मदनलाल धिंग्रा : एक विश्‍व गौरव !

आज १७ ऑगस्‍ट या दिवशी मदनलाल धिंग्रा यांचा ११४ वा बलीदानदिन आहे. त्‍या निमित्ताने विनम्र अभिवादन !

जगावर राज्‍य करणार्‍या इंग्रजांच्‍या राजधानीत लंडनमध्‍ये सर कर्झन वायली यांना (१ जुलै १९०९ या दिवशी) कंठस्नान घालणारा ‘हिंदुस्‍थानचा पहिला क्रांतीकारक’ म्‍हणून विश्‍वाने मदनलाल धिंग्रा यांचा गौरव केला.

मदनलाल धिंग्रा यांनी ‘सर कर्झन वायली यांचा वध का केला ?’, हे सांगणारे वक्‍तव्‍य केले होते; पण ते ब्रिटीश सरकारने प्रसिद्ध होऊ दिले नाही; मात्र स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी ते प्रसिद्ध केले. ते प्रसिद्ध होताच संपूर्ण जगात खळबळ उडाली. तशा वार्ता आयर्लंड, युरोपमधील देश आणि अमेरिका येथून आल्‍या. देशोदेशीच्‍या वृत्तपत्रांनीही मदनलाल धिंग्रा यांचे वक्‍तव्‍य प्रसिद्ध करतांना ‘ब्रिटीश सरकारला थकवले – धिंग्रांचे दाबून टाकलेले वक्‍तव्‍य अद़्‍भुत चमत्‍कार’, अशा मोठमोठ्या मथळ्‍यांनी तेथील वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली होती. आयर्लंडच्‍या वृत्तपत्राने ‘आयर्लंड मदनलाल धिंग्रा यांचा सन्‍मान करत आहे’, असा मथळा देऊन एक भित्तीपत्रक छापले. या भित्तीपत्रकातील अक्षरे १२ इंच लांबीची आणि काळ्‍या ठळक अक्षरात छापली होती. त्‍यावर लिहिले होते…‘आपल्‍या देशासाठी स्‍वतःचे सर्वस्‍व बलीदान करणार्‍या मदनलाल धिंग्रा यांचा आयर्लंड सन्‍मान करत आहे.’ अशी भित्तीपत्रके अनेक मैलांच्‍या टापूत झळकली होती.   इटलीमधील एका वृत्तपत्राने एक सूचक चित्र काढून इंग्‍लंडला हादरवले. या चित्रात एक मोठा वाडा काढला होता. त्‍या वाड्याच्‍या पायथ्‍याशी हिंदुस्‍थान, त्‍यावर इजिप्‍त, सोनालीलँड, त्‍यावर वसाहती आणि त्‍यावर बसलेले इंग्‍लंड दाखवले. एक स्‍फोट होतो, तो हिंदुस्‍थानातील क्रांतीकारकांनी केला आणि तो मोठा वाडा कोसळून खाली पडला आणि इंग्‍लंड ओरडतो आहे, ‘अरे, हा वाडा आता ढासळला आहे. माझ्‍या अंगाला भीतीने कापरे भरले आहे.’

श्री. दुर्गेश परुळकर

१. मदनलाल धिंग्रा यांच्‍याविषयी इंग्रज नागरिक ब्‍लंट यांनी केलेले वक्‍तव्‍य

मदनलाल धिंग्रा यांच्‍या त्‍या वक्‍तव्‍याचा विलक्षण प्रभाव हिंदुस्‍थानवर प्रेम करणार्‍या काही प्रामाणिक इंग्रज नागरिकांवर झाला. त्‍यात ब्‍लंटसाहेब होते. त्‍यांनी मदनलाल धिंग्रा यांना फाशीची शिक्षा ज्‍या दिवशी देण्‍यात आली, त्‍याच्‍या दुसर्‍या दिवशी आपल्‍या दैनंदिनीत (म्‍हणजेच १८ ऑगस्‍ट १९०९ या दिवशी) लिहिले, ‘Dhingra’s last dying pronouncement is published in the Daily News…It is a noble declaration of its faith in the destinies of his Motherland, and his own. No greater fortitude was ever shown by a martyr for any faith. With such men to love her the mother India must succeed.’

(भावार्थ : धिंग्रा यांचे शेवटचे मृत्‍यूपूर्व वक्‍तव्‍य ‘डेली न्‍यूज’मध्‍ये प्रसिद्ध झाले आहे. आपल्‍या मातृभूमीच्‍या आणि स्‍वतःच्‍या भवितव्‍यासंबंधीच्‍या आपल्‍या विश्‍वासाचीच ती उदात्त घोषणा आहे. कोणत्‍याही हुतात्‍म्‍याने कोणत्‍याही धर्मासाठी याहून अधिक मोठे धैर्य यापूर्वी कधीही दाखवले नाही. अशी माणसे तिच्‍यावर (भारतमातेवर) प्रीती करणारी तिच्‍यापाशी असतात. ती हिंदूंची मातृभूमी यशस्‍वी, म्‍हणजेच स्‍वतंत्र झालीच पाहिजे.)

२. विन्‍स्‍टन चर्चिल यांनी मदनलाल धिंग्रांविषयी काढलेले गौरवोद़्‍गार

मदनलाल धिंग्रांच्‍या या वक्‍तव्‍याचा प्रभाव लॉईड जॉर्ज आणि विन्‍स्‍टन चर्चिल यांच्‍यावरही पडल्‍या वाचून राहिला नाही. चर्चिल काय म्‍हणाले ? ते ब्‍लंटसाहेब यांनी त्‍यांच्‍या दैनंदिनीत लिहून ठेवले आहे…‘Dhingra will be remembered two thousand years hence, as we remember Regulas , Caractacus and Plutarch’s heroes and Churchill quoted with admiration Dhingra’s last words as the finest ever made in the name of Patriotism. (भावार्थ : चर्चिल म्‍हणाले, ‘आपल्‍याला रेग्‍युलस कॅरॅक्‍टकस आणि प्‍लूटार्कच्‍या वीर पुरुषांची आज आठवण येते. तशीच २ सहस्र वर्षांनी सुद्धा धिंग्रांची आठवण येत राहील.’ यानंतर चर्चिलने मग देशभक्‍तीच्‍या भावनेने उच्‍चारलेले सुंदर शब्‍द म्‍हणून धिंग्रांचे अंतिम वक्‍तव्‍य म्‍हणून दाखवले.)

३. सावरकर यांनी धिंग्रा यांचे वक्‍तव्‍य पोस्‍टकार्डवर छापून जगभरातील क्रांतीकारकांना पाठवणे

देश-विदेशातील अनेकांना मदनलाल धिंग्रांच्‍या वक्‍तव्‍याने प्रभावित केले. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी मदनलाल यांचे ते वक्‍तव्‍य त्‍यांच्‍या छायाचित्रासह पोस्‍टकार्डांवर छापले. ती सर्व पोस्‍टकार्डस् जगभरातील क्रांतीकारकांना पाठवण्‍यात आली. हिंदुस्‍थानात पोलिसांनी ती पकडली आणि सर्व जप्‍त केली. सावरकर यांनी मात्र मदनलाल धिंग्रांचे ते वक्‍तव्‍य एक ‘स्‍मृतीपत्र’ म्‍हणून स्‍वतःजवळ ठेवले आणि त्‍यांच्‍या संपर्कात येणार्‍याला ते एक रुपयाला देऊ लागले. त्‍यातून मिळालेले धन त्‍यांनी क्रांतीकार्यासाठी उपयोगी आणले.

४. हिंदुस्‍थानातील ब्रिटीश सार्वभौमत्‍वाला मरणांतिक तडाखा दिला ! – क्रांतीकारक लाला हरदयाळ

‘वन्‍दे मातरम्’ नावाचे एक पत्र जिनेव्‍हाहून प्रसिद्ध होत होते. त्‍याच्‍या १० सप्‍टेंबर १९०९ च्‍या अंकात लाला हरदयाळ या क्रांतीकारकाने धिंग्रांची स्‍तुती करणारा लेख लिहिला. या लेखात लाला हरदयाळ लिहितात…‘धिंग्राजी अभियोगाच्‍या प्रत्‍येक क्षणाला प्राचीन काळातील एखाद्या अमर वीराप्रमाणे वागले. मृत्‍यूवर त्‍यांनी प्रेयसीप्रमाणे प्रेम करून  रजपूत आणि शीख यांच्‍या इतिहासाची आम्‍हाला आठवण करून दिली. इंग्‍लंडला वाटते की, आपण धिंग्रांना मारून टाकले आहे. वास्‍तविक ते चिरंजीव झाले आहेत. त्‍यांनी हिंदुस्‍थानातील ब्रिटीश सार्वभौमत्‍वाला मरणांतिक तडाखा दिला आहे. भावी काळात जेव्‍हा हिंदुस्‍थानातील ब्रिटीश साम्राज्‍य धुळीला मिळालेले असेल, तेव्‍हा धिंग्रांचे पुतळे आमच्‍या प्रमुख नगरातील चौकाचौकातून वैभवात उभारले जातील. ते आमच्‍या मुलाबाळांना एका दूरच्‍या भूमीवर आपल्‍याला प्रिय असलेल्‍या कार्यासाठी देह ठेवणार्‍या धिंग्रांच्‍या उदात्त जीवनाचे आणि मरणाचे स्‍मरण करून देतील.

५. मदनलाल यांचा आदर्श हिंदुस्‍थानासह जगभरातील सर्व देशभक्‍तांनी ठेवावा ! – पंडित श्‍यामजी कृष्‍ण वर्मा

हिंदुस्‍थानचे मान्‍यवर मित्र गाय आल्‍ड्रेड यांनी पंडित श्‍यामजी कृष्‍ण वर्मा यांचा ‘इंडियन सोसायॉलॉजिस्‍ट’ हा ऑगस्‍ट १९०९ चा अंक सर्व प्रकारचा धोका पत्‍करून छापला. या अंकात श्‍यामजी कृष्‍ण वर्मा यांनी ‘इंग्‍लंडमधील भारतीय हौतात्‍म्‍य’, असे शीर्षक असलेला अग्रलेख लिहिला. या अग्रलेखात श्‍यामजी कृष्‍ण वर्मा यांनी मदनलालचे शौर्य, धैर्य आणि देशभक्‍ती यांचे कौतुक केले होते. एवढेच नव्‍हे, तर ‘मदनलालचा आदर्श केवळ हिंदुस्‍थानातील नव्‍हे, तर जगभरातील सर्व देशभक्‍तांनी आपल्‍यासमोर ठेवावा आणि गुलामगिरीत खितपत पडलेले आपले राष्‍ट्र मुक्‍त करावे’, असे म्‍हणून गौरव केला होता.

६. मदनलाल यांच्‍यावरील टिकेला ब्‍लंट यांनी दिलेले उत्तर

क्रांतीकारकांचा द्वेष करणार्‍या इंग्रजांनी मदनलालच्‍या विरोधात टिकेचा सूर काढला. त्‍यात इंग्‍लंडच्‍या राजाचे मित्र असलेले लाइन स्‍टीव्‍हन्‍स सुद्धा होते. त्‍यांचा समाचार घेतांना ब्‍लंटसाहेब म्‍हणाले, ‘१९ ऑगस्‍ट १९०९ या दिवशी लाइन स्‍टीव्‍हन्‍स हे मदनलालने केलेल्‍या वधाविषयी बोलले. त्‍याने तरी सरते शेवटी त्‍यांच्‍या बादशाही मित्राचे हिंदुस्‍थानच्‍या परिस्‍थितीत काहीतरी बिघडलेले आहे, अशी निश्‍चिती पटलेली दिसते. राजकीय हत्‍या तिच्‍या उद्दिष्‍टाचाच पराभव करते, असे लोक म्‍हणतात; पण हा मूर्खपणा आहे. स्‍वार्थाच्‍या उद्धटपणालाही सीमा असते, अशी स्‍वार्थी राज्‍यकर्त्‍यांची निश्‍चिती पटण्‍यासाठी तसा धक्‍काच आवश्‍यक असतो. इंग्‍लंड कधीही धमक्‍यांना नमत नाही. या दुसर्‍या एका विचित्र भ्रांतीसारखेच हे आहे. माझा तर असा अनुभव आहे की, इंग्‍लंडचे तोंड चांगले थोबाडले गेल्‍यावरच ते क्षमा मागते; त्‍यापूर्वी कधीही नाही.’

अशा प्रकारे मदनलाल धिंग्रा यांचा सार्‍या विश्‍वाने गौरव केला. मदनलाल यांना १७ ऑगस्‍ट १९०९ या दिवशी फाशी देण्‍यात आले. मदनलाल धिंग्रा यांच्‍या स्‍मृतींना विनम्र अभिवादन !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, डोंबिवली. (४.८.२०२३)

मदनलाल धिंग्रा यांनी न्‍यायालयात सादर केलेले निवेदन

(स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांनी मदनलाल धिंग्रा यांना कर्झन वायलीचा वध करण्‍यापूर्वी एक निवेदन लिहून दिले होते. हे निवेदन मदनलाल यांच्‍या खिशात होते. पोलिसांनी ते जप्‍त केले. धिंग्रांनी सावरकर यांनी लिहून दिलेले निवेदन पाठ केले नव्‍हते, तरीही त्‍यांनी स्‍वतःच्‍या स्‍वतंत्र शैलीत उत्‍स्‍फूर्तपणे न्‍यायालयात उत्तम इंग्रजीत जे वक्‍तव्‍य निवेदन केले, याचा मराठी अनुवाद खालीलप्रमाणे आहे.)

‘माझ्‍या स्‍वतःच्‍या बचावासाठी मला स्‍वतःला काहीही म्‍हणायचे नाही. तथापि माझ्‍या कृत्‍याची न्‍याय्‍यता सिद्ध करण्‍यासाठी मला मात्र काही सांगावयाचे आहे. माझ्‍या स्‍वतःविषयी म्‍हणाल, तर कोणत्‍याही आंग्‍ल (इंग्रज) न्‍यायालयाला मला अटक करून कारागृहात अडकवून ठेवण्‍याचा अधिकार नाही किंवा मला देहांताची शिक्षा देण्‍याचा अधिकार नाही आणि याच कारणासाठी माझ्‍या बचावासाठी मी कुणीही वकील दिलेला नाही.

मी पुन्‍हा म्‍हणतो की, हा देश (इंग्‍लंड) जर्मनांनी पादाक्रांत केला असता त्‍यांच्‍याविरुद्ध एखाद्या इंग्रजाने लढणे, हे जर देशाभिमानाचे कृत्‍य असेल, तर मी इंग्रजांविरुद्ध लढणे, हे कितीतरी अधिक न्‍याय्‍य आणि देशाभिमानाचे आहे ! गेल्‍या ५० वर्षांतील ८ कोटी हिंदी लोकांच्‍या वधाला मी इंग्रजांनाच उत्तरदायी समजतो आणि हिंदुस्‍थानातून या देशात प्रतिवर्षी १० कोटी पौंड आणण्‍याविषयी सुद्धा तेच उत्तरदायी आहेत. येथील इंग्रज लोक आपल्‍या देश बांधवांना जे करण्‍याचा उपदेश करतात, तेच करणार्‍या माझ्‍या देशभक्‍त बांधवांना दिल्‍या गेलेल्‍या फाशीच्‍या आणि हद्दपारीच्‍या शिक्षांविषयी सुद्धा त्‍यांना मी उत्तरदायी धरतो. हिंदुस्‍थानात जाऊन प्रतिमास १०० पौंड एखादा इंग्रज मनुष्‍य मिळवतो, याचा अर्थ तो माझ्‍या १ सहस्र गरीब देशबांधवांना देहांताची शिक्षा सुनावतो, असाच उघड उघड होतो; कारण आपल्‍या स्‍वतःच्‍या चैनीसाठी आणि सुखासाठी प्रतिमास जे १०० पौंड हा इंग्रज उडवतो, त्‍यावर हे १ सहस्र लोक सहज जगू शकले असते !

‘ज्‍याप्रमाणे जर्मनांना हा देश पादाक्रांत करण्‍याचा अधिकार नाही, त्‍याचप्रमाणे हिंदुस्‍थान देश पादाक्रांत करण्‍याचा इंग्रज लोकांना अधिकार नाही. आमची पवित्र भूमी भ्रष्‍ट करणार्‍या इंग्रज मनुष्‍याला आम्‍ही ठार करणे’, हे संपूर्णपणे समर्थनीय आहे. इंग्रज लोकांच्‍या भीषण ढोंगाविषयी, त्‍यांनी चालवलेल्‍या नाटकांविषयी आणि विडंबनाविषयी मला आश्‍चर्य वाटते. ज्‍या वेळी हिंदुस्‍थानात भयंकर अत्‍याचार आणि भीषण छळ चाललेला आहे, त्‍याच वेळी दुसरीकडे कांगो आणि रशिया येथील लोकांसारख्‍या पददलित लोकांचे कैवारी म्‍हणून ते मिरवतात. उदाहरणार्थ प्रतिवर्षी २० लाख लोकांची हत्‍या आणि आमच्‍या महिलांवरील अत्‍याचार !

जर हा देश जर्मनांनी व्‍यापला आणि इंग्‍लंडमधील रस्‍त्‍यांमधून विजेत्‍यांच्‍या दिमाखाने ते चालत असलेले पहाणे असाहाय्‍य होऊन इंग्रज मनुष्‍याने जाऊन १-२ जर्मनांचा वध केला आणि तरीही तो इंग्रज मनुष्‍य या देशाकडून ‘देशभक्‍त’ म्‍हणून गणला जातो, तर माझ्‍या मातृभूमीच्‍या विमोचनासाठी प्रयत्न करण्‍यास मी निश्‍चितच सिद्ध आहे. मला जे दुसरे काही म्‍हणावयाचे आहे, ते न्‍यायालयासमोरील कागदपत्रांत आहे. मी हे वक्‍तव्‍य करत आहे ते मला दयेची याचना करण्‍याची इच्‍छा आहे म्‍हणून करत नाही किंवा अशा कोणत्‍याही प्रकारच्‍या गोष्‍टीसाठी करत नाही. ‘इंग्रज लोकांनी मला देहांताची शिक्षा द्यावी’, अशीच माझी इच्‍छा आहे ! कारण तसे झाले, तर माझ्‍या देशबांधवांचा प्रतिशोध अधिक तीव्र होईल ! हे वक्‍तव्‍य माझ्‍या ध्‍येयाची न्‍याय्‍यता बाहेरच्‍या जगाला आणि विशेषतः अमेरिका अन् जर्मनी येथील आमच्‍या सहानुभूतीकारांना दाखवण्‍यासाठी म्‍हणून मी न्‍यायालयापुढे करत आहे !’

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर