अनधिकृत बांधकामे रोखण्‍यासाठी १० ते २५ सहस्र रुपये अनामत रक्‍कम भरण्‍याचे आदेश !

फळ बाजारात अनधिकृत बांधकामे झाल्‍याचे प्रकरण

नवी मुंबई, १७ मे (वार्ता.) – मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या पाचही बाजारपेठांतील व्‍यापार्‍यांनी गाळा दुरुस्‍तीच्‍या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केले आहे. याला आळा बसावा, यासाठी फळ बाजाराच्‍या उपसचिवांनी ‘गाळ्‍यांची दुरुस्‍ती करण्‍यापूर्वी बाजार समितीची अनुमती घ्‍यावी, तसेच १० ते २५ सहस्र रुपये अनामत रक्‍कम भरावी’, असे आदेश काढले आहेत. गाळ्‍याची दुरुस्‍ती करण्‍यासाठी लेखी अर्ज केल्‍यावर अभियंता विभाग गाळ्‍याची पहाणी करून अनुमती देणार आहे. किरकोळ दुरुस्‍ती असल्‍यास १० सहस्र रुपये, तर अधिक दुरुस्‍ती असल्‍यास २५ सहस्र रुपये अनामत रक्‍कम भरावी लागणार आहे. व्‍यापार्‍यांनी याला विरोध केला आहे. व्‍यापार्‍यांनी अनधिकृत बांधकाम करू नये, यासाठी ही अनामत रक्‍कम घेण्‍यात येणार आहे. ‘नियमानुसार काम केल्‍यावर ही रक्‍कम परत केली जाईल’, अशी माहिती उपसचिव संगीता अधांगळे यांनी दिली.