‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा रथ ओढणार्‍या साधकांचा सराव घेणे आणि रथ ओढणे’, या सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

१. सरावाच्या दिवशी रात्री थकवा येणे; मात्र मैदानात पाय ठेवताक्षणी थकवा न जाणवणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवात त्यांचा रथ ओढणार्‍या साधकांचा सराव घेणे आणि रथ ओढणे’, या सेवा चालू झाल्यानंतर शारीरिक श्रम एकदम वाढल्यामुळे माझे शरीर दुखू लागले. सर्व साधकांचा सराव घेतांना ‘त्यांना सूचना देत असतांना त्यांच्या समवेत धावणे, काही सुधारणा असल्यास पुन्हा नवीन पद्धतीने सराव करणे आणि प्रचंड उष्णता’, यांमुळे मी दमून जात असे; मात्र याची जाणीव मला रात्री झोपतांना होत असे. रात्री कितीही थकवा असला, तरीही दुसर्‍या दिवशी सरावासाठी मैदानात पाय ठेवताक्षणी मला एकदाही थकवा जाणवला नाही. ‘जोपर्यंत त्या दिवसाची सेवा पूर्ण होत नाही, तोपर्यंत अंग दुखत आहे’, याची मला एकदाही जाणीव झाली नाही.

अधिवक्ता नागेश जोशी

२. प्रत्येक साधक त्याच्या क्षमतेनुसार रथ ओढण्याचा प्रयत्न करत असणे, त्यामुळे त्याला दमायला होणे आणि साधकांमध्ये संघटितपणा साध्य करतांना संघर्ष होणे

सेवेत आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या टप्प्याला महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील साधक सहभागी होत असत. हे साधक विविध क्षेत्रांत सेवा करणारे होते. या साधकांची सेवा करण्याची पद्धत आणि त्यांच्या विचारांची दिशा भिन्न होती. त्यामुळे साधकांमध्ये संघटितपणा साध्य करतांना संघर्ष होत होता. प्रत्येक साधकाला वाटत होते, ‘मलाच (एकट्याला) रथ ओढायचा आहे.’ प्रत्येक साधक त्याच्या क्षमतेनुसार रथ ओढण्याचा प्रयत्न करत होता; परिणामी साधकांना दमायला होत होते. काही साधकांना ‘सेवा जमेल का ?’, असे वाटू लागले.

३. साधकांची सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून सेवा करण्याची तळमळ असणे

साधकांना ‘ही सेवा मिळाली आहे’, याचा उत्साह होता. या सेवेतील एकाही साधकाला एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेल्या साधकांच्या समोर जाण्याचा अनुभव नव्हता. ‘ब्रह्मोत्सवात गुरूंनी आपल्याला सेवेची संधी दिली आहे’, याबद्दल साधकांना कृतज्ञता वाटत होती. त्यामुळे साधकांची सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून ही सेवा करण्याची तळमळ होती.

४. कौशल्य आणि प्रकृती यांनुसार साधकांना सेवा दिल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण होणे

साधकांतील कौशल्य आणि त्यांची प्रकृती यांनुसार सेवावाटप केले, उदा. सेवेसाठी लागणारे साहित्य एकत्रित करणे, रथ ओढण्यासाठी लागणार्‍या दोर्‍या बांधणे आणि मोजणे, साधकांना पाणी, सरबत आणि औषधे देण्याचे नियोजन करणे इत्यादी. त्यामुळे त्यांच्यात एकसंघपणा दिसू लागला आणि त्यांची आपापसांत जवळीक झाली.

५. सरावात अडचणी येत असूनही साधकांची सकारात्मकता वाढणे

साधकांना सराव करतांना जसजशा अडचणी येत होत्या, तसतसे साधक सकारात्मक होत होते. प्रतिदिन आमच्या सेवेच्या नियोजनात पालट होत होते. सराव करतांना आलेल्या अडचणींमुळे सेवेतील बारकावे साधकांच्या लक्षात येऊ लागले आणि त्यांचे प्रयत्न वाढले.

६. गुरूंना शरण जाऊन सेवा करण्याची साधकांच्या मनाची सिद्धताझाल्यावर त्यांची मने एकरूप होणे

साधकांच्या मनाची सिद्धता झाली, ‘आता काहीही होऊ दे. ही सेवा गुरूंना शरण जाऊन करायची. अन्य विचार करायचा नाही.’ त्यामुळे साधकांना शेवटच्या क्षणापर्यंत सांगितलेले पालट स्वीकारता आले आणि सेवा करतांना साधकांची मने एकरूप झाली.

७. रथ ओढणार्‍या साधकांनी विविध स्तरांवर केलेले प्रयत्न आणि त्यांचा झालेला परिणाम

विज्ञानाच्या नियमाप्रमाणे रथ ओढण्यास प्रत्येक वेळी समान बलाची आवश्यकता होती; परंतु रथ ओढतांना आम्हाला क्षणाक्षणाला वेगळा अनुभव येत होता. हा अनुभव माझ्या एकट्याचा नाही, तर सर्वच साधकांचा आहे. त्याचे विश्लेषण पुढील सारणीत दिले आहे.

टीप – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी रथ ओढल्यावर सर्व साधकांची भावजागृती झाली अन् त्यांच्यात ‘आपल्याला रथ ओढण्याची सेवा जमू शकेल’, असा आत्मविश्वास निर्माण झाला. या नोंदींना वैज्ञानिक प्रमाण काही नाही; पण सर्व साधकांनी ‘याची देही, याची डोळां’, याची अनुभूती घेतली.

रथ ओढण्याची सेवा झाल्यावर साधकांनी सांगितले, ‘‘आम्हाला या सेवेतून पुष्कळ आनंद मिळाला आणि प्रत्येक वेळी उत्साह मिळाला.’’

सर्वच साधकांकडून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी शतशः वंदन आणि कृतज्ञता !’

– अधिवक्ता नागेश जोशी, तळावली, फोंडा, गोवा. (१३.५.२०२३)

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ विराजमान झालेला दिव्य रथ ओढतांना साधक रथ ओढण्याची सेवा करतांना साधकाने केलेले भावाच्या स्तरावरील प्रयत्न

अ. रथ ओढण्याची सेवा मिळाल्याबद्दल कृतज्ञता वाटून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी अनुसंधान साधले जाणे : ‘पहिल्या दिवशी जेव्हा मी रथ ओढण्याच्या सेवेसाठी गेलो, तेव्हा मला पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता. रथ ओढण्याची सेवा मिळाल्याबद्दल मला कृतज्ञता वाटत होती आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी माझे अनुसंधान साधले जात होते.

आ. मैदानाची भूमी शेणाने सारवली असल्याने रथ ढकलणे कठीण जाणे; पण तरीही शरीर आणि मन हलके वाटणे : ब्रह्मोत्सवाच्या एक दिवस आधी मैदानाची भूमी शेणाने सारवली होती. त्या दिवशी सराव करतांना रथ पुढे ढकलणे पुष्कळ कठीण जात होते. भूमीवरील शेण थोडे ओले असल्याने रथ ढकलतांना पुष्कळ शक्ती लागत होती, तरीही मला माझे शरीर आणि मन हलके वाटत होते. मी शरिराने दमलो असलो, तरी मनाने उत्साही होतो. ‘देव माझे प्रारब्ध नष्ट करत आहे’, असे मला जाणवत होते.

इ. रथ ओढण्याची सेवा करतांना साधकाने ठेवलेला भाव : सराव करतांना, तसेच प्रत्यक्ष ब्रह्मोत्सवाच्या वेळी मी पुढीलप्रमाणे भाव ठेवला होता, ‘रथ ओढणे’ या सेवेतून प्रत्येक साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ या ध्येयपूर्तीसाठी हातभार लावत आहे. ‘रथ ओढणे’, म्हणजे परात्पर गुरुदेवांचे कार्य पुढे नेण्यासारखे आहे.’ मी परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात होतो. त्यांचे मधुर स्मित पाहून मला साधनेचे प्रयत्न अधिक जोमाने करण्याची प्रेरणा मिळाली.’

– एक साधक, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक