नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाजाचा मोर्चा !

मोर्चा काढत ठेवली अर्धा दिवस दुकाने बंद !

नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सिंधी समाजाचा मोर्चा

नाशिक – सिंधी समाजाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच पार्श्वभूमीवर ५ जून या दिवशी सिंधी समाजाच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. ‘सिंधी समाजाच्या एकजुटीचा विजय असो’, अशा घोषणा देत ‘आव्हाड यांनी तातडीने जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी सिंधी समाज बांधवांनी केली, तसेच शहरासह नाशिक रोड, देवळाली कँप परिसरातील दुकाने अर्धा दिवस बंद ठेवत सिंधी बांधवानी निषेध नोंदवला.

जितेंद्र आव्हाड काही दिवसांपूर्वी सिंधी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचा राज्यातील सिंधी समाजबांधवांकडून विविध माध्यमांतून निषेध व्यक्त करण्यात आला. ‘शांतताप्रिय सिंधी समाजाला डिवचण्याचा प्रयत्न न करता झालेल्या प्रकाराविषयी आव्हाड यांनी जाहीर क्षमा मागावी’, अशी भूमिका समाजातील ज्येष्ठांनी घेतली होती; मात्र तरीही आव्हाड यांनी या प्रकरणी क्षमा न मागितल्याने सिंधी समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला.

शालीमार, शिवाजी रोड, सीबीएस सिग्नलमार्गे श्री छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे मोर्च्याचा समारोप झाला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी नाशिक सिंधी पंचायतचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आहुजा, उपाध्यक्ष श्याम मोटवानी, शंकर जयसिंघानी, सुनील केसवानी, देवळाली कँप सिंधी पंचायतचे अध्यक्ष रतन चावला, युनायटेड युथ सिंधी फाउंडेशनचे अध्यक्ष अधिवक्ता अनिल आहुजा, उपाध्यक्ष संजय हरवानी आदीसह १ सहस्र ५०० ते २ सहस्र सिंधी बांधव सहभागी झाले होते.

काय आहे प्रकरण ?

२७ मे या दिवशी उल्हासनगर प्रभात गार्डन कँप ५ जवळ राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलतांना ‘जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाला कुत्र्यांची उपमा दिली होती’, असा आरोप त्यांच्यावर आहे. आव्हाड यांच्या वक्तव्यानंतर सिंधी समाज आक्रमक झाला आहे.