पाकिस्तानही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

सूरत (गुजरात) –  ज्या दिवशी हिंदु कपाळावर टिळा लावून बाहेर पडतील, त्या दिवशी भारतात हिंदु राष्ट्र होईल. भारतालाच नाही, तर पाकिस्तानलाही हिंदु राष्ट्र बनवण्यात येईल. पाकव्याप्त काश्मीरला आता भगवान श्रीराम आणि भारत यांची आवश्यकता आहे; कारण पाकला पाकव्याप्रत काश्मीर सांभाळता येत नाही, असे विधान बागेश्‍वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे त्यांच्या रामकथेमध्ये केले. धीरेंद्रकृष्ण शास्त्री सध्या गुजरातच्या १० दिवसांच्या दौर्‍यावर आहेत.

माझा एकच पक्ष म्हणजे बजरंगबली !

धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. माझा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे बजरंगबली !

धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांना मध्यप्रदेश सरकारकडून ‘वाय’ दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यावर ते म्हणाले की, मी आदिवासी भागांतील जंगलात जाऊन कथा सांगत असतो. यामुळे माझ्या विरोधात षड्यंत्र रचले जात आहे. सनातनविरोधी शक्ती कार्यरत असल्याने मला संरक्षण देण्यात येत आहे.

अयोध्येनंतर आता मथुरेची वेळ !

धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, अयोध्येनंतर आता मथुरेची (श्रीकृष्णजन्मभूमी इस्लामी आक्रमकांच्या जोखडातून मुक्त करण्याची) वेळ आहे. यासाठी सनातनी लोकांनी जागे व्हायची वेळ आहे. आता पलायन करायची नाही, तर सनातन, हिंदुत्व, भगवान श्रीकृष्ण यांच्यासाठी जागण्याची वेळ आहे. तुम्ही सनातनी आहातच. जर कुणी नाव विचारले, तर जातपात सोडून ‘मी हिंदु आहे,’ असेच सांगितले पाहिजे.