सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. (श्रीमती) राधा प्रभु यांच्या सत्संगामुळे साधिकेच्या मनाची नकारात्मक स्थिती पालटून सकारात्मकता येणे

संतांच्या सत्संगाचे महत्त्व !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

१. एका प्रसंगात ‘अपेक्षा’ आणि ‘पूर्वगृहदूषित असणे’, या स्वभावदोषांमुळे मनात आलेले नकारात्मक विचार प्रयत्न करूनही घालवता न येणे

कु. अदिती सुखठणकर

‘३.४.२०२३ या दिवशी एका प्रसंगात माझ्या मनात ‘अपेक्षा करणे आणि पूर्वगृहदूषितता’ या स्वभावदोषांमुळे नकारात्मक विचार आले. त्यानंतर माझे मन अस्वस्थ होऊन मला निरुत्साह वाटू लागला. मी थोडा वेळ नामजप करायला बसले, तरीही माझे लक्ष नामजपावर लागत नव्हते. प्रसंग छोटा होता; पण ‘अपेक्षेच्या एका विचाराने मनावर परिणाम झाला’, हे माझ्या लक्षात आले, म्हणजे तो विचार मनातून गेला, तरीही मनाची स्थिती बिघडलेली होती. मी काही प्रमाणात भावजागृतीचे प्रयत्न करायचा प्रयत्न केला; पण माझ्यात पालट होत नव्हता.

२. दुसर्‍या दिवशी पुन्हा एका प्रसंगामुळे मनाची स्थिती बिघडणे आणि प्रार्थना अन् गुरुस्मरण करूनही मनाची स्थिती पूर्णपणे ठीक न होणे

दुसर्‍या दिवशी सकाळी मनाची स्थिती थोडी ठीक होती, तरीही एका प्रसंगामुळे पुन्हा मन अस्थिर झाले. तेव्हा आदल्या दिवशीच्या भावसत्संगात सांगितलेले प्रयत्न आठवले. त्यात ‘आपण गुरुस्मरण करायचे. प्रत्येक वेळी आपण प.पू. गुरुदेवांना अधिकाधिक आर्ततेने हाक मारायची’, असे सांगितले होते. तेव्हा ‘माझी प्रार्थना किंवा गुरुस्मरण आर्ततेने होईल का ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर मी गुरुस्मरण केले. तेव्हा मनाची स्थिती थोडी ठीक झाली आणि मी त्या प्रसंगात कमीपणा घेऊ शकले; पण मनाची स्थिती पूर्ण ठीक होत नव्हती.

३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. राधा प्रभु यांच्या सत्संगामुळे मनाची स्थिती त्वरित चांगली होणे 

त्यानंतर मी भोजनकक्षात अल्पाहार करण्यास गेले. तेथे अकस्मात् मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि पू. राधा प्रभु यांचा प्रत्यक्ष सत्संग मिळाला. त्यामुळे काही सेकंदांमध्येच माझ्या मनाची स्थिती पालटली. ‘हे कसे झाले ?’, हे मला कळलेही नाही. यातून ‘संतांमध्ये चैतन्य किती मोठ्या प्रमाणात असते आणि त्याचा लाभ कसा होतो ?’, हे मला प्रत्यक्षात अनुभवता आले आणि कृतज्ञता वाटली.

ही अनुभूती दिल्याबद्दल प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. अदिती सुखठणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक