मेवात (हरियाणा) येथील ब्रजमंडल यात्रेवर धर्मांधांच्या भ्याड आक्रमणाच्या विरोधात मुलुंड येथे विरोध प्रदर्शन !

मुलुंड येथे विरोध प्रदर्शन करतांना हिंदुत्वनिष्ठ

मुंबई – नूंह (मेवात) येथील पांडवकालीन प्राचीन नल्हर शिवमंदिर येथे प्रतिवर्षी होणार्‍या ब्रजमंडल यात्रेत धर्मांधांनी यात्रेकरूंवर भ्याड आक्रमण केले. धर्मांधांनी डोंगरात लपून भाविकांवर दगडफेक आणि गोळीबार केला. वाहनांची जाळपोळ करत हिंसाचार केला. यात दोन पोलिसांचा मृत्यू झाला असून शेकडो भाविक घायाळ झाले आहेत. या भ्याड आक्रमणाचा विरोध करण्यासाठी मुलुंड येथे विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि अन्य समविचारी संघटना यांच्या वतीने विरोध प्रदर्शन करण्यात आले. या वेळी अधिवक्ता संतोष दुबे आणि हरिश उपाध्याय यांनी उपस्थितांना संबोधित केले. ‘या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी या वेळी करण्यात आली, तसेच याविषयीचे निवेदन मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

या वेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री श्री. हरिश द्विवेदी, सहमंत्री श्री. वसिष्ठनारायण चौधरी, जिल्हा विधि प्रमुख अधिवक्ता संतोष दुबे, बजरंग दल जिल्हा संयोजक श्री. अक्षय सौदी, सह संयोजक श्री. सूर्यप्रताप यादव, हिंदु जागरण मंचचे श्री. कौस्तुभ देशमुख आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश घाटकर यांच्यासह ५० कार्यकर्ते उपस्थित होते. विरोध प्रदर्शनाच्या वेळी पोलिसांचा बंदोबस्त होता.