स्वातंत्र्य युद्धाची पहिली ठिणगी !

आज १० मे या दिवशी १८५७ च्या लढ्याला प्रारंभ झाला. त्या निमित्ताने…

‘१० मे १८५७ या दिवशी विख्यात अशा स्वातंत्र्य युद्धाला आरंभ झाला. इंग्रज इतिहासकार याला केवळ ‘शिपायांच्या बंडा’चे स्वरूप देतात आणि या क्रांतीयुद्धाची भूमिकाच विकृत करू पहातात. एका मागून एक अशी अनेक संस्थाने डलहौसीने खालसा केल्यामुळे सर्वत्र अग्नी धुमसत होता. देहलीच्या आसपास सशस्त्र उठावाची गुप्त मसलत चालू होती आणि या धुमसणार्‍या अग्नीची पहिली ठिणगी १० मे या दिवशी मीरत येथे उडाली. येथील शिपायांनी या दिवशी सायंकाळी एकदम धामधुमीस आरंभ केला. कारागृहावर आक्रमण करून कैदी असलेले शिपाई मुक्त केले आणि जे गोरे दिसतील, त्यांना ठार मारण्यास चालू केले. चर्चमध्ये घंटांचे नाद ऐकू येऊ लागल्यासमवेत मीरत आणि आसपासच्या खेड्यांतील लोक मोडकीतोडकी शस्त्रे घेऊन गोर्‍या लोकांवर धावून गेले. ‘‘पायदळ काय, तोफखाना काय, हिंदु काय नि मुसलमान काय, सारे इंग्रजांच्या रक्ताला तहानलेले होते. बाजारात एकच हलकल्लोळ उडाला. इंग्रजांचे बंगले, त्यांच्या कचेर्‍या, खानावळी यांना पेटवून देण्यात आले. मीरतचे आकाश भेसूर दिसू लागले. धुराचे लोट नि ज्वालांचे भयंकर लोळ यांनी वातावरण व्याप्त होऊन सहस्रावधी कंठांतील आरोळ्यांनी, विशेषतः ‘मारो फिरंगीको’ या घोषणांनी सर्व दिशा दणाणून गेल्या.’

(साभार : ‘दिनविशेष’ (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन))