स्‍वातंत्र्यपूर्व भारतात घडलेल्‍या हिंसक आणि तीव्र घटनांचे ते १५ दिवस… !

उद्या १५ ऑगस्‍ट ‘भारताचा स्‍वातंत्र्यदिन’ आहे. त्‍या निमित्ताने…

१ ते १५ ऑगस्‍ट १९४७ या १५ दिवसांमध्‍ये स्‍वातंत्र्यपूर्व भारताच्‍या राजकारणात अनेक महत्त्वाच्‍या घडामोडी घडल्‍या. त्‍यांचे भारताच्‍या पुढील भविष्‍यावर अत्‍यंत दूरगामी परिणाम झाले.

१ ऑगस्‍ट या दिवशी भारताच्‍या इतिहासात घडलेल्‍या महत्त्वाच्‍या घडामोडींची माहिती येथे देत आहोत. यावरून हे लक्षात येईल की, देशाला स्‍वातंत्र्य मिळतांना देश किती भयावह स्‍थितीतून जात होता !

१. गांधीजींचा जम्‍मू-काश्‍मीर दौरा

म. गांधी

‘शुक्रवार, १ ऑगस्‍ट १९४७ हा दिवस अचानक महत्त्वाचा ठरला. या दिवशी काश्‍मीरच्‍या संदर्भात दोन मोठ्या घटना घडल्‍या, ज्‍या नंतर अतिशय महत्त्वाच्‍या ठरणार होत्‍या. पहिले म्‍हणजे म. गांधी १ ऑगस्‍टला श्रीनगरला पोचले. त्‍यांचा हा पहिलाच काश्‍मीर दौरा होता. तत्‍पूर्वी वर्ष १९१५ मध्‍ये जेव्‍हा गांधीजी नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून परतले होते आणि पहिले महायुद्ध चालू होते, तेव्‍हा काश्‍मीरचे महाराज हरि सिंह यांनी गांधींना काश्‍मीरमध्‍ये येण्‍याचे वैयक्‍तिक निमंत्रण दिले होते. त्‍या वेळी महाराज हरि सिंह अवघे २०  वर्षांचे होते; पण १९४७ मध्‍ये संपूर्ण परिस्‍थिती नाट्यमयरित्‍या पालटली होती.

या वेळी महाराज हरि सिंह आणि जम्‍मू-काश्‍मीर प्रशासन यांना गांधींची भेट अजिबात नको होती. महाराज हरि सिंह यांनी स्‍वतः व्‍हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांना एक पत्र लिहिले होते. त्‍यामध्‍ये त्‍यांनी लिहिले होते की, ‘…सर्व सर्वसमावेशक दृष्‍टीकोनातून मला तुम्‍हाला सांगायचे आहे की, या वेळी म. गांधींचा प्रस्‍तावित काश्‍मीर दौरा रहित करण्‍यात यावा. यायचेच असेल, तर शरद ऋतू संपल्‍यावर यावे. आम्‍ही पुन्‍हा एकदा सांगू इच्‍छितो की, काश्‍मीरमधील परिस्‍थिती सुधारेपर्यंत गांधी किंवा इतर कोणत्‍याही राजकारण्‍याने येथे येऊ नये…’ यजमानाने नकार देऊनही जणू कुणाच्‍या तरी घरी जातो, असेच काहीसे म्‍हणता येईल. तसे ‘काश्‍मीर आता भारत आणि पाकिस्‍तान या दोघांसाठीही दुखापतग्रस्‍त झाला आहे’, याची पूर्ण जाणीव गांधींनाही होती.

स्‍वातंत्र्य अवघ्‍या पंधरवड्यावर होते, तरीही काश्‍मीरने त्‍याचा निर्णय घोषित केलेला नव्‍हता. त्‍यामुळेच गांधींनाही त्‍यांच्‍या काश्‍मीर भेटीचा ‘भारतीय संघराज्‍यात सहभागी  होण्‍यासाठी काश्‍मीरची मोहीम’, असा अर्थ लावावा वाटला नाही; कारण ही गोष्‍ट त्‍यांच्‍या निर्माण झालेल्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाला आणि प्रतिमेला मारक ठरली असती. २९ जुलै या दिवशी काश्‍मीर दौर्‍यावर जाण्‍यापूर्वी देहलीतील त्‍यांच्‍या नियमित प्रार्थनासभेत गांधी म्‍हणाले, ‘‘मी काश्‍मीरच्‍या महाराजांना भारतामध्‍ये किंवा पाकिस्‍तानमध्‍ये सहभागी व्‍हावे, हे सांगण्‍यासाठी जात नाही. प्रत्‍यक्षात काश्‍मीरविषयी निर्णय घेण्‍याचा अधिकार काश्‍मिरी जनतेला आहे. त्‍यांनी कुठे सहभागी व्‍हायचे, हे त्‍यांनी ठरवावे. त्‍यामुळे मी काश्‍मीरमध्‍ये कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही… अगदी प्रार्थनाही… हे सर्व वैयक्‍तिकरित्‍या करीन.’’

१ ऑगस्‍ट या दिवशी गांधींनी रावळपिंडीमार्गे काश्‍मीरच्‍या श्रीनगरमध्‍ये प्रवेश केला. या वेळी त्‍यांना महाराजांनी बोलावले नसल्‍याने ते जंगलाचे कंत्राटदार किशोरीलाल सेठी यांच्‍या घरीच राहिले. ते श्रीनगरमधील सध्‍याच्‍या बार्झुुलाच्‍या ‘बोन अँड जॉईंट’ रुग्‍णालयाच्‍या अगदी जवळ होते. सेठी यांची काँग्रेस आणि नॅशनल कॉन्‍फरन्‍स या दोन्‍ही पक्षांशी जवळीक होती; पण या वेळी नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे नेते शेख अब्‍दुल्ला यांना महाराजांनी कारागृहामध्‍ये टाकलेले होते. नॅशनल कॉन्‍फरन्‍सच्‍या अनेक नेत्‍यांना काश्‍मीरमधून हाकलण्‍यात आले होते. या सर्व नेत्‍यांवर शेख अब्‍दुल्ला यांच्‍या नेतृत्‍वाखाली महाराजांविरुद्ध कट रचल्‍याचा आरोप होता. त्‍यामुळेच १ ऑगस्‍ट या दिवशी रावळपिंडीमार्गे गांधीजी श्रीनगरला येत असतांना चकलाला येथे बक्षी गुलाम महंमद आणि ख्‍वाजा गुलाम महंमद सादिक या नॅशनल कॉन्‍फरन्‍सच्‍या नेत्‍यांनी त्‍यांना कोहला पुलापर्यंत पोचवले आणि ते लाहोरला परतले. गांधींसह त्‍यांचे सचिव प्‍यारेलाल आणि दोन भाच्‍या होत्‍या.

२. एकाही राष्‍ट्रवादी हिंदु नेत्‍याची भेट न घेणारे गांधी !

श्रीनगरमध्‍ये म. गांधी यांनी सेठी यांच्‍या घरी थोडा वेळ विश्रांंती घेतल्‍यानंतर त्‍यांना चमूला तलावाकडे नेण्‍यात आले. गांधीजींच्‍या या संपूर्ण दौर्‍यात नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे कार्यकर्ते त्‍यांच्‍या अवतीभवती होते. याचे कारण या काश्‍मीर भेटीपूर्वी गांधीजींनी नेहरूंच्‍या माध्‍यमातून सर्व माहिती मिळवली होती. शेख अब्‍दुल्ला हे पंडित नेहरूंचे सर्वांत जवळचे मित्र होते आणि त्‍यांना कारागृहात ठेवण्‍यात आले होते. तथापि शेख यांच्‍या पत्नी आणि इतर अनुयायी यांनी गांधीजींची सर्व व्‍यवस्‍था पार पाडली.

काश्‍मीरमध्‍ये गांधीजींना अधिकृतपणे भेटणारे रामचंद्र काक हे पहिले सरकारी अधिकारी होते. महाराज हरि सिंह यांचे ते अत्‍यंत जवळचे मित्र होते. ते काश्‍मीरचे प्रमुख होते. नेहरूंच्‍या ‘हेट लिस्‍ट’मधील (द्वेष करणार्‍यांच्‍या सूचीतील) ते पहिले व्‍यक्‍ती होते; कारण १५ मे १९४६ या दिवशी शेख अब्‍दुल्ला यांना काश्‍मीरविरोधी कारवायांसाठी कारागृहामध्‍ये टाकण्‍यात आले होते, तेव्‍हा नेहरूंनी काश्‍मीरमध्‍ये अधिवक्‍ता म्‍हणून त्‍यांचा खटला लढण्‍याची घोषणा केली होती. त्‍यानंतर काक यांनी नेहरूंच्‍या काश्‍मीर प्रवेशावर बंदी घालण्‍याची घोषणा केली होती, तसेच नेहरूंनाही मुझफ्‍फराबादजवळ अटक करण्‍यात आली होती. तेव्‍हापासून रामचंद्र काक यांनी दुभंगलेल्‍या नजरेने नेहरूंना पसंत केले नाही. रामचंद्र काक यांनी गांधींना महाराज हरि सिंह यांनी लिहिलेले पत्र दिले. ज्‍यावर शिक्‍कामोर्तब झाले. खरे तर हे पत्र केवळ गांधीजींना भेटण्‍याचे निमंत्रण होते. ३ ऑगस्‍ट या दिवशी महाराजांच्‍या ‘हरि निवास’ या निवासस्‍थानी भेटायचे ठरले.

शेख यांच्‍या अनुपस्‍थितीत त्‍यांच्‍या बेगम (पत्नी) अकबर जहाँ आणि त्‍यांची मुलगी खलिदा या गांधींच्‍या ३ दिवसांच्‍या वास्‍तव्‍यात त्‍यांना अनेक वेळा भेटल्‍या; पण १ ऑगस्‍ट या दिवशी गांधी श्रीनगरमध्‍ये एकाही राष्‍ट्रवादी हिंदु नेत्‍याला भेटले नाहीत.

३. १ ऑगस्‍ट या दिवशी महाराज हरि सिंह यांना गिलगिटचे हस्‍तांतरण !

आणखी एक महत्त्वाची घटना १ ऑगस्‍ट या दिवशीच आकार घेत होती, ज्‍यामुळे भारतीय उपखंडात पुढील अनेक वर्षे असंतोष आणि अशांतता रहाणार होती अन् ही घटना काश्‍मीरच्‍या संदर्भातही होती. महाराज हरि सिंह यांच्‍या नेतृत्‍वाखालील काश्‍मीर राज्‍य प्रचंड होते. वर्ष १९३५ मध्‍ये ब्रिटिशांनी ‘गिलगिट एजन्‍सी’ नावाचा भाग वेगळा करून तो ब्रिटीश साम्राज्‍याशी जोडला. मुळात संपूर्ण आणि अखंड काश्‍मीर हा एक प्रकारे पृथ्‍वीवरचा स्‍वर्गच आहे. याखेरीज सामरिक आणि सैनिकी दृष्‍टीकोनातून काश्‍मीर हे अत्‍यंत महत्त्वाचे राज्‍य होते आणि आहे. वर्ष १९३५ मध्‍ये दुसरे महायुद्ध थोडे दूर असतांनाही जागतिक राजकारणात मोठे पालट होण्‍यास प्रारंभ झाला होता. रशियाचे सामर्थ्‍य वाढत होते. त्‍यामुळे काश्‍मीरला रशियाशी जोडणारा भाग असणारा गिलगिट ब्रिटीश सरकारने महाराज हरि सिंहांकडून हिसकावून घेतला.

पुढे झेलममध्‍ये बरेच पाणी वाहून गेले. दुसरे महायुद्धही संपले. त्‍या युद्धात सहभागी झालेले सर्व देश पोकळ झाले होते. ब्रिटीश राजवटीने त्‍याच वेळी भारत सोडण्‍याचा निर्णय घेतला होता. ही परिस्‍थिती पहाता गिलगिट-बाल्‍टिस्‍तान नावाच्‍या दुर्गम भागावर स्‍वतःचे नियंत्रण ठेवण्‍यात इंग्रजांना कोणतेही स्‍वारस्‍य उरले नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांनी भारताला अधिकृतरित्‍या स्‍वातंत्र्य देण्‍यापूर्वी १ ऑगस्‍ट या दिवशी गिलगिट प्रदेश महाराज हरि सिंह यांच्‍याकडे परत दिला. १ ऑगस्‍ट १९४७ चा सूर्योदय होताच गिलगिट-बाल्‍टिस्‍तानच्‍या सर्व जिल्‍हा मुख्‍यालयांत ब्रिटीश राजवटीचा ‘युनियन जॅक’ ध्‍वज काढून काश्‍मीरचा राष्‍ट्र्रध्‍वज अभिमानाने फडकावण्‍यात आला. यासाठी महाराज हरि सिंह किती सिद्ध होते ?काही विशेष नाही. असे का ? याचे कारण ब्रिटीश सरकारने या भागाच्‍या सुरक्षेसाठी ‘गिलगिट स्‍काऊट’ नावाची बटालियन तैनात केली होती. यात काही ब्रिटीश अधिकारी सोडले, तर बहुतांश सैनिक मुसलमान होते. १५ ऑगस्‍ट या दिवशी गिलगिटची ही फौजही महाराजांकडे आली.

हरि सिंह यांनी ब्रिगेडियर घनसारा सिंह यांची या प्रदेशाचा ‘गव्‍हर्नर’ म्‍हणून नियुक्‍ती केली आणि त्‍यांना पाठिंबा देण्‍यासाठी मेजर डब्‍ल्‍यू.ए. ब्राऊन आणि कॅप्‍टन एस्.के. मॅथिसन् नावाचे  अधिकारी नेमले. ‘गिलगिट स्‍काऊट’चे सुभेदार मेजर बाबर खान हेही या लोकांसमवेत होते. या नेमणुका करतांना महाराज हरि सिंह यांना काही दिवसांमध्‍ये संपूर्ण गिलगिट स्‍काऊट्‍स विश्‍वासघात करील, याची अजिबात कल्‍पना नव्‍हती. असे घडले आणि या तुकडीने ब्रिगेडियर घनसारा सिंह यांना कैद केले. १ ऑगस्‍ट या दिवशी गिलगिटच्‍या हस्‍तांतराने भविष्‍यातील महत्त्वाच्‍या घडामोडींसाठी कथानक आधीच लिहून ठेवले होते.

४. ‘पंजाब बाऊंडरी फोर्स’च्‍या कामाला प्रारंभ !

अविभाजित भारताचे खंडित स्‍वातंत्र्य देशाच्‍या उंबरठ्यावर उभे असतांना त्‍या वेळी देशाच्‍या पूर्व आणि पश्‍चिम सीमेवर प्रचंड नरसंहार चालू होता. स्‍वातंत्र्याचा दिवस, म्‍हणजेच फाळणीचा दिवस जसजसा जवळ येईल, तसतसा हा नरसंहार वाढेल, असे ब्रिटीश अधिकार्‍यांचे अनुमान होते. त्‍यामुळे या दंगलींची धग न्‍यून करण्‍यासाठी त्‍यांनी हिंदु, मुसलमान आणि शीख यांच्‍या संयुक्‍त सैन्‍याचा प्रस्‍ताव मांडला. त्‍यानुसार ‘पंजाब बाऊंडरी फोर्स’ नावाचे सैन्‍य सिद्ध करण्‍यात आले. यात ११ पायदळांचा समावेश होता. या तुकडीत ५० सहस्र सैनिक होते आणि त्‍यांचे नेतृत्‍व करण्‍यासाठी महंमद अयुब खान, नासिर अहमद, दिगंबर ब्रार आणि थिमय्‍या हे ४ ब्रिगेडियर होते. १ ऑगस्‍ट या दिवशी या ४ जणांनी लाहोरमधील त्‍यांच्‍या तात्‍पुरत्‍या मुख्‍यालयात ‘पंजाब बाऊंडरी फोर्स’ या बॅनरखाली त्‍यांचे काम चालू केले; पण कुणास ठाऊक होते की, पुढच्‍या पंधरवड्यातच या संयुक्‍त सैन्‍याला त्‍यांचे लाहोरमधील मुख्‍यालय धुरात जळतांना पहावे लागणार आहे.

५. काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि सुभाषचंद्र बोस यांचे ज्‍येष्‍ठ बंधू शरदचंद्र बोस यांचे काँग्रेसचे त्‍यागपत्र !

शरदचंद्र बोस

याच काळात दूर कोलकाता येथे एक नवीन नाटक सिद्ध केले जात होते. काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते आणि सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू शरदचंद्र बोस यांनी १ ऑगस्‍ट या दिवशी काँग्रेसचे त्‍यागपत्र दिले. शरदचंद्र बोस हे उत्तुंग व्‍यक्‍तीमत्त्वाचे धनी होते. ४० वर्षे काँग्रेसमध्‍ये राहून प्रामाणिकपणे आणि प्राणपणाने लढणारा माणूस म्‍हणून त्‍यांची ओळख होती. वर्ष १९३० च्‍या ‘ब्रिटीश इंटेलिजन्‍स’च्‍या (ब्रिटीश गुप्‍तचर विभागाच्‍या) अहवालातही त्‍याचा उल्लेख आहे. शरदचंद्र बोस आणि पंडित नेहरू यांच्‍यात बरेच साम्‍य होते. दोघांचा जन्‍म वर्ष १८८९ मध्‍ये झाला होता. दोघांचेही शिक्षण इंग्‍लंडमध्‍ये झाले. दोघांनी इंग्‍लंडमधूनच वकिलीची पदवी घेतली. तरुणपणी दोघांचे विचार डावीकडे झुकलेले होते. पुढे दोघेही काँग्रेसमध्‍ये सक्रीय झाले आणि त्‍यांचे परस्‍पर संबंध चांगले झाले; पण वर्ष १९३७ मध्‍ये हे समीकरण पालटले, जेव्‍हा बंगालच्‍या प्रांतिक निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक ५४ जागा मिळाल्‍या. त्‍यानंतर दुसर्‍या क्रमांकावर कृषक प्रजा पार्टी आणि मुस्‍लिम लीग दोघांनाही ३७-३७ जागा मिळाल्‍या.

काँग्रेसचे नेते या नात्‍याने शरदचंद्र बोस यांनी काँग्रेस पक्षाला आणि प्रामुख्‍याने नेहरूंना ‘काँग्रेस अन् ‘कृषक प्रजा पक्ष’ यांनी एकत्र सरकार स्‍थापन करावे’, असा प्रस्‍ताव दिला. या प्रस्‍तावाकडे नेहरूंनी दुर्लक्ष केले. सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले आणि मुस्‍लिम लीगसह कृषक प्रजा पक्षाने सरकार स्‍थापन केले. ‘शेर-ए-बंगाल’ म्‍हणून प्रसिद्ध असलेले ए.के. फजलुल हक बंगालचे पंतप्रधान झाले. तेव्‍हापासून बंगालमध्‍ये काँग्रेस कमकुवत होत गेली. पुढे ९ वर्षांनंतर या चुकीची परिसीमा म्‍हणजे मुस्‍लिम लीगचा सुर्‍हावर्दी हा कट्टर मुसलमान पंतप्रधान झाला. सुर्‍हावर्दी हा तो कुप्रसिद्ध व्‍यक्‍ती होता, ज्‍याच्‍या  नेतृत्‍वाखाली वर्ष १९४६ मध्‍ये ‘डायरेक्‍ट अ‍ॅक्‍शन डे’च्‍या (थेट कृती करण्‍याच्‍या) नावाखाली ५ सहस्र निरपराध हिंदूंचा नरसंंहार करण्‍यात आला होता.

वरील सर्व घटना शरदबाबूंना अस्‍वस्‍थ करत होत्‍या. यासंदर्भात त्‍यांनी वेळोवेळी काँग्रेस नेतृत्‍वाला, विशेषत: नेहरूंनाही माहिती दिली; पण त्‍याचा काही उपयोग झाला नाही. वर्ष १९३९ मध्‍ये काँग्रेसच्‍या त्रिपुरी (जबलपूर) अधिवेशनात काँग्रेस अध्‍यक्षपदाच्‍या निवडणुकीत नेहरूंनी सुभाषचंद्र बोस यांच्‍या विरोधात कडवा प्रचार केला. त्‍यामुळे शरदचंद्र बोस आणखी चिडणे स्‍वाभाविक होते. या सर्व घटनांवर दुसरे आक्रमण, म्‍हणजे बंगालच्‍या फाळणीला गांधी-नेहरूंनी मान्‍यता दिली. ही गोष्‍ट शरदबाबूंना अजिबात आवडली नाही. शेवटी त्‍यांनी त्‍यांच्‍या ४० वर्षांच्‍या काँग्रेस जीवनाचे १ ऑगस्‍ट या दिवशी त्‍यागपत्र दिले. त्‍यानंतर १ ऑगस्‍ट या दिवशी शरदचंद्र बोस यांनी ‘सोशलिस्‍ट रिपब्‍लिकन आर्मी’ नावाचा पक्ष स्‍थापन केला. यातून ‘देशाची फाळणी आणि देशात निर्माण झालेले अराजक यांमागे नेहरूंच्‍या नेतृत्‍वाचे अपयश आहे’, हे जनतेला स्‍पष्‍टपणे सांगू लागले.

६.  १ ऑगस्‍टला सायंकाळी आगीच्‍या वणव्‍यात धगधगणारी पंजाब, सिंध आणि बलुचिस्‍तान येथील शेकडो गावे !

१ ऑगस्‍ट… भारतात घडणार्‍या हिंसक आणि तीव्र घटनांचा हा दिवस आता मावळत होता. पंजाब आग आणि हिंसाचार यांमध्‍ये पूर्णपणे धगधगत होता. रात्रीच्‍या त्‍या भयाण अंधारात पंजाब, सिंध, बलुचिस्‍तान येथील शेकडो गावांमधून उठणार्‍या ज्‍वाला दूरवर दिसत होत्‍या. रा.स्‍व. संघाचे ५८ सहस्र स्‍वयंसेवक हिंदू आणि शीख यांच्‍या रक्षणासाठी संपूर्ण पंजाबमध्‍ये रात्रंदिवस एक झाले होते. तसेच बंगालमधील परिस्‍थितीही वेगाने अराजकतेकडे जात होती. स्‍वातंत्र्य आणि त्‍यासमवेत फाळणी अवघ्‍या १४ दिवसांवर होती…!

– प्रशांत पोळ (साभार : ‘ते १५ दिवस’ या पुस्‍तकातून)