गुणपत्रिका ५ जूनला महाविद्यालयात मिळणार !
मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल २५ मे या दिवशी दुपारी २ वाजता ‘ऑनलाईन’ घोषित करण्यात येणार आहे, तसेच गुणपत्रिका ५ जून या दिवशी महाविद्यालयात मिळणार आहे. मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या परीक्षा यंदा ‘ऑफलाईन’ पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. आता मात्र विद्यार्थी आणि पालक यांना निकालाची प्रतीक्षा होती. निकाल घोषित झाल्यानंतर २६ मे ते ५ जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २६ मे ते १४ जून या कालावधीत ‘ऑनलाईन’ अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे.
इयत्ता १२ वीचे विद्यार्थी https://www.mahahsscboard.in.mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahresults.org.in आणि ‘एबीपी माझा’च्या marathi.abplive.com या संकेतस्थळावर हा निकाल पहाता येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना SMS द्वारेही हा निकाल पहाता येणार आहे. विद्यार्थ्यांना संदेश बॉक्समध्ये त्यांचा आसन क्रमांक टाकून ५७७६६ या क्रमांकावर पाठवावा लागणार आहे. यानंतर त्याच भ्रमणभाष क्रमांकावर विद्यार्थ्यांना निकाल पहाता येईल. यंदा १४ लाख ५७ सहस्र २९३ विद्यार्थ्यांनी इयत्ता १२ वीची परीक्षा दिली होती.