चातुर्मासात युवकांनी उपवास करण्यासह  ‘डिजिटल’ उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालावेत ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांचे आवाहन

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी

मडगाव, (गोवा) ११ जुलै (वार्ता.) – चातुर्मासात व्रत, उपवास आणि नामस्मरण केले पाहिजे. या काळात युवकांनी धार्मिक व्रत करण्यासह भ्रमणभाष हे ‘डिजिटल’ उपकरण आणि गूगल, व्हॉटस्ॲप, इंस्टाग्राम, ट्विटर आणि स्नॅपचॅट या भ्रमणभाषवरील ॲप्लिकेशन्समधील प्रतिदिन किमान एकाचा वापर न करण्याचा निश्चय केला पाहिजे, असे आवाहन श्री गोकर्ण पर्तगाळ जीवोत्तम मठाचे पिठाधीश श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांनी केले. हरिग्राम, पनवेल येथील शांतीकुंज सेवाश्रम येथे चातुर्मास ग्रहण सोहळ्याच्या वेळी स्वामीजींनी हे आवाहन केले. हे चातुर्मास व्रत २९ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

 (सौजन्य : Shree Samsthan Gokarn Partagali Jeevottam Math)

‘गौड सारस्वत ब्राह्मण’ समाजाने शाकाहारी व्हावे !

श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामी पुढे म्हणाले,

‘‘गौड सारस्वत ब्राह्मण’ समाजाने केवळ श्रावण मासातच नव्हे, तर पुढेही शुद्ध शाकाहारी आहार घेण्याचा निश्चय करावा. अनेक जण श्रावण मासाचे पालन करतात. श्रावण मासात देवाच्या उपासनेसाठी अनेक निर्बंध घालावे लागतात, हे लक्षात येते; मग असे निर्बंध केवळ श्रावणातच का ? वर्षातील इतर मासांमध्ये पूजेला अल्प महत्त्व आहे का ? सर्वांनीच शाकाहारी आहार घेतला पाहिजे. आपण जसा आहार करतो, तसे आपणास विचार येत असतात. तामसिक आहारामुळे अशुद्ध विचार येतात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने अशा मन:स्थितीतील नैवेद्य तो स्वीकारत नसल्याचे म्हटले आहे. आहाराचा शारीरिक आरोग्यावरही थेट परिणाम होत असतो. अयोग्य खाण्यामुळे मधुमेह, मूत्रपिंडामध्ये विकार होणे किंवा कर्करोग होणे आदी विकार जडत असतात. गौड सारस्वत ब्राह्मण समाजातील पूर्वजांनी त्या काळच्या परिस्थितीमुळे मासे खाण्यास प्रारंभ केला असावा.’’