लहान मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व !

अमेरिकेतील वास्तव्याच्या काळात सनातनच्या साधिका सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे यांना आलेला अनुभव

सुश्री (कु.) सुप्रिया टोणपे

१. ‘पेईंग गेस्ट’ म्हणून रहात असलेल्या कुटुंबातील दीड वर्षाच्या मुलाला ‘कार्टून’ पहाण्याची अती ओढ असणे आणि ‘कार्टून’ पाहू न दिल्यास तो पुष्कळ दंगा करत असणे

अमेरिकेत वास्तव्याला असतांना मी एका भारतीय कुटुंबाच्या समवेत काही वर्षे ‘पेईंग गेस्ट’ (पैसे देऊन त्यांच्या घरी रहाणे) म्हणून रहात होते. तेथे आम्ही सर्व जण मिळून स्वयंपाक करत होतो. त्या कुटुंबात दीड वर्षाचा भृगु नावाचा मुलगा होता. तो भ्रमणभाष, टॅब्लेट (मोठ्या आकाराचा भ्रमणभाष) दूरदर्शन आणि भ्रमणसंगणक यांवर सतत ‘कार्टून’ पहात असे. तेव्हा त्याचे इतर कशाकडेही लक्ष जात नसे. त्याला ‘कार्टून’ पहातांना कुणी अडवले, तर तो किंचाळून घर डोक्यावर घेत असे. ‘त्याच्या समवेत खेळायला मुले नाहीत, त्यामुळे तो तेच पहाणार’, असे वाटून त्याचे आई-वडील त्याला ‘कार्टून’ पहायला अनुमती देत असत.

२. प्रतिदिन देवाला नैवेद्य दाखवणे आणि आरती करणे, यांसाठी भृगुला समवेत घेतल्यावर त्याला ते आवडू लागणे

हळूहळू मी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि आरती म्हणण्यासाठी भृगूला माझ्या खोलीत नेऊ लागले. त्याला ‘ज्योत से ज्योत जगावो’ ही आरती विशेष आवडत असे. त्याला त्याची लय आवडत असे आणि तो त्याच्या बोबड्या स्वरात ती गुणगुणत असे. एकदा मी नैवेद्य दाखवायला जात असतांना तो ‘टॅब्लेट’वर त्याच्या आवडीचे ‘कार्टून’ पहात होता. तेव्हा त्याचे वडील मला म्हणाले, ‘‘तो आता त्यात एवढा गुंग झाला आहे की, तो तुमच्याकडे येणारच नाही’’; पण मी त्याला हाक मारल्यावर तो ‘कार्टून’ पहायचे सोडून माझ्याकडे धावत आला.

३. या प्रसंगातून मुलांवर संस्कार करण्याचे महत्त्व लक्षात येणे

या प्रसंगातून ‘लहान मुलांवर संस्कार करणे किती आवश्यक आहे ?’, हे मला आणि त्याच्या आई-वडिलांनाही शिकायला मिळाले. त्यानंतर पुढे तो हळूहळू त्याच्या आई-वडिलांच्या समवेत मंदिरात जाऊ लागला. तेव्हा माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टर आणि माझे वडील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली. लहानपणापासून प्रत्येक गोष्टीत वडील मला ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे सतत सांगत असत. तेव्हा मला ते कळायचे नाही; पण त्याचा माझ्या मनावर नकळत दृढ संस्कार होत गेला. ‘समाजातील आताच्या लहान मुलांना संस्कारी पालक मिळोत’, हीच ईश्वरचरणी आर्त प्रार्थना आहे. – कु. सुप्रिया गजेंद्र टोणपे, ढवळी, फोंडा, गोवा. (१५.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक