गोवा पोलीस समुद्रकिनार्‍यांवरील दलालांवर कठोर कारवाई करण्यासाठी ‘डाटाबेस’ सिद्ध करणार

कळंगुट, ५ जून (वार्ता.) – दलालांचा व्यवसाय मोडित काढण्यासाठी गोवा पोलिसांनी कह्यात घेतलेल्या दलालांचा एका ‘डाटाबेस’ सिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यापूर्वी कह्यात घेतलेल्या दलालांवर पोलीस कठोर कारवाई करू शकणार आहे.

कळंगुट पोलिसांनी मागील काही दिवसांत ‘टुरिस्ट ट्रेड ॲक्ट १९८२’ अंतर्गत ३४ दलालांवर कारवाई केली. पोलीस सूत्रांनुसार पहिल्यांदा गुन्हा करणार्‍याला ५ सहस्र रुपये, तर त्यानंतर पुन्हा गुन्हा नोंदवल्यास ५० सहस्र रुपये आणि त्यानंतर संशयिताला कारागृहाची शिक्षा होऊ शकते. जानेवारी २०२३ मध्ये कळंगुट परिसरातील सुमारे ५०० नागरिकांनी कळंगुट आणि बागा परिसरात कार्यरत असलेले दलाल, ‘डान्स बार’ आदींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर पोलिसांनी दलालांच्या विरोधात मोहीम आरंभली आहे.

पोलिसांच्या कारवाईचे स्वागत ! – रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

पर्यटनमंत्री रोहन खंवटे

कळंगुट पोलिसांनी दलालांच्या विरोधात केलेल्या कारवाईचे मी स्वागत करतो. यासाठी उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक आणि कळंगुट पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचे अभिनंदन करतो, असे सांगत ‘ही मोहीम अशी पुढे चालू ठेवावी’, अशी मागणी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली आहे. पोलिसांच्या दलालांच्या विरोधातील कारवाईवरून मंत्री खंवटे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.