सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी लाकडी रथ सिद्ध करण्याच्या संदर्भात सप्तर्षींनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ विशेष पुरवणी – भाग २

भक्त आणि भगवंत यांतील अंतर मिटवत भगवंत स्वयं भक्तांच्या दिशेने मार्गक्रमण करतो, ती रथयात्रा ! पुरी येथील जगन्नाथाची रथयात्रा, तिरुपती बालाजीचा प्रतिवर्षी साजरा होणारा ब्रह्मोत्सव यांत रथारूढ भगवंताच्या दर्शनाचे पुष्कळ मोठे आध्यात्मिक महत्त्व असते. यंदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्य ब्रह्मोत्सव सोहळ्यातही सुवर्ण रंगाचा रथ हाच आकर्षणबिंदू ठरला ! श्रीमन्नारायणस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ विराजमान झालेला तो दिव्य रथ सप्तर्षींच्या आज्ञेने आणि पू. काशीनाथ कवटेकरगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधकांनी बनवला आहे. हा दिव्य रथ बनवण्याची पूर्वपीठिका, रथ बनवणार्‍या साधकांचा परिचय, रथ बनवण्याच्या प्रक्रियेचे छायाचित्रमय अवलोकन, प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव सोहळ्यात रथ ओढतांना साधकांना आलेल्या अनुभूती आणि  ब्रह्मोत्सवाचे सूक्ष्म परीक्षण आदी विषयांतून रथ आणि ब्रह्मोत्सव यांचे अलौकिकत्व अनुभवता येईल.

 

१.७.२०२२ – काष्ठरथ बनवण्याविषयी सांगणे

अ. ‘वर्ष २०२३ च्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवासाठी संपूर्ण काष्ठरथ बनवावा. हा रथ वर्ष २०२२ मधील रथासारखा गाडीवर बांधलेला नसावा. ज्याप्रमाणे मंदिरातील उत्सवाच्या वेळी भक्त देवाचा रथ ओढतात, त्याप्रमाणे श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांचा रथ साधकांनी ओढावा.

आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी या दिव्य रथात श्रीविष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्यासह त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनीही विराजमान व्हावे.

इ. या रथासाठी जे काष्ठ वापरणार, त्याची प्रातिनिधिक पूजा गुरुपौर्णिमेच्या दिवशी करावी. पूजन केलेले काष्ठ (लाकूड) रथाच्या निर्मितीच्या वेळी उपयोगात आणावे.

(‘रथासाठी आणलेल्या काष्ठाची पूजा १५.७.२०२२ या दिवशी केली. पूजा केलेले काष्ठ रथात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे आसन सिद्ध करण्यासाठी वापरले आहे.’ – संकलक)

ई. रथ सागवानी लाकडाचा करू शकतो.

५.७.२०२२ – रथ बनवण्याच्या संदर्भातील बारकाव्यांविषयी मार्गदर्शन करणे

अ. रथाची चाके लाकडी असावीत. चाकांना ‘बेअरिंग’ लावू शकतो.

आ. रथामध्ये ‘मोटर’चा (यंत्राचा) वापर कुठेही नसावा.

इ. रथावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आसनाच्या वर १ मोठा आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या आसनांच्या वर २ छोटे घुमट असावेत. हे घुमट पितळ्याचे करावेत आणि त्यांचे कळस तांब्याचे असावेत. रथावरील मोठा घुमट श्री विष्णुतत्त्वाचा, तसेच २ लहान घुमट श्री महालक्ष्मीदेवी तत्त्वाचे असावेत.

ई. रथावर हनुमंताची पंचधातूची मूर्ती असावी. त्या हनुमंताच्या हातात विजयध्वज असावा. ध्वजाच्या एका बाजूला ‘ॐ’, दुसर्‍या बाजूला ‘सूर्य’ ही शुभचिन्हे असावीत.

उ. हा दिव्य रथ श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांसाठी असल्यामुळे त्यावर श्रीविष्णुवाहन गरुडदेवतेलाही स्थान द्यावे. देवतास्वरूप असलेल्या या गरुडदेवतेच्या हातात सर्वसामान्यपणे असतात, तसे नाग नसावेत.

ऊ. रथावर श्रीविष्णुतत्त्वाची नक्षी असावी.

ए. ‘रथात श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या आसनाजवळ सूर्य आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या आसनाजवळ चंद्र ही शुभचिन्हे असावीत.

ऐ. रथासमोर वाहन म्हणून घोडे, हत्ती, असे काही नसावे.

ओ. रथ दोर्‍यांनीच ओढावा. (‘तिरुपति बालाजी आणि पुरी येथील श्री जगन्नाथ यांच्या रथयात्रेत भक्त दोर्‍यांनीच रथ ओढतात. सप्तर्षींना ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचा जन्मोत्सव बालाजीच्या ब्रह्मोत्सवाप्रमाणेच व्हावा’, असे वाटत असल्यामुळे त्यांनी रथ दोर्‍यांनीच ओढण्यास सांगितले.’ – संकलक)

इतर सूत्रे

श्री. विनायक शानभाग

अ. ३०.१०.२०२२ या दिवशी साधकांनी पू. काशीनाथ कवटेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अभ्यास करून बनवलेला रथाचा प्राथमिक आराखडा (डिझाईन) सप्तर्षींना दाखवला. तो योग्य असल्याचे सप्तर्षींनी सांगितले.

आ. १६.११.२०२२ या दिवशी सप्तर्षींनी कळवले, ‘‘पौर्णिमा किंवा श्रवण नक्षत्र असतांना आश्रमात पूजा करून रथाच्या निर्माणकार्याचा आरंभ करावा.’’ (‘२६.१२.२०२२ या दिवशी श्रवण नक्षत्र असतांना रथनिर्मितीच्या कार्याचा मुहूर्त करण्यात आला.’ – संकलक)

इ. ६.१.२०२३ या दिवशी रथाच्या ॲक्सलसंदर्भात शंका विचारल्यावर सप्तर्षींनी सांगितले, ‘‘पंचशिल्पकार पू. काशीनाथ कवटेकर यांनी सांगितल्याप्रमाणे रथाचा आस (चाक ज्याच्या भोवती फिरतो, तो दांडा (axle) ॲक्सल) लोखंडी चालेल. ‘रथ साधकांनी ओढण्यासाठी आणि गाडीने ओढण्यासाठी’, अशा दोन्ही सोयी करूया.’’

ई. १९.१.२०२३ या दिवशी साधकांनी रथावर कोरायची नक्षी महर्षींना पहाण्यासाठी पाठवली. तेव्हा महर्षींनी ‘नक्षी छान झाली आहे’, असे सांगून साधकांचे कौतुक केले.

उ. २४.४.२०२३ या दिवशी सप्तर्षींनी रथाच्या सजावटीविषयी मार्गदर्शन केले. ‘ब्रह्मोत्सवाच्या दिवशी गुरुदेवांच्या या दिव्य रथाची सजावट मोगर्‍याच्या फुलांनी करावी. त्या दिवशी गुरुदेवांना मोगर्‍याच्या फुलांचा हार घालावा. श्रीसत्‌शक्ति आणि श्रीचित्‌शक्ति यांनीही त्या दिवशी मोगर्‍याची वेणी घालावी’, असे सांगितले.’ (‘सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मोत्सवाच्या दिवशी तसे केले.’ – संकलक)

– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (मे २०२३)