वर्ष २०२२ मधील रथोत्सवासाठी भाड्याने रथ आणल्यावर ‘तो परत करू नये’, असे वाटणे आणि महर्षींनी वर्ष २०२३ मधील रथोत्सवासाठी रथ बनवण्याची आज्ञा देणे

वर्ष २०२३ मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी रथ बनवण्यामागील पूर्वपीठिका !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

 १. वर्ष २०२२ मधील रथोत्सवासाठी पुष्कळ प्रयत्न करून भाड्याने रथ आणणे

‘वर्ष २०२२ मधील रथोत्सवासाठी रथ बाहेरून भाड्याने आणायचा’, असे ठरले होते. रथ शोधण्यासाठी सौ. जान्हवी रमेश शिंदे आणि सहसाधक यांनी पुष्कळ कष्ट घेतले. आपल्याला अपेक्षित असा रथ मिळण्यासाठी साधकांनी बेळगाव, सांगली, मिरज, इचलकरंजी, पुणे, मुंबई, अशा ५ – ६ ठिकाणी जाऊन पुष्कळ रथ पाहिले. शेवटी एक रथ अंतिम केला.

२. रथात आलेल्या देवत्वामुळे तो परत पाठवण्याची मनाची सिद्धता नसणे आणि तसे प.पू. गुरुदेवांना सांगितल्यावर त्यांनी ‘पुढे आपला रथ सिद्ध होईल’, असे सांगणे

रथोत्सवाच्या वेळी त्या रथात फार सुंदर वातावरण निर्माण झाले होते. त्या रथाच्या समवेत जो चालक आला होता, त्याचेही डोळे भरून आले होते. त्यामुळे तो रथ परत पाठवण्यासाठी आमच्या मनाची सिद्धता होत नव्हती. रथोत्सव झाल्यानंतर आम्ही (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी) प.पू. गुरुदेवांना विचारले, ‘‘हा रथ परत पाठवण्यासाठी मन सिद्ध होत नाही. आपण हा रथ ठेवून घेऊया का ?’’ तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘‘हा रथ परत पाठवायचा आहे ना, तर पाठवूया. पुढे देवाची इच्छा असेल, तर आपला रथ सिद्ध होईल.’’

३. प.पू. गुरुदेवांनी ‘रथ परत पाठवून द्या, रथ ठेवायची ईश्वराची इच्छा नाही, त्यामुळे रथ ठेवून घेतल्यास ती स्वेच्छा होईल’, असे सांगणे

दुसर्‍या दिवशी रथ परत जाण्याच्या वेळी आमची पुष्कळ भावजागृती झाली. त्या वेळी ‘रथ पाठवायला नको’, असे आम्हाला वाटत होते. मी परम पूज्यांना विचारले, ‘‘रथ पाठवण्यासाठी मन सिद्ध होत नाही.’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आता पाठवूया. आपण तो ठेवून घेऊ शकत नाही ना ? आणि तो रथ इथे ठेवण्याची ईश्वराची इच्छाही नाही. मग ‘रथ ठेवून घेणे’, ही आपली स्वेच्छा होईल. आपल्याला स्वेच्छा नको.’’ ‘या प्रसंगातून ईश्वराला आम्हाला काहीतरी शिकवायचे होते’, असे माझ्या लक्षात आले.

४. त्यानंतर थोड्याच दिवसांनी महर्षींनी नाडीवाचनात सांगितले, ‘आता आपल्याला रथ बनवायचा आहे.’ वर्ष २०२२ मधील जन्मोत्सवानंतर २ मासांनीच रथ बनवण्याच्या सेवेला प्रारंभ झाला.’

– श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.५.२०२३)