हिंदु जनसंघर्ष मोर्चा : हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम !

छत्रपती संभाजीनगर येथे ७५ सहस्र हिंदूंची गर्जना !

संभाजीनगरच्या मोर्चामध्ये ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ या विषयांच्या जोडीला ‘औरंगाबाद’चे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतराला समर्थन देणे, हेही महत्त्वाचे सूत्र होते. याला छत्रपती संभाजीनगरातील हिंदूंनी प्रचंड प्रतिसाद दिला. ७५ सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंचा सहभाग या मोर्च्यात होता.

या मोर्च्यांतील हिंदूंची एकजूट बघून सर्व राजकीय पक्षांना स्वार्थ सोडून एकत्र यावे लागले. या मोर्च्यांमुळे हिंदूंमधील आत्मविश्वास वाढून हिंदुत्वावरील आघातांच्या विरोधात एकत्रित लढण्याची मानसिकता निर्माण झाली आणि याची झलक श्रीरामनवमीच्या दिवशी झालेल्या दंगलीनंतर पहायला मिळाली. एरव्ही अशा घटना घडल्यावर हिंदूंमध्ये पुष्कळ तणाव असायचा. या वेळी हिंदूंनी तणाव न बाळगता मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून श्रीरामनवमी उत्साहात साजरी केली. हा पुष्कळ मोठा सकारात्मक पालट मोर्च्यानंतर दिसून आला.

– कु. प्रियांका लोणे


‘हिंदु धर्मावर २ मोठी संकटे गेल्या काही वर्षांपासून घाला घालत आहेत ! एक म्हणजे लव्ह जिहाद आणि दुसरे म्हणजे हिंदूंचे धर्मांतर ! काही वर्षांपूर्वीपर्यंत लव्ह जिहाद वगैरे काही अस्तित्वातच नाही, असे सांगून हिंदूंकडे त्याचे पुरावे मागितले जायचे, तर धर्मांतरालाही सोनियाचे दिवस आले होते; मात्र या दोन्ही आघातांविषयी हिंदुत्वनिष्ठांनी जी वैचारिक, वैधानिक, सामाजिक, शैक्षणिक, तसेच कौटुंबिक पातळीवर जी जागृती केली, त्याच्या परिणामस्वरूप आज हे दोन्ही आघात परतवून लावण्यासाठी, तसेच त्या विरोधात कडक कायदे होण्यासाठी हिंदु समाज महाराष्ट्रात सहस्रोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला.

लव्ह जिहाद आणि हिंदूंचे वाढते धर्मांतर यांविषयी आज हिंदूंच्या मनात पुष्कळ आक्रोश आहे. या आघातांच्या विरोधात संघर्ष करायला पाहिजे, अशी भावना आता तीव्र व्हायला लागली आहे. अजून किती दिवस आमच्या भगिनींचे तुकडे झालेले आम्ही पहाणार आहोत ? अजून किती दिवस आमच्या मुलींना फसवून त्यांचे बळजोरीने धर्मांतर होणार आहे? आणि आम्ही सहन करणार? हीच चीड मनात ठेवून महाराष्ट्रातील हिंदु जनता सहस्रोंच्या संख्येने मोर्चे घेऊन रस्त्यावर उतरली. निमित्त होते, ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ आणि ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू होण्याच्या मागण्यांचे ! हे मोर्चे कधी हिंदु जनसंघर्ष रूपात दिसले, कधी हिंदु जनआक्रोश रूपात दिसले, तर कधी हिंदू गर्जना रूपात दिसले ! ‘धर्महानी रोखण्यासाठी घराघरांतील हिंदु रस्त्यावर उतरला, ही हिंदु राष्ट्राची दिशेने वाटचालच आहे ’, असे म्हणायला हरकत नाही. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, जळगाव, नागपूर, संभाजीनगर आदी राज्यांतील ५० हून अधिक ठिकाणी हे मोर्चे निघाले. यांपैकी काही मोर्चांचे नेतृत्व हिंदु जनजागृती समितीने केले. हे मोर्चे इतक्या भव्य स्वरूपात निघाले की, राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्धीमाध्यमांनाही हिंदूंच्या संघटनशक्तीची नोंद घ्यावी लागली. या मोर्च्याच्या वेळी आलेले काही अनुभव येथे देत आहे.

कु. प्रियांका लोणे

१. मोर्च्यांचे नियोजन

या मोर्च्यांच्या आयोजनापूर्वी विविध संघटनांच्या बैठका घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रसाराची दिशा ठरवण्यात आली. होर्डिंग लावणे, गावांगावांत बैठका घेणे, हस्तपत्रके वाटणे, फलकप्रसिद्धी करणे, रिक्शांतून उद्घोषणा करणे आदी वेगवेगळ्या माध्यमांतून मोर्चाची उभारणी करण्यात आली. सामाजिक माध्यमांतूनही मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला. अनेकांनी भ्रमणभाष करून सांगितले की, समिती पुढाकार घेऊन काढत असलेल्या मोर्चात आमचाही सहभाग असेल, आमच्याही शुभेच्छा आहेत. थोडक्यात मोर्चांसाठी समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

२. वेगवेगळ्या शहरांतील मोर्चे आणि अनुभव

२ अ. नागपूर : नागपूरमध्ये विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत २१ डिसेंबर २०२२ या दिवशी मोर्चा काढण्यात आला. २७  संघटनांचा या मोर्चामध्ये सहभाग होता. या वेळी हे अनुभवायला मिळाले की, ज्या संघटनांपर्यंत प्रत्यक्ष पोचू शकत नव्हतो, त्या संघटनाही सामाजिक माध्यमांद्वारे केलेल्या प्रसारामुळे या मोर्च्यात सहभागी झाल्या. अनेकांनी स्वतःहून भोजन, झेंडे देऊन मोर्च्याला हातभार लावला. सहस्रोंच्या संख्येने निघालेल्या या मोर्च्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आणि हिंदूंच्या मागण्या पोचवण्यात आल्या.

२ आ. कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये जानेवारी २०२३ मध्ये हिंदु जनजागृती समितीची ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’ झाली होती. या सभेनंतर लगेचच ‘हिंदु जनसंघर्ष मोर्चा’ची घोषणा करण्यात आली. मोर्चापूर्वी गडहिंग्लजची ओळख ‘पुरोगामी शहर’ अशी होती. ती ओळख पुसली जाऊन ‘हिंदुत्वनिष्ठ गडहिंग्लज’ अशी ओळख व्हावी, यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याला भगवंताच्या कृपेने यशही मिळाले. गडहिंग्लज शहरात बहुधा प्रथमच १० सहस्रांहून अधिक हिंदूंचा जनसंघर्ष मोर्चा निघाला.

२ इ. जळगाव : जळगावमध्ये मोर्चाची बैठक झाल्यावर ‘समस्त व्यापारी असोसिएशन’ने मोर्चा यशस्वी करायचा निश्चय केला. त्यानुसार मोर्चा शनिवारी असूनही सर्व व्यापार्‍यांनी स्वत:चा व्यवसाय बंद करून मोर्चात सहभाग घेतला. जळगावच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली. जैन समाज, बहुभाषिक ब्राह्मण समाज, माहेश्वरी समाजही मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी झाला.

२ ई. मुंबई : मुंबईत घाटकोपर येथेही २२ मार्च २०२३ या दिवशी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आरंभी प्रशासनाच्या विरोधाला सामोरे जावे लागले. ‘मोर्चासाठी अनुमती देणार नाही’, याच भूमिकेत प्रशासन होते. मोर्चासाठी लावलेले फलकही पोलिसांनी काढले. ‘मोर्चाचे लावलेले सगळे बॅनर काढले, तरच आम्ही अनुमती देऊ’, अशी अट पोलिसांनी घातली. असे असूनही ‘कितीही संघर्ष झाला, तरी मोर्चा काढायचाच’, अशी समस्त हिंदूंनी ठाम भूमिका घेतली. शेवटी अनेक अडचणींवर मात करून सहस्रोंच्या संख्येने घाटकोपर येथेही हिंदूंचा मोर्चा निघालाच ! मुंबईमध्ये रझा अकादमीच्या धर्मांधांनी खुलेपणाने ‘अमर ज्योती’ स्मारकाची विटंबना करूनही त्यांच्या विरोधात काहीही कारवाई होत नाही; मात्र हिंदूंना न्याय मागण्यासाठी वैध मार्गाने काढण्यात येणार्‍या मोर्चासाठीही संघर्ष करावा लागतो, ही शोकांतिका आहे. मुंबईचा मोर्चाही यशस्वी झाला. ज्या पोलिसांनी मोर्चाच्या आदल्या दिवशी मोर्चाला अनुमती द्यायला विरोध केला, त्याच पोलीस प्रशासनाने मोर्चाचे सुनियोजन पाहून समितीचे कौतुक केले.

३. …संघर्षाचा सूर्य जनमानसातून तळपतच राहो !

एकंदरीत हे मोर्चे म्हणजे हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने हिंदु समाजात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे माध्यम ठरत आहेत. आज मार्ग जरी संघर्षाचा असला, तरी विजय आपला निश्चित आहे, ही भावना प्रत्येक हिंदूने आपल्या मनात ठेवायला हवी. जागृत हिंदुमनांमुळे आता धर्मक्रांतीला आरंभ झाला आहे. आता आपल्याला थांबायचे नाही, तर अखंड संघटित होऊन येत्या काळातही विविध विषयांना मोर्च्यांच्या रूपाने वाचा फोडायची आहे. जोपर्यंत आपल्या मातृभूमीतून लव्ह जिहादरूपी आणि धर्मांतररूपी विषवृक्षाची मुळे नष्ट होत नाहीत आणि हिंदु राष्ट्राची पहाट आपण सर्व मिळून बघत नाही, तोपर्यंत हा संघर्षाचा सूर्य जनमानसातून तळपतच राहो, अशी आशा प्रगट करते.

– कु. प्रियांका लोणे, संभाजीनगर