गोष्टी पाहिल्या आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोचत नाहीत. आमचा एक सहकारी खासदार म्हणाले, ‘काश्मीरमध्ये काही लोक बाहेरून आले आहेत’; पण मी ते नाकारले. आमच्या भारतात इस्लाम अवघा १ सहस्र ४०० वर्षे जुना आहे. हिंदु धर्म खूप जुना आहे. १०-२० जण मोगल सैन्यातून येथे आले आणि त्यांनी हिंदूंचे धर्मांतर केले.

संपादकीय भूमिका

भारतातील मुसलमानांचा हाच इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी इतिहासामध्ये झालेल्या चुका सुधारून पुन्हा हिंदु धर्मात यावे आणि देशाच्या विकासामध्ये सहभागी व्हावे !