‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ आहे’, याची कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १६ वर्षे) हिने घेतलेली अनुभूती !

१. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी दळणवळण बंदीमुळे रामनाथी आश्रमात जाता येत नसल्याने मनाचा पुष्कळ संघर्ष होणे

कु. अपाला औंधकर

‘मे २०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे दळवळण बंदी लागू केलेली असल्यामुळे गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी मी गोव्यात असूनही मला रामनाथी आश्रमात जाता आले नाही. त्यामुळे मी घरीच होते. त्या वेळी ‘माझ्या गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी आश्रमात जाता येत नाही’, असे वाटून मला पुष्कळ वाईट वाटले आणि रडू आले. त्या वेळी आई, आजी आणि आजोबा यांनी मला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला; परंतु मला ते पटतच नव्हते आणि ‘मला आश्रमात जायचेच’, असे वाटत होते. त्या वेळी सुश्री (कु.) तेजल पात्रीकरताई (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) हिने मला भ्रमणभाष करून समजावले.

२. सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी ‘गुरुदेवांना स्थुलाऐवजी सूक्ष्मातून अनुभवायचे आहे’, असे सांगितल्यावर मनाला पुष्कळ बरे वाटणे

तेजलताईने मला सांगितले, ‘‘आता तू गुरुदेवांना स्थुलातून नाही, तर सूक्ष्मातून अनुभवायचे आहेस. ते तुझ्या समवेतच आहेत अन् तुझी परीक्षा घेत आहेत. जेव्हा तू ‘अपेक्षा करणे’ सोडशील, तेव्हा ते तुझी परीक्षा घेणे थांबवतील. तू परिस्थितीचा स्वीकार कर. तुला परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ काही शिकवत आहेत आणि आता त्यांच्याच कृपेने तू घरी राहून सेवाही करू शकत आहेस. त्यामुळे सेवेविषयीही काही अडचण नाही.’’ तेजलताईने हे सर्व मला सांगितल्यावर माझ्या मनाला पुष्कळ बरे वाटले.

३. ‘देव आपली परीक्षा घेत आहे’, याची जाणीव होऊन गुरुदेवांची लीला अनुभवण्यासाठी आर्तभावाने प्रार्थना करणे

यानंतर ‘मी गुरुदेवांना सूक्ष्मातून कसे अनुभवू ?’, हे मला कळत नव्हते. मी त्यांना आर्तभावाने प्रार्थना केली आणि त्यांचे वेळोवेळी स्मरण करून त्यांच्याशी सूक्ष्मातून बोलले. दुसर्‍या दिवशी माझ्या मनावरील ताण न्यून झाला; परंतु मला थोडे वाईट वाटत होते आणि ‘या वेळी मला गुरुदेवांसमोर नृत्यही करता येणार नाही’, या विचाराने अस्वस्थ वाटू लागले. ‘माझे प्रारब्ध काय आहे ?’, हे मला समजत नव्हते; पण ‘देवाला ठाऊक आहे की, मी परीक्षा उत्तीर्ण होणार आहे; म्हणूनच तो परीक्षा घेत आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी ‘गुरुदेव आता काय लीला करतात ?’, हे अनुभवण्यासाठी मी अत्यंत भावपूर्ण प्रार्थना केली.

४. ‘पूर्वी गुरुदेवांनी त्यांच्या समोर नृत्य करण्याची संधी दिली होती’, या विचाराने  कृतज्ञता व्यक्त होऊन मनात येत असलेल्या नकारात्मक विचारांची खंत वाटणे

काही वेळाने एक साधक माझ्या आजोबांच्या घरी आले. पूर्वी गुरुदेवांच्या जन्मोत्सवाच्या वेळी मी केलेले नृत्य आणि त्याविषयी त्यांनी अनुभवलेली भावस्थिती, यांविषयी ते सांगत होते. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘साक्षात् भगवंतासमोर नृत्य करणे’, हे केवळ भगवंताच्याच हातात असते. त्याच्या इच्छेविना काहीच होऊ शकत नाही आणि तुला साक्षात् श्रीमन्नारायणस्वरूप गुरुमाऊलींच्या चरणी स्थुलातून मोगर्‍याची पुष्पे अर्पण करता आली, म्हणजे तू किती भाग्यवान आहेस !’’ त्या वेळी माझ्या मनात पुढील विचार आले, ‘खरंच गुरुदेवा, तुम्ही मला काय काय दिले आहे ! ‘सूक्ष्म स्तरावर तुम्ही सतत माझ्या समवेत आहात’, ही अनुभूतीही वेळोवेळी तुम्ही मला दिली आहे; पण मी किती मूर्ख आहे ! माझे रडगाणे घेऊन तुमच्याशी बोलत आहे.’ त्यानंतर माझे विचार थांबले आणि ‘गुरुदेव नक्कीच या वेळी मला निर्गुण स्तरावर घेऊन जाऊन काहीतरी अनमोल शिकवणार आहेत’, ही श्रद्धा दृढ झाली.

५. भावसोहळ्यात स्वतः नृत्य करत असल्याचे दृश्य दिसणे, त्या वेळी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या नाभीमधून कमळ फुलणे 

रात्री परत माझ्या मनात थोडे नकारात्मक विचार येऊ लागले. तेव्हा ‘मला एक भावगीत ऐकावे’, असे वाटले. त्या वेळी माझ्या मनात गुरुदेवांप्रतीचा भाव जागृत झाला आणि मी स्वतःला विसरून गेले. त्यानंतर मला एक दृश्य दिसले. ते दृश्य अद्भुत असून ‘ते कसे वर्णावे ?’, हे मला समजतच नव्हते. त्या दृश्यात ‘भावसोहळा चालू आहे. ‘भावसोहळ्यामध्ये मी गुलाबी रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचे पोलके घालून ‘भूपालम् तिल्लाना’, हा नृत्यप्रकार करत आहे’, असे मला दिसले. मी नृत्य करत असलेल्या गीतामध्ये ‘पद्मरागमणिमालालङ्कृतं पद्मनाभभूपालं विभूम् । परिणतमुरलीवादनलोलन निरतं सदा देहि मुदं सुखम् ।।’, या ओळी आहेत. (अर्थ : ‘ज्यांच्या कंठी माणिक रत्नांचा हार आहे, ज्यांच्या नाभीमध्ये कमळ आहे, जे मुरलीवादनात रत आहेत, अशा हे भगवान श्रीविष्णु, आपण मला सुख द्यावे, परमानंद द्यावा.) मी या ओळींवर नृत्य करत असतांना सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या नाभीमधून कमळ फुलले.

६. गुरुदेवांचे निळ्या रंगाचा शेला आणि जांभळ्या रंगाचे सोवळे परिधान केलेले रूप सूर्याहून अधिक तेजस्वी दिसणे

त्या वेळी मला गुरुदेवांचे जे रूप दिसले, ते पुष्कळ वेगळे होते. सगुण रूपात त्यांना पाहून आपल्याला जे तेज जाणवते, त्याच्या सहस्र पटींनी अधिक त्यांचे तेज होते. गुरुदेवांची कांती सुवर्णमय आणि तेजस्वी दिसत होती. गुरुदेवांनी निळ्या रंगाचा शेला आणि जांभळ्या रंगाचे सोवळे परिधान केले होते. त्यांनी मोगर्‍याचा हार घातला होता. त्यांनी घातलेल्या अलंकारांमुळे त्यांची कांती सूर्यदेवाप्रमाणे आणि त्याच्याहून पुष्कळ तेजस्वी दिसत होती.

७. परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून अनुभवतांना अव्यक्त भाव असणे आणि अनुभवल्यावर भाव जागृत होऊन कृतज्ञता व्यक्त होणे

या जन्मसोहळ्यामध्ये अनेक देवता उपस्थित होत्या. परात्पर गुरुदेवांना पाहून त्यांचाही भाव जागृत होत होता. निर्गुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झाले होते. त्या वेळी मला सर्वत्र तेजोमय पांढरा प्रकाश आणि मध्यभागी पिवळ्या चैतन्याचे पट्टे दिसले. गुरुदेवांचे आजपर्यंत मी प्रत्यक्षात अनुभवलेले श्रीविष्णूचे रूप आणि सूक्ष्मातून दिसलेले हे रूप सारखेच होते; परंतु सूक्ष्मातील हे निर्गुण रूप पुष्कळ तेजस्वी होते. एक वेगळीच अनुभूती आज मला घेता आली. हे अनुभवतांना माझा अव्यक्त भाव होता; परंतु ते अनुभवल्यानंतर माझा भाव जागृत झाला आणि ‘मी किती कृतज्ञता व्यक्त करू ?’, हे मला समजतच नव्हते. काही वेळाने माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

८. प्रार्थना

गुरुदेवा, खरंच आज मी जी लीला अनुभवली, त्यामध्ये मी स्वतःला विसरून तुम्हाला अनुभवू शकले. हे गुरुदेवा, मला स्थुलामध्ये न अडकता सूक्ष्मातून तुम्हाला भेटायचे आहे. त्यासाठी माझी काहीच सिद्धता नव्हती; परंतु ‘आता तुम्हीच ते सर्वकाही माझ्याकडून करून घेत आहात’, हे अनुभवून माझा कंठ दाटून येत आहे. गुरुदेवा, ‘आता माझ्या मनाचे नियंत्रण तुमच्याच हातात ठेवा आणि माझ्यातील अहं नष्ट करून मला लवकरात लवकर तुमच्या चरणी कधीच न कोमेजणार्‍या आनंदी नृत्यफुलाचे स्थान द्या’, हीच तुमच्या दिव्य चरणी प्रार्थना आहे.’

– कु. अपाला औंधकर (आताची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, आताचे वय १६ वर्षे), फोंडा, गोवा. (८.५.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक