घाटेश्वरनगर, म्हापसा, गोवा येथील घटना
म्हापसा, २९ जुलै (वार्ता.) – म्हापसा येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनीला अज्ञातस्थळी नेऊन म्हापसा येथील युसुफ शेख (वय ४० वर्षे) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित विद्यार्थिनीने याचा सूड उगवण्यासाठी युसुफ शेख याला म्हापसा येथे एका ठिकाणी बोलावून त्याच्या तोंडावर भर रस्त्यात ‘स्प्रे’ आणि मिरची पूड मारून त्याला यथेच्छ चोप दिला; मात्र तरीही युसुफ याने तिला मारहाण केल्याने ती घायाळ झाली. विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. ही युवती ‘बॉक्सर’ (मुष्टीयोद्धा) आहे.
३ दिवसांपूर्वी युसुफ शेख याने युवतीला त्याच्यासमवेत बोलावले. या वेळी युवतीची दुचाकी बंद पडली. युसुफने दुचाकी त्याच्या परिचयाच्या ‘गॅरेज’वाल्याकडे दुरुस्तीसाठी दिली. यानंतर युसुफने युवतीला त्याच्या चारचाकी वाहनात बसवून पेडणे भागात नेले. निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर तिला खोर्ली, म्हापसा येथे घरी सोडले.
युसुफने विनयभंग केला याचा राग युवतीच्या मनात होता. त्याचप्रमाणे युसुफने संबंधित प्रकार पालकांना सांगितल्यास धडा शिकवणार असल्याची चेतावणी युवतीला दिली होती. ‘या प्रकरणी युसुफला धडा शिकवणारच’, असा निश्चय युवतीने केला. युवतीने पुढील कृती करण्यासाठी २ दिवस विचार केला.
याविषयी अधिक माहिती देतांना पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले, ‘‘युवतीने युसुफ याला म्हापसा येथील श्री घाटेश्वर मंदिराकडे बोलावून घेतले. तिने युसुफला चारचाकीची ‘डिकी’ (साहित्य ठेवण्यासाठीची जागा) उघडण्यास सांगितली. युसूफने ‘डिकी’ उघडली असता युवतीने समवेत आणलेला स्प्रे आणि मिरचीपूड युसुफच्या डोळ्यांत मारली. त्यावर युसुफ खाली कोसळला. युवतीने युसुफला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
Mapusa Crime: धक्कादायक! म्हापशात भरदिवसा कॉलेज युवतीला पळवून नेण्याचा प्रयत्न; युवतीचा धाडसी प्रतिकारhttps://t.co/L7HPG31PhX#Goa #Mapusa #Crime #Police #DainikGomantak
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) July 29, 2023
युसुफला अटक
युवतीने केलेल्या तक्रारीवरून म्हापसा पोलिसांनी युसूफ शेख याला कह्यात घेऊन त्याच्या विरोधात युवतीचा विनयभंग करून तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. संशयिताला न्यायालयात उपस्थित केले असता त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
मिरचीपूड डोळ्यांत गेल्याने युवतीही बेशुद्ध
या वेळी दुर्दैवाने स्प्रे आणि मिरची पावडर मारतांना ती युवतीच्या डोळ्यांतही गेली आणि यामुळे युवती बेशुद्ध झाली. या वेळी युसुफने तिला मारहाण केली. यानंतर युसुफने चारचाकी आणि २ भ्रमणभाष संच तिथेच टाकून तेथून पलायन केले. तोपर्यंत घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी आले. घायाळ झालेल्या युवतीला जिल्हा आझिलो रुग्णालयात भरती करण्यात आले. रात्री उशिरा युसुफला पोलिसांनी कह्यात घेतले. पोलिसांनी युसुफची चारचाकी आणि भ्रमणभाष संच कह्यात घेतले आहेत.
लोकांनी घेतली बघ्याची भूमिका !श्री घाटेश्वरनगर परिसरात ज्या वेळी हा प्रकार घडला, त्या वेळी रस्त्यावर बघणार्यांची गर्दी होती. विद्यार्थीवर्गही त्या वेळी तेथे मोठ्या संख्येने उपस्थित होता. युसुफ युवतीचे दोन्ही हात पकडून तिला रस्त्यावर ओढत होता; मात्र एकही व्यक्ती त्या युवतीच्या साहाय्याला गेली नाही. |
हिंदुत्वनिष्ठांकडून कठोर कारवाईची मागणी !
म्हापसा येथील घटनेचा तेथील हिंदुत्वनिष्ठ नारायण राठवड, संजय वालावलकर, हर्षद स्वार, प्रवीण च्यारी आणि इतर यांनी निषेध केला आहे. हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस निरीक्षक सीताकांत नायक यांची भेट घेऊन संशयितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
संपादकीय भूमिकाअन्य युवती आणि महिला यांनी यातून बोध घेऊन स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे ! |