स्पर्धापरीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घ्या !

  • देहली उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट

  • विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अडथळा ठरत असल्याचा दावा

नवी देहली – ‘नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड परीक्षा’, ‘नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट’, ‘आय.आय.एस्.ई.आर्. अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट’ यांसारख्या स्पर्धापरीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा आदेश संबंधितांना द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका श्री. आलोक कुमार मिश्रा यांनी देहली उच्च न्यायालयात प्रविष्ट केली. विद्यार्थ्याच्या पसंतीच्या प्रादेशिक भाषेत परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करावा, तसेच राष्ट्रीय स्तरावरील सर्व परीक्षांमध्ये प्रादेशिक भाषांचा समावेश करण्यासंबंधी योग्य धोरण सिद्ध करण्याचे निर्देश शिक्षण मंत्रालयाला द्यावेत, अशीही मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे.

वरील स्पर्धापरीक्षा प्रामुख्याने इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. भारतातील बहुसंख्य विद्यार्थी प्राथमिक शिक्षण त्यांच्या मातृभाषेत घेतात. त्यांच्याकडे अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवण्याची प्रतिभा असते; तथापि अशा विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा अडथळा ठरते आणि त्यामुळे अशा स्पर्धापरीक्षांमधून विद्यार्थी बाहेर फेकले जातात. परिणामी या परीक्षांचा उद्देशच अयशस्वी होतो, असेही याचिकाकर्त्याने म्हटले आहे.

याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व अधिवक्ता आशुतोष कुमार मिश्रा आणि अधिवक्ता प्रमोद कुमार यांनी केले. देहली उच्च न्यायालयाने सर्व संबंधितांना नोटीस पाठवून या प्रकरणी उत्तर मागितले आहे.