कनकोरी (संभाजीनगर) येथे पोषण आहाराची चोरी करणार्‍या मुख्याध्यापकाला ग्रामस्थांनी पकडले !

छत्रपती संभाजीनगर – गोरगरिबांच्या मुलांसाठी शासनाने शाळेत चालू केलेल्या शालेय पोषण आहाराचे साहित्य चोरून नेत असतांना ग्रामस्थांनी शाळेचे मुख्याध्यापक तडवी आणि त्यांचे साथीदार शिक्षक वाडीले यांना रंगेहात पकडून साहित्य जप्त केले. तडवी हे गाडीची डिक्की आणि पिशवी यांतून आहाराचे साहित्य चोरून नेत होते. अनेकदा समज देऊनही ते सुधारण्यास सिद्ध नसल्याने ग्रामस्थांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यांचा व्हिडिओही बनवला. सध्या सामाजिक माध्यमांवर हा व्हिडिओ प्रसारित होत आहे. जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कनकोरी गावातील हा सर्व प्रकार आहे.

ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक तडवी गुरुजी आणि त्यांचे साथीदार शिक्षक वाडीले हे प्रतिदिनचे पोषण आहाराचे अन्न न शिजवता कायम पोषण आहाराचे सामान चोरून विकतांना ग्रामस्थांना दिसत होते.

सौजन्य : झी २४ तास

याविषयी ग्रामस्थांनी त्यांना समज देऊनही त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी हा चोरीचा प्रकार चालूच ठेवला होता. त्यामुळे आम्ही त्यांना रंगेहात पकडून त्याचे १ मे या दिवशी ध्वनीचित्रीकरण करून त्यांच्याकडून गुन्हा मान्य असल्याचे लिहून घेतले आहे. त्यांनी केलेल्या चोरीचे सबळ पुरावे जमा केलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून गुन्हा नोंद करावा, अशी मागणी गावकर्‍यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तातडीने केली आहे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रताप पवार यांच्या वतीने हे निवेदन देण्यात आले.

संपादकीय भूमिका

  • असे शिक्षक आदर्श विद्यार्थी घडवू शकतील का ?
  • पोषण आहार चोरून तो विकणार्‍या मुख्याध्यापकांनी आणखी किती अपहार केले आहेत, याचेही अन्वेषण व्हायला हवे !