उत्तराखंड शासनाने सिद्ध केला समान नागरी कायद्याचा १५ सूत्रीय मसुदा !

  • ‘निकाह हलाला’ आणि ‘इद्दत’ यांवर प्रतिबंध

  • लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहाणार्‍या जोडप्यांना नोंदणी करणे अनिवार्य

  • लोकसंख्या नियंत्रणाचे सूत्रही अंतर्भूत

‘निकाह हलाला’ आणि ‘इद्दत’ म्हणजे काय ?

१. ‘निकाह हलाला’ म्हणजे पहिल्या पतीने तलाक दिल्यावर परत त्याच्याशीच विवाह करायचा असेल, तर महिलेने अन्य कुणाशी तरी विवाह करून त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर त्याने तलाक दिल्यावर परत पहिल्या पतीशी विवाह करण्याची प्रथा !

२. इस्लामनुसार पतीच्या निधनानंतर विधवेला दुसरा विवाह लगेच करता येत नाही. एका विशिष्ट समयमर्यादेनंतरच तिला विवाह करता येतो. यास इद्दत म्हणतात.

डेहराडून (उत्तराखंड) – गेल्या वर्षी राज्यात सत्ता स्थापन केल्यावर मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी निवडणूकपूर्व दिलेल्या आश्‍वासनानुसार समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पावले उचलण्यास आरंभ केला होता. आता उत्तराखंड राज्यशासनाने समान नागरी कायद्याचा १५ सूत्रीय मसुदा सिद्ध केला आहे. कायद्यासाठी राज्यशासनाने बनवलेली समिती हा मसुदा लवकरच त्याकडे सुपूर्द करणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या मसुद्यामध्ये विवाहाची नोंदणी अनिवार्य करणे, हलाला आणि इद्दत यांच्यावर प्रतिबंध लादणे, तसेच ‘लिव्ह-इन रिलेशिनशिप’ची नोंदणी करणे आवश्यक असण्यासंदर्भातील शिफारसी करण्यात आल्या आहेत. यासमवेतच या मसुद्यामध्ये लोकसंख्या नियंत्रणाचे सूत्रही अंतर्भूत करण्यात आले आहे.

समान नागरी कायद्यातील महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. विवाहासाठी मुलींची वयोमर्यादा वाढवण्यात येईल.

२. नोंदणी न करता कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही.

३. तलाक देण्यासाठी पती आणि पत्नी दोघांनाही समान अधिकार असेल.

४. बहुविवाहावर प्रतिबंध लादला जाईल.

५. उत्तराधिकारामध्ये मुलांसमवेत मुलींनाही असेल समान अधिकार !

६. जर मूल अनाथ झाले, तर पालकत्व प्रदान करण्याची प्रक्रिया सोपी केली जाईल.

७. पती-पत्नी यांच्यात संघर्ष झाला, तर आजी-आजोबांकडे असेल नातवंडांचे दायित्व !

८. लोकसंख्या नियंत्रणासाठी अपत्यांची संख्या होऊ शकते निश्‍चित !

संपादकीय भूमिका 

उत्तराखंडमधील भाजप शासनाचा स्तुत्य निर्णय. वास्तविक प्रत्येक राज्याने असा कायदा करण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवर हा कायदा आणणे आवश्यक आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !