यवत (जिल्हा पुणे) – दौंड येथील पशूवधगृहातून पुणे येथे ४ जून या दिवशी गोमांसाची अवैध वाहतूक होणार असल्याची बातमी गोरक्षा दल महाराष्ट्र राज्याच्या गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार ही गाडी पकडण्यासाठी मानद पशूकल्याण अधिकारी ऋषिकेश कामथे, गोरक्षक अक्षय कांचन, राहुल कदम, प्रतीक कांचन, विशाल राऊत हे उरळी कांचन येथील मुख्य चौकात पहार्यासाठी थांबले होते. त्यांनी या गाडीची माहिती पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या स्थानिक गुन्हे शाखेला दिली होती. त्यानुसार ही गाडी पोलिसांनी सापळा रचून यवत येथे पकडली. गाडीमध्ये गायीचे अनुमाने २५० किलो मांस, तसेच चालकाच्या आसनाखाली लोखंडी धार असलेला कोयता सापडला. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तात्याराम करे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वाहनचालक शाहआलम कुरेशी, अब्दुलसलाम कुरेशी, तसेच सलमान कुरेशी, निषार कुरेशी, जमील कुरेशी, फैजान कुरेशी यांच्या विरोधात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
(महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करूनही त्याची प्रभावी कार्यवाही न झाल्यामुळे गायींची तस्करी, गोमांसाची तस्करी चालू आहे. केवळ वाहनचालक आणि वाहन यांवर कारवाई करून दिवसरात्र होणार्या गोहत्या कधीच थांबणार नाहीत ! गोतस्करीची भीषण समस्या मुळापासून संपवण्यासाठी सरकारने गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करून सर्वत्रची अवैध पशुवधगृहे बंद करावीत – संपादक)