‘१२.६.२०२२ ते १८.६.२०२२ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दशम (दहाव्या) अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या अधिवेशनातून मला पुष्कळ आनंद, उत्साह आणि प्रोत्साहन मिळाले, तसे नवीन सूत्रे शिकायला मिळाली.
१. अधिवेशनात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे ध्येय ‘हिंदु धर्मावर होणारे आघात रोखून हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हेच असणे
अधिवेशनात भारत, नेपाळ, इंडोनेशिया आणि फिजी येथील बरेच हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करणे; तसेच धर्मांतर, भूमी जिहाद, लव्ह जिहाद, यांसारख्या हिंदूंवर होणार्या आघांताचा विरोध करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हेच प्रत्येकाचे ध्येय होते.
२. हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची पुढीची पिढीही हिंदु धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी सिद्ध होणे
भारतभरातून अनेक अधिवक्ते हिंदुत्वाच्या वेगवेगळ्या सूत्रांवर न्यायालयाच्या माध्यमातून लढत आहेत. त्यासाठी अधिवक्त्यांची दुसरी फळीही (पिढीही) सिद्ध झाली आहेे.
अ. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी अयोध्या रामजन्मभूमी आणि ज्ञानव्यापी मशीद या प्रकरणात मोठ्या प्रमाणात केलेले प्रयत्न सर्वांना ठाऊकच आहेत. त्यांचे चिरंजीव अधिवक्ता विष्णु शंकर जैन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून हिंदुत्वाचे कार्य करत आहेत.
आ. अधिवक्ता ईश्वरप्रसाद खंडेलवाल त्यांच्या ‘लष्कर-ए-हिंद’ नावाच्या संघटनेच्या माध्यमातून विविध मोहिमा आणि खटले चालवत आहेत. त्यांचे चिरंजीव अधिवक्ता खुश खंडेलवाल हेही ‘हिंदू टास्क फोर्स’च्या माध्यमातून अनेक न्यायालयीन लढे देत आहेत आणि लोकांना प्रशिक्षित करत आहेत. त्यामुळे ‘हिंदूंना आपले गार्हाणे नोंदवण्यासाठी नेमके काय करायचे ?’, हे लक्षात येत आहे.
हे सर्व ‘गुरुदेवांनी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी केलेल्या संकल्पामुळे होत आहे’, हे पाहून मला फार कृतज्ञता वाटते.
३. हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांच्या बोलण्याचा श्रोत्यांवर प्रभाव पडणे
हिंदु जनजागृती समितीचे वक्ते श्री. रमेश शिंदे (राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती), श्री. चेतन राजहंस (राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था), श्री. सुनील घनवट (राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड), अधिवक्ता नीलेश संगोलकर (अधिवक्ता संघटक, हिंदु जनजागृती समिती) आणि प्रा. महावीर श्रीश्रीमाळ (हिंदु जनजागृती समिती) यांच्याकडूनही मला पुष्कळ शिकायला मिळाले. त्यांच्या सूत्रबद्ध आणि अभ्यासपूर्ण बोलण्याचा श्रोत्यांवर प्रभाव पडत होता.
४. संतांचे तेजस्वी विचार धर्माभिमान्यांपर्यंत पोचणे
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, सद़्गुरु स्वाती खाडये, सद़्गुरु सत्यवान कदम, सद़्गुरु नंदकुमार जाधव, सद़्गुरु नीलेश सिंगबाळ, पू. अशोक पात्रीकर आणि पू. रमानंद गौडा यांचे विचारही धर्मप्रेमींपर्यंत पोचले.
५. अधिवेशनात दिल्या जाणार्या घोषणांमुळे हिंदु धर्मप्रेमींना प्रोत्साहन मिळणे आणि ते हिंदु राष्ट्र-स्थापनेचे ध्येय ठेवून आपापल्या ठिकाणी परतणे
हिंदु राष्ट्र अधिवेशनात दिल्या जाणार्या घोषणांमुळेही सर्वांना प्रोत्साहन मिळून सर्वांचा हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करण्याचा उत्साह वाढला. मला अधिवेशनाच्या ठिकाणी हिंदु राष्ट्राची झलक पहाता आणि अनुभवता आली. अधिवेशनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी व्यावसायिक यांच्याशी बोलतांना त्यांची याविषयीची उत्कंठा लक्षात येत होती. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेचे स्वप्न आणि ध्येय घेऊन त्या दृष्टीने सिद्धता करायची आहे’, असा विचार घेऊन हिंदु धर्मप्रेमी आपापल्या ठिकाणी परतले आहेत.
हे सर्व पाहून ‘गुरुदेवांनी हिंदु राष्ट्र आणलेलेच आहे. आता ते केवळ घोषित करायचे बाकी आहे’, असे मला वाटले.
६. सर्व हिंदुत्वनिष्ठांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भाव !
सर्व हिंदुत्वनिष्ठ त्यांचा विषय मांडताना हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या अधिवेशनाविषयी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत होते. कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांचा भाव जागृत होत होता. त्या वेळी ‘आम्ही किती न्यून पडतो !’, असे मला वाटले.
७. शिकायला मिळालेली सूत्रे
अ. आश्रमातील आणि देशभरातून आलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनाची सर्व व्यवस्था अन् नियोजन फारच छान केले होते. यामधून मला ‘त्यांची सेवेची तळमळ, उत्तम नियोजन, संघभावना, भाव, श्रद्धा, कार्यपद्धतीचे काटेकोरपणे पालन करणे’ इत्यादी अनेक गुण शिकायला मिळाले.
आ. सर्वश्री रमेश शिंदे, चेतन राजहंस आणि सुनील घनवट यांच्याकडून ‘सूत्रबद्ध बोलणे अन् ठामपणे विचार मांडणे’, या गोष्टी शिकता आल्या.
‘हे गुरुदेवा, ‘मलाही सर्वांकडून शिकता येऊ दे. माझ्याकडून हिंदु राष्ट्रासाठी शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना !’
– श्रीमती स्मिता नवलकर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ७० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.६.२०२२)