सनातन संस्थेच्या वतीने रत्नागिरी, लांजा, सावर्डे, चिपळूण आणि दापोली येथे  ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात साजरा !

रत्नागिरी – जिल्ह्यात सनातन संस्थेच्या वतीने अंबर सभागृह, टी.आर्.पी, रत्नागिरी; त्रिमूर्ती मंगल कार्यालय, लांजा; सह्याद्री शिक्षण संस्थेचे बहुउद्देशीय सभागृह, सावर्डे; स्वामी मंगल कार्यालय, बहादूरशेख नाका, चिपळूण आणि श्रीशैल सभागृह, जालगाव, दापोली अशा ५ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने सर्वत्र गुरुपूजन, आरती, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संदेशाचे वाचन, मान्यवर वक्त्यांचे उद्बोधक विचार आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवून गुरुपौर्णिमा महोत्सव साजरे झाले.

रत्नागिरी
घरोघरी जिजाऊंसारख्या गुरूंची आवश्यकता ! – श्रीनिवास पेंडसे, प्रवचनकार


गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुतत्त्व जागृतीचा प्राधान्यक्रमाचा दिवस. आपण लहान आहोत, कुठेतरी डोके टेकवायचे आहे, याची जाणीव गुरुपौर्णिमेला होते. राजमाता जिजाऊ यांचे ३५० वे पुण्यस्मरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे. राजमाता जिजाऊंमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यामुळे स्वराज्य मिळाले. आई नावाच्या गुरुचे इतिहासातील हे मोठे उदाहरण आहे. देशाला सद्य:स्थितीतून बाहेर काढण्यासाठी घरोघरी जिजाऊंसारख्या गुरूंची आवश्यकता आहे. तरच छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतील.

आज भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता ! – सुरेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती


भारताला ‘सेक्युलर’ (निधर्मी) घोषित केल्यामुळे आज सर्वाधिकार अल्पसंख्यांकांना मिळत आहेत आणि बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार होत आहेत. काश्मीरच नव्हे, तर अनेक राज्यांत हिंदूंचे पलायन चालू आहे. फुटिरतावाद्यांमुळे दुसर्‍या फाळणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज हिंदु राष्ट्राला तळागाळातून, खेड्यापाड्यांतून समर्थन मिळत आहे. ‘हिंदु राष्ट्र’ ही आता चळवळ बनली आहे. ‘हिंदु राष्ट्र’ हीच हिंदूंची ‘मन की बात’ आहे. भारताचा मूळ भाव हा हिंदुत्वाचा आहे. सनातन हिंदु धर्म हाच भारताचा आत्मा आहे. साधनेचे किंवा अध्यात्माचे अधिष्ठान असलेल्या भारताला ‘निधर्मी’ म्हणणे हिर्‍याला कोळसा म्हणण्यासारखे आहे. स्वामी वरदानंद भारती यांनी म्हटले होते, ‘धर्म आणि राष्ट्र पूर्वीही कधी वेगळे नव्हते, आजही नाहीत. केवळ राजसत्ता वेगळी असू शकते. राजसत्ता वेगळी आणि राष्ट्र वेगळे. राजसत्ता कधी मुसलमान होती, कधी ख्रिस्ती होती; पण हे राष्ट्र मात्र हिंदु राष्ट्रच होते आणि आहे.

उपस्थिती

या वेळी धर्मप्रेमी श्री. प्रवीण गोपीचंद बोरकर आणि श्री. सुनील सहस्रबुद्धे यांचा सत्कार श्री. श्रीनिवास पेंडसे यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याला ४०० जिज्ञासूंची उपस्थिती लाभली.

लांजा
व्यासपौर्णिमेनिमित्त गुरूंना पुरुषार्थ अर्पण करणे आवश्यक ! – सुनील जंगम, ज्योतिष विशारद

व्यासमुनींनी आजच्या दिवशी महाभारत हे महाकाव्य पूर्ण केले. हाच दिवस म्हणजे व्यासपौर्णिमा. गुरूंचे कार्य अविरतपणे कसे चालू ठेवता येईल ? यासाठीही आपण व्यासपौर्णिमेला गुरुपूजन करत असतो. अमंगल, असत्, राक्षसी शक्तींचा नाश करणे म्हणजेच पुरुषार्थ. आणि आज प्रत्येकाने या व्यासपौर्णिमेनिमित्त गुरूंना पुरुषार्थ अर्पण करायचा असतो.

या सोहळ्याला सनातनच्या संत पू. (श्रीमती) माया गोखले आणि ह.भ.प. दादा रणदिवे यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी श्री. प्रसाद भाई शेट्ये आणि  श्री. राजू मोरे यांचा आणि गुणवंत विद्यार्थी ॠग्वेद जोशी याचा सत्कार ज्योतिष विशारद श्री. सुनील जंगम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सोहळ्याला २८० जिज्ञासूंची उपस्थिती होती.

सोहळ्याच्या शेवटी झालेल्या धर्मप्रेमींच्या चर्चेत लांजातील धर्माभिमानी श्री. नीलेश जंगम यांनी ‘आमच्या भागात हलाल जिहादविषयी व्याख्यान ठेवावे. त्याचे सर्व नियोजन आम्ही करू’, असे सांगितले.

उपस्थित मान्यवर : लांजा येथील बजरंगदल संयोजक श्री. प्रल्हाद साळुंखे, नगरसेविका सौ. पूर्वा भाईशेट्ये, वीरशैव समाज, अध्यक्ष श्री. मोहन तोडकरी, अधिवक्ता अभिजीत जेधे, अधिवक्त्या (सौ.) समृद्धी जेधे, गोरक्षक श्री. सचिन कदम, उद्योगपती श्री. भैरूलाल भंडारी, विश्व हिंदु परिषद, प्रखंड मंत्री वंदना जेधे, राजापूर येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. महेश मयेकर, पंचायत समिती सदस्य श्री. अभिजीत तेली, सह्याद्री परिसर शिक्षण संस्था, सचिव श्री. चंद्रकांत लिंगायत ओंकार मित्रमंडळ अध्यक्ष श्री. विवेक गुरव धर्माभिमानी श्री. उदय सावंत आणि डॉ. सुरेश गोते.

सावर्डे
हिंदु राष्ट्रासाठी संघटित होणे आवश्यक !- ह.भ.प. किरण महाराज चव्हाण

या पंचक्रोशीमध्ये अनेक व्यक्ती असतांना केवळ आपण येथे आलो म्हणून आपण भाग्यवान आहोत. मनुष्यजन्म मिळणे दुर्मिळ, तरी तो मिळाला आणि त्यातून श्रीगुरूंची प्राप्ती झाली हे आपले मोठे भाग्य आहे. श्रीगुरूंनी सांगितलेली प्रत्येक कृती बुद्धीचा कस न लावता करायची. हिंदु राष्ट्रासाठी संघटित व्हायला पाहिजे. सर्व संप्रदाय विसरून एकत्र यायला हवे.

या वेळी श्री. मंगेश महादेव साठे, श्री. सदानंद सीताराम काटदरे, श्री. सुभाष शंकर नारकर, श्री रामचंद्र श्रीपत पाटोळे या धर्मप्रेमींचा सत्कार ह.भ.प. किरण महाराज चव्हाण यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद गादीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. धर्मप्रेमी सौ. आणि श्री. रामदास घाग यांनी गुरुपूजन केले. सोहळ्याला १०० जिज्ञासू उपस्थित होते.

चिपळूण
गड-दुर्ग यांच्या रक्षणासाठी संघटित होणे ही काळाची आवश्यकता ! – विशाल राऊत, राजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष

जीवनात अनेक गुरु लाभत असतात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला गुरुस्थानी आहेत. त्यांनी गड-दुर्ग उभारून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. गड-दुर्ग संवर्धनाचे कार्य हे राष्ट्र कार्य आहे. आपल्या गड-दुर्गांवर अवैध बांधकाम होत आहेत. हिंदवी स्वराज्याचे स्थापनेचे गड-दुर्ग हे साक्षीदार आहेत. त्यांच्या रक्षणासाठी आपण संघटित होणे काळाची आवश्यकता. यासाठी आपण धर्मशिक्षण घेणेही तेवढेच आवश्यक आहे.
या सोहळ्याला सनातनचे संत पू. श्रीकृष्ण आगवेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सौ. आणि श्री.अमोल जोगळेकर (उद्योजक) यांनी गुरुपूजन केले. या सोहळ्याला २५० जिज्ञासूंची उपस्थिती होती.

दापोली

समान नागरी कायद्याची आवश्यकता लक्षात घ्या ! –  विश्वास फाटक, इस्कॉन

प्रत्येक मानवाला त्याच्या यथोचित योग्यतेनुसार जीवन जगात आले पाहिजे यासाठी हिंदु राष्ट्र आणि समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र संकल्पनेचा उद्घोष सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेच करू शकतात.

दापोली येथील सोहळ्याला पू. (श्रीमती) स्नेहलता शेट्ये यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी सनातनचे हितचिंतक आणि व्यावसायिक श्री. प्रवीण गुरव यांचा सत्कार विश्वास फाटक यांनी केला. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. हेमंत चाळके यांनीही मनोगत व्यक्त केले. या सोहळ्याला २०० जिज्ञासूंची उपस्थिती होती.