ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधून भारताचे पाणी पळवण्याचा चीनचा कुटील डाव !

बीजिंग (चीन) – चीनने तिबेटमध्ये भारत-चीन सीमेजवळ यारलुंग-त्संगपो नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याची योजना आखली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये यारलुंग-त्संगपो या नावाने ओळखले जाते. ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधून चीनचा विद्युत् निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न आहे. यासाठी चीन भारतातील काही भागातील पाणी अल्प करण्यासाठी नदीचा प्रवाह उत्तरेच्या दिशेने वळवू शकतो. जर असे झाले, तर भारतासाठी ही स्थिती धोकादायक ठरू शकते. भारत-चीन संबंधांचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक ब्रह्मा चेलानी यांनी ही गोष्ट खरी असल्याचे म्हटले आहे.

१. ‘निक्केई एशिया’मध्ये यासंदर्भात लेख प्रकाशित झाला आहे. त्यानुसार या धरणाची क्षमता ६० गीगावॉट इतकी असेल. भारताच्या सीमेजवळ चीनचे हे धरण आकार आणि क्षमता या स्तरांवर चीनमधीलच ‘थ्री गॉर्जेस’ या सर्वांत मोठ्या धरणाहून कित्येक पटींनी मोठे असल्याचे बोलले जात आहे.

२. नोव्हेंबर २०२० मध्ये धरणाच्या बांधकामाची बातमी चीनचे सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये प्रकाशित झाली होती.

३. ‘पावर कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ चायना’ने हा विद्युत् जलप्रकल्प उभारणे म्हणजे ऐतिहासिक संधी असल्याचे म्हटले आहे.

४. कैलास पर्वतातील ‘एंगसी हिमनदी’तून उगम पावलेली आणि पूर्व हिमालयाला वेढा घातलेली ब्रह्मपुत्रा नदी ३ सहस्र ६९६ किमी लांब आहे. तिबेटहून ती भारतात येते आणि बांगलादेशात पोचून ती समुद्राला मिळते. ही जगातील नववी सर्वांत मोठी नदी आहे.

संपादकीय भूमिका

चीनच्या अशा कुरापतींवर आळा घालण्यासाठी भारताने जशास तसे उत्तर देण्यासाठी व्यूहरचना आखावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते ! यामध्ये तिबेटींवर चीनने केलेले अत्याचार जगासमोर मांडण्यासह चिनी वस्तूंवर भारतात बंदी लादण्यासारखे प्रयत्न प्राधान्याने करणे आवश्यक !