सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सवा’त ते विराजमान असलेला रथ ओढण्याची सेवा करणार्‍या साधकांनी त्यांच्या चरणी अर्पण केलेले अनुभूतीरूपी कृतज्ञतापुष्प !

११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी (गोवा) येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८१ वा जन्मोत्सव साजरा झाला. या वेळी सप्तर्षींच्या आज्ञेने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ पार पडला. सागवानी लाकडापासून बनवलेल्या सुवर्ण रंगाच्या रथात बसून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना दर्शन दिले. या वेळी सप्तर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ याही रथात विराजमान होत्या. ‘ज्याप्रमाणे मंदिरातील देवतेचा रथ तेथील सेवेकरी ओढतात, त्याप्रमाणे श्रीमन्नारायणाचा रथ साधकांनी ओढावा’, या सप्तर्षींच्या आज्ञेनुसार साधकांनी साक्षात् भगवंताचा हा रथ ओढला. हा संपूर्ण रथ लाकडापासून बनवलेला असल्यामुळे त्याचे वजन साडेचार टन, इतके होते. असे असूनही साधकांना रथ ओढण्याची सेवा करतांना कोणताच त्रास झाला नाही; उलट त्यांना विविध अनुभूती आल्या. या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

श्री. सागर गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

श्री. सागर गरुड

अ. ‘रथाचे वजन साडेचार टन, इतके होते, तरीही ‘रथ ओढतांना शरिराला पुष्कळ कष्ट द्यावे लागले’, असे मला वाटले नाही. ‘रथ आपोआपच पुढे चालत आहे’, असे मला वाटत होते.

आ. ‘आम्ही सर्व जण केवळ चालत आहोत आणि परात्पर गुरुदेवच आम्हा सर्वांना घेऊन जात आहेत’, असे मला आतून जाणवत होते. त्यामुळे माझी पुष्कळ भावजागृती होत होती. आतापर्यंत अशी भावस्थिती मला कधीही अनुभवता आली नव्हती.

इ. ‘गुरुदेवांच्या माध्यमातून साक्षात् देव समवेत आहे’, असा आनंद होऊन मला हलकेपणा जाणवत होता.

ई. ब्रह्मोत्सवाच्या आधी मला थोडी अंगदुखी जाणवत होती; पण रथाच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यामुळे माझा अंगदुखीचा त्रास दूर झाला.’

श्री. वैभव साखरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. वैभव साखरे

अ. श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या ब्रह्मोत्सवात रथ ओढण्याची सेवा करतांना ‘माझ्यात जणू चैतन्य, भाव आणि आनंद यांचेच संचारण होत आहे अन् गुरुदेवच सर्वकाही सेवा करून घेत आहेत’, असे मला जाणवले.

आ. रथ मार्गक्रमण करत असतांना माझा भाव पुष्कळ जागृत होत होता. त्या वेळी मला माझे अस्तित्वच जाणवत नव्हते.

इ. ‘या सेवेतून माझे अनेक जन्मांचे पाप नष्ट झाले’, असे मला वाटले.

ई. ‘ज्यांना भगवंताचा रथ ओढण्याची संधी मिळते, ते अतिशय भाग्यवान असतात’, असे मी वाचले होते. ‘पौराणिक मान्यतेनुसार जो रथ ओढतो, त्याला मोक्षप्राप्ती होते’, हे आठवून ‘माझे जीवन कृतार्थ झाले’, असे वाटून माझ्याकडून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.

‘रथोत्सव चालू होण्याआधी गुरुदेव रथ ओढण्याची सेवा करणार्‍या साधकांना म्हणाले, ‘‘रथात बसण्याऐवजी रथ ओढण्याची सेवा करतांना मला अजून आनंद झाला असता. तुम्हा सर्वांना पाहून मलाही ‘रथ ओढायला यावे’, असे वाटत आहे.’’

श्री. दीप संतोष पाटणे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

श्री. दीप संतोष पाटणे

अ. रथ ओढण्याचा सराव करतांना

अ १. रथ ओढण्याचा सराव करतांना मला कोणताही शारीरिक त्रास किंवा थकवा जाणवला नाही. ‘सरावाच्या ४ – ५ दिवसांत आणि रथ ओढण्याच्या दिवशी दिव्य शक्ती कार्यरत आहे’, असे मला जाणवले.

आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी रथ ओढतांना आलेल्या अनुभूती

१. रथ ओढण्याच्या १५ मिनिटे आधी आमच्यापैकी बर्‍याच जणांना जांभया आणि ढेकरा आल्या अन् त्या माध्यमांतून साधकांचे त्रास बाहेर पडू लागले.

२. रथ ओढण्याच्या सिद्धतेसाठी गेल्यावर साक्षात् तिन्ही गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) रथात बसलेले पाहून मला ‘माझे जीवन कृतार्थ झाले’, असे वाटले. त्या वेळी माझा भाव दाटून आला.

३. रथ ओढतांना ‘आम्ही पृथ्वीवर नसून कोणत्यातरी उच्च लोकात आहोत’, असे मला वाटले. त्या वेळी मला थंडावा जाणवू लागला.

४. रथ ओढतांना माझ्या पायांना मुलायम स्पर्श जाणवू लागला. ‘उन्हाची तीव्रताही न्यून झाली’, असे मी अनुभवले.

५. रथ ओढतांना मला जाणवले, ‘पावलागणिक माझे तन, मन आणि बुद्धी गुरूंसाठी अर्पण होत आहे. माझे अनेक जन्मांचे प्रारब्ध गतीने नष्ट होत आहे.’

६. प्रत्यक्ष रथ ओढतांना आम्ही सर्वांनी रथ हलका झाल्याची अनुभूती घेतली. ‘आम्ही केवळ निमित्तमात्र आहोत. साक्षात् श्रीमन्नारायण आमच्याकडून रथ ओढून घेत आहे’, असे मी अनुभवले.

इ. ब्रह्मोत्सव झाल्यावरही दिवसातून अनेक वेळा मला रथारूढ तिन्ही गुरूंचे दर्शन होऊन माझे मन कृतज्ञतेने भरून येते. मला सतत वाटते, ‘मी मैदानात रथाच्या जवळ आहे.’

श्री. परशुराम पाटील

श्री. परशुराम पाटील

अ. रथ ओढण्याची सेवा मिळाल्याचे समजल्यावर कृतज्ञता वाटणे : ‘मला रथ ओढण्याची सेवा मिळाली आहे’, असे समजल्यावर माझा भाव जागृत झाला. ‘रथ कसा असणार ? सेवा कशी असणार ? तो दिवस कसा असणार ?’, याची मला जिज्ञासा वाटली. गेल्या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या रथोत्सवात मी सहभागी होतो. या वर्षी देवाने मला पुन्हा संधी दिली. त्यामुळे मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.

आ. ब्रह्मोत्सवाच्या दिवशी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

आ १. प्रीतीने साधकांना जोडून ठेवणारे परम पूज्य आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी जमलेली साधकांची राजसभा ! : ‘देवांची राजसभा (दरबार) भरते’, अशा गोष्टी मी ऐकल्या होत्या. मी परम पूज्यांच्या कृपेने तो दिवस पाहू शकलो. रथ ओढण्याच्या सिद्धतेत असतांना पडदा उघडल्यावर सर्व साधकांची राजसभा पाहून ‘परम पूज्यांनी प्रीतीने सर्वांना कसे जोडून ठेवले आहे !’, असे वाटून माझी भावजागृती झाली. त्या वेळी माझे मन निर्विचार झाले.

आ २. आम्ही रथ ओढणे चालू केल्यावर ‘माझ्या शरिरातून काहीतरी त्रास बाहेर पडत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला हलकेपणा जाणवला.

आ ३. रथ ओढतांना मला वाटले, ‘रथ स्वतः पुढे जात आहे.’

आ ४. रथयात्रेच्या वेळी लावलेल्या नामधुनी गात मी त्या विश्वात रमून गेलो. त्या वेळी मी निर्विचार स्थिती अनुभवत होतो.

आ ५. देव करत असलेल्या प्रीतीच्या वर्षावाबद्दल कृतज्ञताभाव दाटून येणे : ‘मला देवाचा आशीर्वाद मिळत आहे. देव माझ्यावर भरभरून प्रेम करत आहे. या जिवाची पात्रता नसतांनाही देवाने मला २ वेळा या सेवेची संधी दिली’, असे वाटून माझ्या मनात कृतज्ञताभाव दाटून आला. ‘परम पूज्यांनी माझ्यासाठी किती आणि काय केले !’, हे आठवून माझी भावजागृती झाली. ‘याच स्थितीत रहावे’, असे मला वाटते.

आ ६. पू. खेमकाभैय्या (पू. प्रदीप खेमका, सनातनचे ७३ वे संत, वय ६३ वर्षे) यांनी गुरुदेवांचे केलेले वर्णन, त्यांचा गुरुदेवांप्रती असलेला भाव आणि श्रद्धा यांविषयी ऐकून ‘भाव आणखी कसा वाढवायचा अन् श्रद्धा वाढवायला हवी ?’, हे मला शिकायला मिळाले.

इ. ‘परम पूज्यांचा रथ आणि देवाची राजसभा’, हे सगळे अजूनही माझ्या डोळ्यांसमोर येते अन् माझी भावजागृती होते.

‘या जिवाची पात्रताही नसतांना साक्षात् नारायणाचा रथ ओढण्याची संधी मला दिली’, याबद्दल सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी काेटीशः कृतज्ञता !’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.५.२०२३) – श्री. परशुराम पाटील (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ५३ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

एक साधक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

अ. रथाच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे

१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान असलेला रथ सजीव असल्याचे मला जाणवले. मी जेव्हा रथाला स्पर्श केला, तेव्हा मला रथाचा स्पर्श मृदू जाणवला.

२. ब्रह्मोत्सवाच्या वेळी रथ मध्येच थांबला असतांना रथाची चाके उलट दिशेने फिरत असल्याचे मला जाणवले. याचे मला इतके आश्चर्य वाटत होते की, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.

३. ‘रथ एका जागी थांबला असूनही तो डाव्या आणि उजव्या बाजूला झुलत आहे’, असे मला जाणवले. आरंभी ‘मला भोवळ येत असल्याने असे होत आहे का ?’, असे मला वाटले; परंतु मला तसे काही होत नव्हते.

आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन होऊन भावजागृती होणे आणि हा क्षण याआधीच्या जन्मात अनुभवला असल्याचे जाणवणे

रथ ओढण्याची सेवा करतांना एका क्षणी मी रथाच्या नजीक उभा होतो. तेथून मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्यांना पाहून माझी भावजागृती झाली आणि माझे हात नमस्काराच्या मुद्रेत आपोआप जोडले गेले. हा जो क्षण मी अनुभवत होतो, तो क्षण मी यापूर्वीही, म्हणजे गतजन्मी अनुभवला असल्याचे मला जाणवत होते. त्या वेळी मी श्रीकृष्णाच्या समवेत होतो.’ (सर्व सूत्रांचा दिनांक : १४.५.२०२३)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधकांच्या समवेत रथ ओढल्यावर रथ पूर्वीपेक्षा हलका झाल्याचे जाणवणे

ब्रह्मोत्सवाच्या आदल्या दिवशी रथ ओढण्याचा सराव करतांना रथ पुष्कळ जड वाटत होता. त्या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकल गाडगीळ आल्या. त्यांनी आमच्या समवेत रथ ओढला. त्यानंतर आम्हा सर्वांना जाणवले, ‘रथ पूर्वीपेक्षा हलका झाला आहे.’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले रथात बसल्यावर रथ आणखी हलका होणे

वरील अनुभूती काही साधकांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना सांगितली. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘उद्या देव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) रथात बसल्यावर रथ आणखी हलका होईल.’’ (‘साधकांना प्रत्यक्षातही अशीच अनुभूती आली.’ – संकलक)

 

‘हे प्रभो, ‘न भूतो न भविष्यति’, अशा ब्रह्मोत्सवामध्ये तुम्ही मला तिन्ही गुरु आरूढ झालेला सुवर्णरथ ओढण्याची संधी दिली. ते सुवर्ण क्षण माझ्या मनःपटलावर कोरले गेले आणि माझे जीवन धन्य धन्य झाले. कोटीशः कृतज्ञता !’

‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुराया, ‘याची देही, याची डोळा’ आम्हाला तुमचा ‘ब्रह्मोत्सव’ पृथ्वीवर पहाता आला. ‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या ब्रह्मोत्सवातून तुम्ही आम्हाला अपूर्व आणि अविस्मरणीय आनंद दिला. ‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवा, ‘आपल्या अपार कृपेने मला तुम्ही विराजमान असलेला रथ ओढण्याची सेवा दिली’, याबद्दल कोटीशः कृतज्ञ आहे ! आपल्या श्री चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.

आम्ही साधक तुमच्या चरणी प्रार्थना करत आहोत, ‘हे गुरुदेव, आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्हा साधकांना तुमच्या चरणी कृतज्ञताभावाने सेवा करता येऊ दे’, ही आमची प्रार्थना स्वीकार करा.’

 

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक