‘१२.२.२०२१ या दिवशी ब्राह्ममुहूर्तावर मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला दिसले, ‘सहस्रो वर्षांपूर्वीचे एक मंदिर आहे. या मंदिरात अनेक खांब आहेत. या खांबांना शेवाळे लागले आहे. कुणीतरी मला दिव्य आवाजात म्हणाले, ‘खांबांवरील मूर्ती पहा !’ मी लक्ष देऊन खांब पाहू लागले. यांतील एका खांबावर महिषासुरमर्दिनीची मूर्ती होती. मधल्या खांबावर दाढी असलेल्या एका ऋषींचा तोंडवळा दिसत होता आणि शेवटच्या खांबावर हिरण्यकश्यपूला मारतांनाचे श्री नरसिंहाचे शिल्प होते. या मूर्तींचे तोंडवळे स्पष्ट दिसत नव्हते. या मूर्तींची पुष्कळ झीज झाली होती.’
तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘कुणीतरी दिव्य शक्ती मला आवाज देऊन दर्शवू इच्छित होती, ‘या देवता सनातनच्या धर्मकार्यात असुरांविरुद्ध लढण्यासाठी सध्या साहाय्य करत आहेत.’
याच कालावधीत महर्षींनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना ‘नरसिंहयाग’ करायला सांगितला होता आणि मला अहोबिलम् (आंध्रप्रदेश) येथे नवनरसिंहांच्या स्थानी दर्शनाला जायला सांगितले होते. ‘वर्तमानात विश्वमंडलात कोणत्या देवतेचे तत्त्व कार्यरत आहे ?’, हे महर्षींना आधीच कळते आणि त्यानुसार ते आपल्याला तशी उपासना करायला सांगत असतात अन् आपल्याला तसे दृष्टांतही होत असतात.
‘खरेच महर्षि आपल्याला पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून किती मार्गदर्शन करत आहेत !’, असा विचार मनात येऊन मला कृतज्ञता वाटली.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१४.२.२०२१, सायं. ७.१६)