विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

अक्षय कर्डिले यांनी घेतली आमदारकीची शपथ !

मुंबई, २२ जून (वार्ता.) – विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला २२ जून या दिवशी प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी अहिल्यानगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार अक्षय कर्डिले यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. ईश्वराला साक्षी मानून शपथ घेतल्यावर त्यांनी ‘जय श्रीराम’ असा जयघोष केला.

विधानसभेच्या कामकाजाला सकाळी ११ वाजता आणि विधान परिषदेच्या सकाळी ११.३० वाजता प्रारंभ झाला. दोन्ही सभागृहांमध्ये प्रारंभी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ आणि त्यानंतर ‘महाराष्ट्र गीत’ म्हणण्यात आले. विधान परिषदेत १० नवीन आमदारांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर दोन्ही सभागृहांत अध्यादेश पटलावर ठेवण्यात आले. त्यानंतर दोन्ही सभागृहांत पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या आणि राज्यपालांनी अधिसंमती दिलेली विधेयके घोषित करण्यात आली. त्यानंतर मागील अधिवेशनात मांडण्यात आलेली विधेयके पुर:स्थापनार्थ मांडण्यात आली.

श्रद्धांजली वाहिली !

विधानसभेचे माजी सदस्य अनंतराव थोपटे, विठ्ठलराव धोटे, बळीराम कोटकर-पाटील, कृष्णराव देशमुख, पटल्या मावसकर, वसंतराव सूर्यवंशी, सुरेशकुमार जेथलिया, श्रीमती उषादेवी जगदाळे आणि शकुंतला शर्मा यांना, तर विधान परिषदेमध्ये भाऊराव देशमुख आणि सुरेशकुमार जेथलिया यांना श्रद्धांजली वहाण्यात आली. पार्श्वगायिका आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांनाही श्रद्धांजली वहाण्यात आली.