म्हादई अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान येथे ५ वर्षांत ३८ वेळा वाघांचे दर्शन

‘वाघ’ वाचवा, ‘म्हादई’ वाचवा !

पणजी, २८ जुलै (वार्ता.) – मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ३ मासांत म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र म्हणून अधिसूचित करण्याचा आदेश नुकताच गोवा सरकारला दिला आहे. यामुळे व्याघ्र प्रकल्पावरून राज्यात गदारोळ माजलेला असतांनाच गेल्या ५ वर्षांत म्हादई अभयारण्य आणि मोले राष्ट्रीय उद्यान येथे वन खात्याने लावलेल्या कॅमेर्‍यांमध्ये ३८ वेळा वाघांचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी विचारलेल्या एका लेखी प्रश्‍नाला वनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती उघडकीस आली आहे.

वनमंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले, ‘‘३८ पैकी २३ वेळा म्हादई, तर १५ वेळा मोले राष्ट्रीय उद्यान येथे लावण्यात आलेल्या कॅमेर्‍यांमध्ये वाघांचे दर्शन झाले आहे.’’ म्हादई अभयारण्य आणि इतर परिसर व्याघ्रक्षेत्र घोषित झाल्यास सुमारे १५ सहस्र कुटुंबांवर त्याचा परिणाम होणार असल्याचा दावा पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी नुकताच केला होता. याला प्रत्त्युत्तर देतांना पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी ‘म्हादई अभयारण्य व्याघ्रक्षेत्र घोषित झाल्यास सत्तरी तालुक्यातील केवळ ६ कुटुंबांचेच अन्यत्र स्थलांतर करावे लागणार आहे’, अशी माहिती आकडेवारीसह दिली आहे.

‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा