डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा !

‘डोळे येणे’

रत्नागिरी – महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांत ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होतांना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ‘डिनो वायरस’मुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, डोळ्यातून वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सूज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे आवश्यक आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीला वेगाने होतो. त्यामुळे हा आजार होवू नये; म्हणून वारंवार हात धुणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे, डोळ्यांना हात न लावून या आजाराला प्रतिबंध करावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.


आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या भागामध्ये डोळे येण्याची साथ चालू आहे, त्या भागामध्ये आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्व जिल्ह्यांना आरोग्य शिक्षणाचा नमुना (प्रोटोटाईप) सिद्ध करून देण्यात आले आहे. ज्या भागामध्ये साथ चालू झाली आहे. त्या भागातील शाळेतील मुलांची डोळ्यांची तपासणी करून उपचार देण्यात येत आहेत. सर्व आरोग्य संस्थांमध्ये आजाराच्या उपचारासाठी लागणारी आवश्यक औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. राष्ट्रीय विषाणू संस्था आणि राज्यातील शीघ्र प्रतिसाद पथकाने आळंदी येथील साथीचे अन्वेषण केले आहे. राज्यात ९ ऑगस्ट २०२३ पर्यंत ३ लक्ष ५७ सहस्र २६५ एकूण रुग्ण आढळले आहेत.