उदास गाण्यांमुळे सुंदर आठवणींना उजाळा ! – संशोधन

‘आपण जे अनुभवत आहोत त्यात काहीच चुकीचे नाही’, हा विश्‍वास दु:खाने भरलेले संगीत आपल्याला देते !

न्यूयॉर्क (अमेरिका) – नैराश्याने भरलेले संगीत आणि गाणी ऐकल्याने आपल्या सुंदर आठवणींना उजाळा मिळतो. प्रत्यक्ष आयुष्यात आपण निराश होऊ इच्छित नाही, मात्र संगीताच्या माध्यमातून ती भावना अनुभवायला आपल्याला आवडते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध ‘येल विद्यापिठा’चे मनोचिकित्सक डॉ. जोशुआ नोब यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. ‘जर्नल ऑफ अ‍ॅस्थेटिक एज्युकेशन’ यामध्ये ते प्रकाशित झाले आहे.

डॉ. जोशुआ नोब

१. डॉ. नोब सांगतात की, लोकांच्या मेंदूत एकाच वेळी एखाद्या गोष्टीसाठी दोन भावना सिद्ध होतात. एक यथार्थ आणि दुसरी आभासी ! उदास गाण्यांसंदर्भातही असेच घडते. अशी गाणी आठवणींच्या सागरात डुंबवतात, मात्र उदास करत नाहीत.

संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) वैज्ञानिक तारा व्यंकटेशन्

२. डॉ. नोब यांच्यासह कार्य करणार्‍या संज्ञानात्मक (कॉग्निटिव्ह) वैज्ञानिक तारा व्यंकटेशन् यांनी उदास गाण्यांवर हे संशोधन केले आहे. त्या म्हणाल्या की, उदास गाणी नकारात्मक भावनांमधून बाहेर काढण्यास साहाय्य करतात. भावना व्यक्त करणे, हे तणाव अल्प करण्यासह एकटेपणात साथसंगत करतात. उदास संगीत आपल्याला परिस्थितीची खरी ओळख करून देते. ‘आपण जे अनुभवत आहोत त्यात काहीच चुकीचे नाही’, हा विश्‍वास दु:खाने भरलेले संगीत आपल्याला देते.