मुंबई, ३० मे (वार्ता.) – राज्यात शेतीला प्रारंभ होण्यापूर्वी राज्यात लाखो रुपयांचे बोगस खतांचे साठे सापडले आहेत. १ एप्रिलपासून भरारी पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईत अवघ्या दीड मासात राज्यात १८.४० मेट्रिक टन बोगस खतांचा साठा सापडला आहे. याचे मूल्य ५ लाख ४४ सहस्र रुपये इतके आहे. या प्रकरणी २४ खतविक्रेत्यांचे परवाने रहित करण्यात आले आहेत.
या वर्षी बोगस बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची विक्री रोखण्यासाठी एकूण ३९५ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मागील वर्षी राज्यात बोगस खतांचा २ सहस्र ३९५.४२ मेट्रिक टन इतका साठा सापडला. बोगस बियाणांचा १७०.५९ मेट्रिक टन, तर बोगस कीटकनाशकांचा ३६.८४ मेट्रिक टन साठा सापडला. या प्रकरणी ८२ गुन्हेही नोंदवण्यात आले. ७५५ परवाने निलंबित, तर ९२ जणांचे परवाने रहित करण्यात आले. काही दिवसांपूर्वी राज्याची खरीप हंगामापूर्वीची आढावा बैठक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली. या बैठकीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री रोखण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले; मात्र मागील वर्षांची बोगस साठ्याची आकडेवारी आणि या वर्षी शेती चालू होण्यापूर्वीच आढळलेले बोगस साठे यांमुळे या वर्षी बोगस बियाणे, कीटकनाशके आणि खते यांची विक्री रोखण्याचे सरकारपुढे मोठे आवाहन आहे.
संपादकीय भूमिकाशेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. असे असतांना बोगस खते वापरून शेतीची हानी करण्यासह भारतीय अर्थव्यवस्थेलाही ढासळू देणार्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी ! |