खलिस्‍तानवाद संपवण्‍याची नीती !

खलिस्‍तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्‍नू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठार मारण्‍याची धमकी देणारा खलिस्‍तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्‍नू याचा अमेरिकेत रस्‍ते अपघातात मृत्‍यू झाल्‍याचा दावा करण्‍यात येत आहे. ‘हे खरे आहे कि अफवा आहे’, यावर अधिकृतपणे कुठल्‍याही सरकारी यंत्रणेने समोर येऊन काही भाष्‍य केलेले नाही. असे असले, तरी ‘हे वृत्त खरे ठरू दे’, असेच प्रत्‍येक राष्‍ट्राभिमानी भारतियाला वाटत आहे. जेव्‍हा पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ एप्रिलला आसामच्‍या दौर्‍यावर गेले होते, तेव्‍हा तेथील स्‍थानिक पत्रकारांना पन्‍नू याने एक ‘व्‍हिडिओ’ पाठवला होता. त्‍यात त्‍याने ‘जी-२०’च्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या संमेलनात खालिस्‍तानचे झेंडे फडकवू’, अशी चेतावणी दिली होती. गेल्‍या मासात खलिस्‍तानी आतंकवादी हरदीपसिंह निज्‍जर याची हत्‍या झाल्‍यापासून ‘माझाही शेवट असाच होईल’, या भीतीने अमेरिकेत वास्‍तव्‍य करणारा पन्‍नू लपून बसला होता. पन्‍नू हा भारतासाठी हवा असा असलेला ‘मोस्‍ट वाँटेड’ आतंकवादी आहे. गेल्‍या २ मासांत ६ खलिस्‍तानी आतंकवाद्यांच्‍या पाकिस्‍तान, ब्रिटन आणि ऑस्‍ट्रेलिया येथे हत्‍या झाल्‍या असून ‘भारतविरोधी कारवाया करणार्‍या ‘पन्‍नू’सारख्‍या खलिस्‍तानी आतंकवाद्यांना भारतच यमसदनास धाडत आहे’, अशी चर्चा विविध माध्‍यमांत होत आहे. हे सत्‍य असेल, तर भारतासाठी अभिमानाचीच गोष्‍ट आहे. ‘आतंकवादाला पोसायचे नसते’, तर ‘अफझलखानासारखे पोट फाडून संपवायचेच असते’, हे छत्रपती शिवाजी महाराज यांनीच कृतीतून दाखवून दिले आहे. तो आदर्श भारतानेही सतत ठेवला पाहिजे.

खलिस्‍तान्‍यांचा जगभर सुळसुळाट !

खलिस्‍तानवादी

वर्ष १९७०-८० नंतर पंजाबमध्‍ये खलिस्‍तानवादी चळवळीने जोर धरला आणि कुठेही अस्‍तित्‍वात नसलेला ‘शीख विरुद्ध हिंदू’, असा संघर्ष उभा करण्‍यात आला. या चळवळीमुळे गेल्‍या ४ दशकांपेक्षा अधिक काळ पंजाब सतत अशांत आहे. यातून अनेक सामान्‍य नागरिक, पोलीस, सुरक्षा दलाचे सैनिक यांनाही जीव गमवावा लागला आहे. देहली येथे झालेल्‍या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्‍या शेतकर्‍यांना भडकावण्‍यामागे खलिस्‍तानी आतंकवाद्यांचाच हात होता. शेतकरी आंदोलनाच्‍या निमित्ताने ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका येथील भारतीय दुतावासासमोर काही लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्‍या. प्रारंभी केवळ पंजाबपुरते मर्यादित असलेल्‍या खालिस्‍तानी आतंकवाद्यांनी अनेक देशांत हातपाय पसरले. भारतात खलिस्‍तान्‍यांच्‍या मुसक्‍या आवळणे चालू झाल्‍यावर खलिस्‍तान्‍यांनी अन्‍य देशातून कारवाया करण्‍यास प्रारंभ केला.

ज्‍याप्रमाणे इस्‍लामी आतंकवादाला जन्‍म देणारा, पोसणारा आणि मोठा करणारा पाकिस्‍तान आहे, त्‍याचप्रमाणे भारताच्‍या बाहेर खलिस्‍तानवादाचे सर्वाधिक समर्थक असणारा, त्‍याला आर्थिक पुरवठा करणारा कोणता देश असेल, तर तो कॅनडा आहे. कॅनडा हा खलिस्‍तानी आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे. भारत, ब्रिटनसह अनेक देशांमध्‍ये खलिस्‍तानवाद्यांच्‍या विविध संघटनांवर बंदी आहे; मात्र कॅनडात खलिस्‍तानवादी समर्थक उघडपणे भारतविरोधी ‘फेरी’ काढतात, ‘किल इंडिया’ अशा प्रकारच्‍या भारतविरोधी घोषणा देतात आणि कॅनडा मात्र त्‍या विरोधात काहीच करत नाही. जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्‍ये खलिस्‍तानी आतंकवाद्यांनी टोरंटोतील ६ मंदिरांवर आक्रमण केले आणि दानपेट्यांमधील पैसे, देवतांच्‍या मूर्तींवरील अलंकार चोरले. यानंतर १४ सप्‍टेंबर २०२२ या दिवशी ब्रॅम्‍पटन शहरातील स्‍वामीनारायण मंदिरात तोडफोड करून मंदिराच्‍या भिंतींवर ‘खलिस्‍तानी जिंदाबाद, हिंदुस्‍तान मुर्दाबाद’, असे लिहिले.

अमेरिका, ऑस्‍ट्रेलिया, ब्रिटन यांसह अनेक देशात खलिस्‍तानी समर्थक असून तेथूनच ते भारतविरोधी कारवाया करतात आणि भारतात असलेल्‍या आतंकवाद्यांना पैसाही पुरवतात. या सर्व भारतविरोधी कारवाया थांबवणे आणि भारताबाहेरून खलिस्‍तान्‍यांना भारतात पुरवली जाणारी रसद थांबवणे, हे भारतासाठी अत्‍यावश्‍यक आहे.

मोसादचा आदर्श !

इस्रायलची गुप्‍तचर संघटना  ‘मोसाद’

ज्‍या हेरखात्‍याचा डंका जगात वाजतो, त्‍या इस्रायलची गुप्‍तचर संघटना असलेल्‍या ‘मोसाद’ने नुकतीच एक यशस्‍वी कारवाई केली. सायप्रसमधील एक मोठे आतंकवादी आक्रमण रोखण्‍यासाठी मोसादच्‍या गुप्‍तहेरांनी इराणमध्‍ये एका आतंकवादी संघटनेच्‍या ‘मास्‍टरमाईंड’चे अपहरण केले. या आतंकवाद्याच्‍या अन्‍वेषणात त्‍याने आतंकवादी कटाची स्‍वीकृती दिल्‍याचे मोसादने सांगितले. या संदर्भात मोसादने सांगितले की, इराण असो वा जगातील अन्‍य कुठलेही ठिकाण असू दे, इस्रायली नागरिकांच्‍या विरोधात कुणी आतंकवादाला प्रोत्‍साहन देत असेल, तर त्‍या प्रत्‍येकापर्यंत आमचे हात पोचतील ! मोसादची ही आदर्श कृती आहे आणि यातून भारताने बरेच काही शिकण्‍यासारखे आहे. ‘शत्रू जिथे आहे तिथेच त्‍याला नेस्‍तनाबूत केले, तर पुढचा विदध्‍वंस टळू शकतो’, हा युद्धशास्‍त्राचा नियम आहे. त्‍यामुळे कॅनडा, ऑस्‍ट्रेलिया आणि ज्‍या ज्‍या अन्‍य देशांमधून खलिस्‍तानी कारवाया चालतात, त्‍याला त्‍याच भाषेत प्रत्‍युत्तर दिले पाहिजे. ‘कॅनडा’सारख्‍या देशाला भारताने ठणकावून सांगितले पाहिजे की, तुमच्‍या देशातून खलिस्‍तान्‍यांना आर्थिक पुरवठा झाल्‍यास तोे खपवून घेतला जाणार नाही. यापूर्वी काँग्रेसच्‍या कार्यकाळात आतंकवाद्यांसाठी ‘आओ-जाओ, घर तुम्‍हारा’, अशी स्‍थिती होती. हे चित्र आता पालटत आहे. भारतीय सुरक्षायंत्रणा भारताच्‍या शत्रूंचा परदेशात जाऊन बंदोबस्‍त करत असतील, तर ते निश्‍चितच गौरवास्‍पद आणि भूषणावह आहे. खलिस्‍तानसाठी विदेशांत राहून भारतविरोधी कारवाया करणार्‍यांना प्रथम संपवले, तर भारतातील खलिस्‍तानवाद संपवण्‍यास वेळ लागणार नाही. त्‍यामुळे केवळ खलिस्‍तानीच नव्‍हे, तर जिहादी आतंकवादी आदी सर्वांवर ते असतील, तेथे जाऊन त्‍यांना जन्‍माची अद्दल घडवणे आवश्‍यक आहे. असे केले, तरच भारताकडे वक्रदृष्‍टीने पहाण्‍याचे कुणाचेच धारिष्‍ट्य होणार नाही.

विदेशात लपून बसलेल्‍या खलिस्‍तानी आतंकवाद्यांना तेथे घुसून जन्‍माची अद्दल घडवल्‍यास भारतातील खलिस्‍तानवाद संपेल !