पुणे येथील ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत !

‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ म्‍हणजे काय ?

‘स्‍टँप’साठी वापरल्‍या जाणार्‍या शोष कागदावर पाठीमागे ‘मायक्रोग्रॅम’मध्‍ये ‘एल्.एस्.डी.’ लावण्‍यात येते. नशा करण्‍यासाठी हे ‘स्‍टँप’ जिभेखाली किंवा टाळूला चिटकवण्‍यात येतात.

एल्.एस्.डी. स्‍टँप

पुणे – नशेसाठी आता गांजा, एम्.डी., कोकेनच्‍या बरोबरीने ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’चा सर्रास वापर केला जात आहे. नुकतेच पुणे येथे सव्‍वा कोटी रुपये मूल्‍याचे १ सहस्र २०० पेक्षा अधिक ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ पोलिसांनी जप्‍त केले आहेत. गुन्‍हे शाखेच्‍या अमली पदार्थ विरोधीपथकाने आरोपींकडून विचारपूस करून धागेदोरे मिळवले. त्‍यानुसार या प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत पोचले असून मूळ पुरवठादारापर्यंत पोचण्‍यात पोलिसांना अडथळा येत आहे. हे ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ परदेशातून ‘कस्‍टम’मार्गे येऊन, पुढे टपाल विभागाकडून त्‍याचे वितरण झाल्‍याची शक्‍यता आहे. या ‘स्‍टँप’च्‍या मुंबईतील वितरकापर्यंत पोचलेल्‍या पोलिसांना अन्‍वेषण पुढे नेणे शक्‍य झालेले नाही.

अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्‍ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की, या ‘‘एल्.एस्.डी. स्‍टँप’साठीचे पैसे आरोपींनी ‘क्रिप्‍टो करन्‍सी’मध्‍ये (आभासी चलन अर्थात् ‘क्रिप्‍टोकरन्‍सी’ हे संगणकीय ‘अल्‍गोरिदम’च्‍या आधारे निर्माण करण्‍यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते; मात्र तुम्‍ही आर्थिक देवाण-घेवाणीसाठी ते वापरू शकता.) पाठवले आहेत. त्‍यामुळे हा सर्व व्‍यवहार परदेशातून होत असल्‍याचा पोलिसांचा संशय आहे. मुंबईतील आरोपींनी ‘एल्.एस्.डी. स्‍टँप’ची ऑर्डर ‘डार्क वेब’द्वारे दिली होती. त्‍यामुळे त्‍याचा ‘आयपी अ‍ॅड्रेस’ आणि त्‍याद्वारे समोरील व्‍यक्‍तीचे ठिकाण शोधण्‍यावर मर्यादा आहेत. त्‍यामुळे या कामी सायबर तज्ञांचे साहाय्‍य घेण्‍यात येत आहे.