नगर परिषदेची सर्वसाधारण सभा

राजापूर, २२ जून (वार्ता.) – शहरात नवीन सविस्तर प्रकल्प अहवालानुसार (डी.पी.आर्.नुसार) चालू असलेल्या पाणीपुरवठा जलवाहिन्यांच्या निकृष्ट कामावरून आणि रस्ते खोदून ठेवल्याने झालेल्या दुरवस्थेच्या विरोधात २२ जूनच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी अन् विरोधी गटाच्या सर्वच नगरसेवकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. सभागृहाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नगराध्यक्षा अधिवक्त्या हुस्नबानू खलिफे यांनी ‘ठेकेदाराकडून सर्व काम दर्जेदार पद्धतीने करून घ्या आणि कोणताही हलगर्जीपणा खपवून घेऊ नका, असा सक्त आदेश प्रशासनाला दिले. ‘आमदार किरण सामंत यांनीही या प्रश्नात लक्ष घातले असून काम दर्जेदार व्हावे यासाठी आवश्यक पावले उचलली जातील’, असे नगराध्यक्षांनी या वेळी सांगितले.
बॅ. नाथ पै सभागृहात उपनगराध्यक्ष विनय गुरव, मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ‘अन्वी कन्स्ट्रक्शन’च्या कामावर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवसेना गटनेते अधिवक्ता राहुल तांबे, दिलीप अमरे, दिलीप चव्हाण, सौरभ खडपे, तसेच काँग्रेस गटनेते अधिवक्ता जमीर खलिफे, सुबोध पवार, स्वीकृत नगरसेवक सुभाष बाकाळकर आणि महेश शिवलकर यांनी या कामाचा पंचनामा करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
पुढील वर्षी नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी कोदवली धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनी पूर्ण करणे आणि खोदलेले रस्ते ठेकेदाराकडून व्यवस्थित करून घेण्याचे दायित्व प्रशासनाचे राहील, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
या बैठकीत जलशुद्धीकरणासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणे, कोदवली धरण क्षेत्रातील बाधित जागांचे सर्वेक्षण करणे आणि घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०२६ ची प्रभावी कार्यवाही करणे, या विषयांना संमती देण्यात आली. मुख्यमंत्री मत्स्य योजनेअंतर्गत नवीन मासळी आणि मटण मार्केट बांधणे, रोड क्लिनिंग यंत्र खरेदी करणे, खोदाई झालेल्या रस्त्यांसाठी विशेष रस्ता अनुदानाचा प्रस्ताव सादर करणे आणि शहरातील भटक्या जनावरांचा बंदोबस्त करणे यावरही महत्त्वपूर्ण निर्णय झाले. नवीन मासळी बाजारात आधी शिवाजीपथ रस्त्यावरील मासेमारांना जागा द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली; तर मोकाट गुरांसाठी गोशाळा निर्मिती करेपर्यंत प्रशासनाने योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी सुबोध पवार यांनी केली. या सर्व विषयांवर उपनगराध्यक्ष विनय गुरव आणि इतर सदस्यांनी सविस्तर मते मांडली.
विधान परिषद महायुतीचा विजय : १७ पैकी १६ जागांवर वर्चस्व !
विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासण्यासमवेत तंत्रज्ञानातील पालट आत्मसात् करावेत ! – डॉ. पी.के. सिन्हा
देवस्थानांच्या भूमी बळकावणारा कायदा महाराष्ट्रात होऊ देणार नाही !
तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्था यांच्या चौकशीची मागणी !
संवाद साधण्याला प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
रत्नागिरीत अभ्यंकर-कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात योग महोत्सव साजरा