आय.पी.एल्. सामन्यावर सट्टा लावणार्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई !

क्रिकेटच्या आहारी गेलेल्या लोकांमुळेच या सट्टा लावणार्‍या लोकांचे फावते !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथील शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खराडी परिसरातील ‘गॅलेक्सी वन’ या सोसायटीमधील नवव्या माळ्यावरील एका सदनिकेवर धाड टाकून आय.पी.एल्. क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या टोळीला कह्यात घेतले. पोलिसांनी ५ लाख रुपयांचा ऐवज घटनास्थळावरून कह्यात घेतला. त्यामध्ये १६ भ्रमणभाष आणि २ भ्रमणसंगणक यांचा समावेश आहे.

गौरव धरमवाणी, सुनीश लखवानी, जपजीतसिंह बग्गा, जसप्रीत सिंह, तरणदीप सिंह आणि लाल किशोर दुखी राम अशी कह्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.